भुयाराचा शोध!
भुयाराचा शोध!

भुयाराचा शोध! (ढिंग टांग!)

सामांपाऽऽतु सरस्वती भगवती! प्राचीन चोपड्यांचे आलोडन करोन इतिहासाचा धांडोळा घेण्याचा आमचा ऐतिहासिक पिंड उभ्या महाराष्ट्रभूमीला ठाऊक आहे. पट्टीचे इतिहासतज्ज्ञ अशी आमची राजकारण्यांमध्ये ख्याती असोन इतिहासतज्ञे मात्र आम्हांस कुत्सितपणाने भट्टीचे राजकारणी म्हणताती. सांगावयास दुख होत्ये, की असे असले तरी महाराष्ट्राकडोन आमच्या वाट्यास सदैव उपेक्षाच आली. त्यांचे घर उन्हात बांधावे, अशी विनंती आम्ही सरस्वतीमातेस करीत आहो. इतिहास उत्खननाचे हे असिधाराव्रत आम्ही अत्यंत गोपनीय पद्धतीने करीत असल्याने ते नेमके कोठे केले हे इतिहासासदेखील अज्ञात आहे. तथापि, आमच्या प्रिय वाचकांसमोर आम्ही आज येक सोडोन तीन गौप्यस्फोट करीत आहो. गेल्या असंख्य वरुषांची आमची घनघोर तपस्या नुकतीच फळास आली असोन मुंबापुरी (खुलासा : साऊथ बॉम्बे!) येथे उत्खनन करोन आम्ही तीन भव्य भुयारे शोधून काढिली आहेत. हा इतिहासाचा अमोलिक ठेवाच असोन त्याचे अल्पस्वल्प श्रेय आम्ही आपल्याकडे घेत आहो. 

बोरीबंदर (पूर्वाश्रमीचे व्हिक्‍टोरिया टर्मिनस किंवा छशिट!) येथे काही कारणाने आम्ही लोकलगाडीस लोंबकळोन गेलो असता अत्यंत निकडीच्या निसर्गहाकेच्या निमित्ताने कोपऱ्यातील स्वच्छतागृहात वेगाने जाणे झाले. तेथील कारभार आटोपतानाच आमच्या इतिहासचक्षूंना खालील पोकळी स्पष्ट दिसली. (खुलासा : खालील पोकळी म्हंजे जमिनीखालील भुयार!! तुमच्यामारी!!!) तात्काळ आम्ही उत्खनन करोन तेथील ब्रिटिशकालीन भुयार हुडकून काढिले. हे भुयार थेट रिझर्व ब्यांकेपर्यंत जाते, असा आमचा कयासही सरसही करेक्‍ट ठरला. भारतीय रेल्वेचा गल्ला येथे दडवोन ठेवण्याची योजना असे, असे दस्तऐवजावरोन ध्यानी येते. सदर भुयारास प्रसिद्धी मिळाली; परंतु सदर इतिहास संशोधक अंधारातचि राहिला. असो. 

तदनंतर आम्ही राजभवन येथे मोर बघावयास गेलो असता अचानक समुद्रकिनाऱ्यानजीक जाणे अपरिहार्यपणे घडले. जुनी सवय! तेथेही आमच्या इतिहासचक्षूंना खालील पोकळी स्पष्ट दिसली! (खुलासा : ‘खालील पोकळी‘चा अर्थ वरती दिला आहे! हाणू का आता? च्यामारी!) तेथेही आम्ही उत्खनन केले. चांगले पाच हजार फुटांचे बंकरवजा भुयार आम्हास तेथे गवसले. तेथे तेरा छोट्या खोल्या होत्या व पंखे नव्हते, पाणीही नव्हते!! त्यावरू न ते एक सार्वजनिक स्वच्छतागृह असावे, असा आमचा प्रारंभी गैरसमज झाला. कारण आतमध्ये आम्हाला गर्दी दिसली! एका खोलीतून नमोजाकीट ठीकठाक करत खुद्द मुख्यमंत्री नानासाहेब फडणवीस बाहेर पडले. आम्हाला बघून ओशाळे हसले. सदर भुयार हे माजी नामदार श्रीमान रा. छगनबाप्पा ह्यांचे हपिस असावे, असा आमचा निष्कर्ष आहे. कां की तेथील तेरा खोल्यांवर ‘गन शॉप, गन फॅक्‍टरी, गन बुलेटस, गन शेल स्टोअर‘ अशा पाट्या होत्या. ‘छगन‘ मधील ‘छ‘ एव्हाना गळून पडला असणार, हे आम्ही तत्काळ ताडिले. तथापि, सांगावयास दुख होते, की सदर भुयार प्रसिद्ध पावले, तरी सदर इतिहास संशोधक अंधारातचि राहिला. असो. 

आता आपण तिसऱ्या गौप्यस्फोटाकडे वळू. वाचकहो, हे उत्खनन म्हंजे क्रांतिकारक शोध असोन आधी शोधलेल्या दोन भुयारांच्या वरताण ठरणारा आहे. महाराष्ट्राच्या राजनीतीस ह्यामुळे निराळेच आडवळण लागणार असोन त्याची तुळणा केवळ अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या शोधाशीच होऊ शकेल. त्याचे झाले असे, की काही कामानिमित्त आम्ही मंत्रालयात गेलो असता, तेथे आमच्या इतिहासचक्षूंना पुन्हा खालील पोकळी जाणवली. (खुलासा : आता मात्र तुमची हद्द आहे!) पायाशी बद्द बद्द असा आवाज आल्याने आम्ही तात्काळ तेथे कुदळ मारली असता एक मोठे भुयार सापडले. ते बांदरागड येथील ‘मातोश्री‘ पर्यंत जात असावे, असा आमचा गैरसमज जाहला. मशाल पेटवोन धीर करोन आम्ही तेथे गेलो. पाहतो तो काय! त्याचे दुजे तोंड थेट एका दालनात उघडले. भुयाराच्या तोंडून बाहेर पडलो, तो समोर कमरेवर हात ठेवोन साक्षात दादासाहेब बारामतीकर ऊर्फ धाकले धनी उभे! 

ते आम्हांस विचारू लागले, ‘‘काय काम काढलं?‘‘ 

लेखनसीमा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com