ट्रम्प वे ओन्ली! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

'जगाची काळजी वाहताना अमेरिकेचे मात्र नुकसान झाले', असा सोईस्कर दावा करताना नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या कारभाराची शैली आमूलाग्र बदलण्याचे सूतोवाच केले आहे.

अमेरिकेचे पंचेचाळीसावे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी "व्हाइट हाउस'च्या प्रांगणात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतली आणि नंतरच्या 24 तासांतच "जग आता बदलले आहे!' याची प्रचीती आली. "हे केवळ सत्तांतर नाही, तर त्यापेक्षा बरेच काही वेगळे आहे!' असे दस्तुरखुद्द ट्रम्प यांनीच शपथविधीनंतरच्या पहिल्यावहिल्या भाषणात सांगून टाकले होते. सत्ताग्रहण होताच, त्यांनी "अमेरिका फर्स्ट'चा नारा दिला आणि "आता ही सत्ता प्रथमच अमेरिकी जनतेच्या हाती आली आहे!' असेही सांगितले. कट्टर राष्ट्रवादी नेहमी आपल्या सोईने इतिहासाची मांडणी करतात. आपल्या देशाचे इतरांमुळे नुकसान झाल्याचा ठपका ठेवतात. ट्रम्प यांचे भाषण हा त्याचा उत्तम नमुना. गेली अनेक वर्षे "अमेरिका फक्त जगाला देत आली आहे; जगाची चिंता वाहत आली आहे; परंतु यामुळे अमेरिकी जनतेचे व देशाचे मोठे नुकसान झाले असून, आता यापुढे तसे काही होणार नाही', अशी गर्जना ट्रम्प यांनी केली. या विवेचनात सत्य-असत्याचे बेमालूम मिश्रण होते. जणूकाही अमेरिकी धोरणांमुळे जगाचे काही नुकसान झालेच नाही. खोटे कारण दाखवून इराकच्या विरोधातील युद्धाची कृती ट्रम्प यांच्या विधानातील फोलपणा दाखवून द्यायला पुरेशी आहे. या त्यांच्या भाषणातून त्यांच्या पुढच्या वाटचालीची दिशा सूचित होत असल्याने त्यांची दखल घ्यायला हवी. ट्रम्प यांच्याच हाती सारी सत्ता केंद्रित झाली असून, ते आता यापुढे अमेरिकी जनतेच्या वा अमेरिकी सिनेटच्या इच्छेनुसार नव्हे तर "हीज ओन वे!' कारभार करणार आहेत. सत्ताग्रहणानंतर त्यांचा पहिला निर्णय हा संरक्षणमंत्री म्हणून जेम्स मॅटिस यांच्या नियुक्‍तीचा घेतला आणि त्यापाठोपाठ त्यांची कुऱ्हाड पडली ती अमेरिकेत "ओबामा हेल्थ केअर' या नावाने घराघरांत पोचलेल्या आरोग्य विमा योजनेवर. ट्रम्प यांचा सत्ताग्रहण सोहळा हा अनेक अर्थांनी आगळा-वेगळा होता!

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांच्या सत्ताग्रहण सोहळ्याला निदर्शने, बहिष्कार आणि वाद-विवादांचे गालबोट लागले होते. शपथविधी सोहळा सुरू असतानाही, त्या परिसरात निदर्शने सुरू होती आणि अनेक डेमॉक्रेटिक सिनेटर्सनी त्यावर बहिष्कार टाकला होता. निदर्शनांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे, तर अमेरिकी सिनेटमध्ये अल्पमतात असलेल्या डेमॉक्रेटिक गटाचे नेते चक श्‍युमर यांनी तर ट्रम्प यांना एक पत्र लिहूनच "अमेरिका हा कायद्याने चालणारा देश आहे आणि अमेरिकी जनता ही कायम प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करत आली आहे,' असे स्पष्टपणे बजावले होते. त्यामुळेच ट्रम्प यांच्या कारभाराबाबत अनेकांना भीती वाटत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. ही भीती जगभरातील अनेकांना आहे आणि भारतीय उद्योगजगतावर ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील भाषणांमुळेच टांगती तलवार उभी ठाकली आहे.

