मुद्रा : आजच्या काळाचे भाष्यकार 

मुद्रा : आजच्या काळाचे भाष्यकार 

सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरी, पुस्तक आणि कवितासंग्रहांचं महत्त्व कमी झालेलं नाही. त्याचं कारण अर्थातच या साहित्यातील संपन्न आशय. "युवा साहित्य अकादमी' पुरस्काराची मोहोर उमटलेल्या दोन तरुण साहित्यिकांचे उदाहरण या बाबतीत विचारात घ्यावे, असे आहे. मराठीत सुशीलकुमार शिंदे यांच्या "शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' या काव्यसंग्रहाला "युवा साहित्य अकादमी पुरस्कार', तर "जंगल खजिन्यातील शोध' या सलीम मुल्ला यांच्या कांदबरीस "बालसाहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर झाला. विशेष म्हणजे दोघांच्या लिखाणाची लवकर दखल घेतली गेली.

सुशीलकुमार शिंदे शहरी जीवनातील निरीक्षणे मार्मिकपणे नोंदवितात; तर सलीम मुल्ला यांनी जंगलातील जीवन अनुभवून ते कागदावर उतरवले. बदलत्या काळाचा जंगलांवर तसेच शहरी जनजीवनावर परिणाम होत आहे. लेखकांनी आपल्या साहित्यकृतीतून या बदलाचा माग घेतला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी गावातून शहरात आलेली माणसं कशी राहतात, जगण्यासाठी कशी झगडतात, राहणीमान, आहार-विहारपासून ते अस्तित्व असण्यापर्यंतचा काळ शिंदे यांनी आपल्या कवितेत उतरवला आहे. सिव्हिल आणि इंटेरियर डिझाइनचा डिप्लोमाधारक असणारे सलीम मुल्ला यांनी दहा बारा वर्षे बांधकाम क्षेत्रात काम केले; मात्र त्यांचे मन निसर्गात रमत होते. जंगलातील पक्षी, प्राणी त्यांना खुणावत होते. त्यांनी पुस्तकातून जंगल अनुभवण्यापेक्षा तेथे राहूनच वन्यजीवन अनुभवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी वनरक्षकाची नोकरी पत्करली. जंगलाचा अभ्यास करण्यासाठी जंगलाचा सहवास असणे गरजेचे आहे, असे मुल्ला म्हणतात.

"जंगल हे एक न संपणारे वाचन आहे', असे म्हणणारे सलीम मुल्ला मूळचे हातकणंगले तालुक्‍यातील तळंदगे गावचे. नव्या पिढीला जंगल कळावे म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले. एखादा पक्षी किती जबाबदारीने जंगलात राहतो, घरटे कसे बांधतो, अडचणींना न डगमगता सामोरे कसा जातो, याचे निरीक्षण मुल्ला यांनी केले; तर शहरात राहणाऱ्या माणसाच्या मनातील वादळ, घुसमट मांडण्याचा प्रयत्न सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

मूळचे इंदापूरचे शिंदे यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्यात उच्च शिक्षण घेतले आहे. सलीम मुल्ला आणि सुशीलकुमार शिंदे यांनी जंगल आणि शहरातील बदलत्या समाजमनाचा ठाव घेत त्यावर भाष्य केले आहे. या बदलाचे ते दोघेही साक्षीदार असून, ते भाष्यकारही झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com