पसायदान - आजच्या युगाचे

पसायदान - आजच्या युगाचे

‘माणसां‘शी इतकं बोलूनही कोणी ऐकत नाही. न दिसणारा ‘देव‘ आपण जे बोलतो, ते ऐकत असावा किंवा त्यामुळे मन हलकं होतं आणि विधात्याने ते ऐकलं, या समजाने माणसाला मोकळं वाटत असावं. परंतु, सेव्हर्न सुझुकी या कॅनडातील बारा वर्षीय मुलीने चोवीस वर्षांपूर्वी पृथ्वी वाचवण्यासाठी ‘माणसां‘कडेच याचना केली. 1992 मध्ये रिओमधील शिखर परिषदेत तिने काळजाचा ठाव घेणारे भाषण केले. ती म्हणाली, की ‘आम्ही तीन-चार मित्र-मैत्रिणी पैसे वाचवून पाच हजार मैल दूर येथे आलो आहोत. तुम्ही वडीलधाऱ्यांनी तुमचे मार्ग बदलावेत म्हणून इतका रस्ता पार करून आलो आहोत.‘ ती पुढे म्हणते, ‘आम्ही बालकं आमच्या भविष्यासाठी लढत आहोत. आम्ही गरीब व उपाशी बालकं, ज्यांना चरण्यास आणि चालण्यास जागा राहिलेली नाही; अशी मरणपंथास लागलेली जनावरं यांच्या वतीने बोलतो आहोत. मला उन्हात जायची अन्‌ श्‍वास घ्यायचीही भीती वाटते. कारण हवेत रासायनिक द्रव्ये मिसळली आहेत. ओझोनच्या थराला छिद्रं पडली आहेत. पाण्यातील माशांना कर्करोग झालेला आहे. झाडं, पक्षी, फुलपाखरं, प्राणी नाहीसे होत आहेत. हे आमच्या डोळ्यांदेखत घडते. ना आम्ही ओझोनची छिद्रं बुजवू शकत, ना जंगल, झाडं, पशू-पक्षी या पृथ्वीतलावर पुन्हा आणू शकत. म्हणूनच तुम्ही त्यांचं नाहीसं होणं थांबवा. आम्हा बालकांकडे त्याची उत्तरं नाहीत...‘ 

‘तुम्हीही कोणाचे तरी आईबाप, नातेवाईक आहात. आपण सारे विश्‍वकुटुंबाचे घटक आहोत. आपण सारे एक ध्येय ठरवून या पृथ्वीला वाचवूया. आपण अनावश्‍यक गोष्टी विकत घेतो आणि टाकून देतो. परंतु, गरजवंतांना देत नाही. आपण आपल्यातलं दुसऱ्यांना द्यायला घाबरतो. युद्धावरील खर्च दारिद्य्र हटवण्यासाठी नाही का करता येणार? आम्हाला शिकवलं जातं ‘कोणाशी भांडू नका. स्वच्छता ठेवा. पशू-पक्ष्यांना दुखवू नका. हावरटपणा करू नका.‘ मग तुम्ही वडीलधारी माणसं का अशी वागता? पालक पाल्यांना सांगतात; सर्वकाही ठीक होईल. हा काही जगाचा शेवट नाही. परंतु, आता तुम्हाला असं काही बोलायची संधीच राहणार नाही.‘ 

रिओनंतर वीस वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये सेव्हर्न सुझुकीने पुनश्‍च एकदा एका परिषदेत भाषण केले. तेव्हा ती दोन मुलांची आई होती. त्या वेळीही तिने आपण पृथ्वीवर विविध पद्धतीने दबाव टाकत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यानंतरच्या एका भाषणात ती म्हणते, की सर्व जण हक्कांविषयी बोलतात. परंतु, आम्ही जबाबदारीविषयी बोलतो. पृथ्वी वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याची ती पुनःपुन्हा आठवण करून देते. 

सुझुकीचे हे मनोगत म्हणजे निसर्ग वाचविण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ‘पसायदान‘ आहे, जे संत ज्ञानेश्‍वरांनी साऱ्या विश्‍वकुटुंबासाठी मागितले आणि एकविसाव्या शतकात बारावर्षीय एक मुलगी पुनश्‍च पसायदान मागते. तेही विश्‍वकुटुंबासाठीच! असे हे पसायदान वेगवान उधळणाऱ्या विश्‍वाच्या वारूला क्षणभर थांबायला भाग पाडते... अशा ‘थांबण्या‘तूनच आपल्याला शक्ती मिळावी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com