आपल्या प्रचारात ट्रम्प यांनी मोठ्या मुत्सद्देगिरीने "हिंदू कार्ड' वापरले होते आणि भारतातील हिंदुत्ववाद्यांनी त्याचा गवगवाही बराच केला होता. आताही ट्रम्प यांच्या भाषणातील "कडव्या मुस्लिम दहशतवादाचा नि:पात करण्याच्या' घोषणेमुळे या हिंदुत्ववाद्यांना आनंदाचे भरते येऊ शकते. मात्र, ट्रम्प यांच्या धोरणांचा भारताने त्यापलीकडे जाऊन गंभीरपणाने विचार करायला हवा. भारतातील आयटी तसेच औषधउद्योगाची धास्ती वाढू लागली आहे. "बाय अमेरिकन, हायर अमेरिकन' या त्यांच्या घोषणेमुळे तर अमेरिकेत उपलब्ध असलेल्या विविध रोजगारांमुळे तेथे कायमच्या वास्तव्यासाठी गेलेल्या लाखो भारतीयांच्या मनात धास्तीच निर्माण झाली असणार. अर्थात, त्यासंबंधात काही ठोस पाऊल उचलण्यापूर्वी इतक्‍या स्वस्तात श्रमशक्‍ती अमेरिकन भूमीत उपलब्ध होईल का, याचा विचार करावा लागेल. आजपावेतो अमेरिकेने अन्य देशांतील उद्योग तसेच संपत्ती यांच्यात वाढ होईल, अशीच धोरणे राबवली आणि त्यामुळे अमेरिकेचे मात्र नुकसानच झाले, हे ट्रम्प यांच्या भाषणाचे आणखी एक सूत्र होते. अमेरिकी जनतेला भुरळ घालणारी अशीच ही भाषा आहे आणि त्याच जोरावर ते निवडून आले आहेत. त्यामुळे आता वचनपूर्तीच्या दिशेने त्यांना काही पावले टाकावी लागणार.

ट्रम्प यांनी सत्ताग्रहणानंतरच्या 24 तासांत आणखी एक महत्त्वपूर्ण काम केले आहे आणि ते म्हणजे "व्हाइट हाउस'ची सुप्रतिष्ठित अशी "वेबसाइट' कोरी करून सोडताना, त्यांनी त्यावर "क्‍लायमेट चेंज' तसेच "एलबीटी राइट्‌स' यासंबंधात अवाक्षरही राहणार नाही, याची जातीने दक्षता घेतली आहे. अमेरिकी सिव्हिल सोसायटी ही "उदारमतवादा'साठी प्रसिद्ध आहे. त्या समाजाच्या मूलभूत संरचनेवरच हा घाला आहे आणि त्याचा अर्थ हा स्पष्ट आहे. आपल्या "माय वे' या धोरणानुसार ते आता या समाजाला काही नीतीनियम लागू करू पाहत आहेत. त्यांच्या या धोरणाचा सहजासहजी अमेरिकी समाज स्वीकार करणे कठीण आहे. त्यापलीकडची बाब म्हणजे ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष व्लॉदिमिर पुतीन यांच्याशी असलेला अजब दोस्ताना! निवडणूक प्रचारकाळातच त्या दोस्तीचे नमुने पुढे आले होते. आता ट्रम्प आणि पुतीन या जोडगोळीनेच जग बदलायचे ठरवले तर त्यांना कोणी रोखू शकणार नाही. अर्थात, ओबामा हे देखील "यस! वुई कॅन चेंज!' या नाऱ्याच्या जोरावरच निवडून आले होते. प्रश्‍न फक्‍त हे बदल सर्वसमावेशक तसेच उदारमतवादी समाजाच्या दिशेने वाटचाल करणारे असतील की नाही, हाच आहे.

Web Title: trump way only