जाचक अटींचा 'पुरस्कार' गैरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सोशल मीडियावर या विषयाची "पोस्ट' आल्यानंतर त्याबाबत सखोल माहिती न घेताच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यातून विद्यापीठाच्या प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले. या वादात शेलारमामा कोण, त्यांचे कार्य कोणते, हे विषय मागे पडले.

योगमहर्षी कीर्तनकार रामचंद्र शेलार यांच्या नावाच्या सुवर्णपदकाच्या वादग्रस्त अटीवरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निर्माण झालेल्या वादंगाचा धुराळा खाली बसत असला, तरी यातून काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सुरवातीलाच हे स्पष्ट करायला हवे, की सार्वजनिक स्तरावरील कोणताही गुणवत्ताधारित पुरस्कार देताना त्यात आहाराच्या सवयी काय आहेत यासारख्या मुद्द्यावरून पक्षपात करणे चूक आहे.

तसा आग्रह एखादी संस्था धरत असेल तर विद्यापीठाने ती मान्य करण्याची गरज नाही, याचे कारण विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. परंतु, ती काळजी घेतली न गेल्याने मांसाहार करणाऱ्यांना पुरस्कार देऊ नये, ही वादग्रस्त अट संबंधित पुरस्काराच्या नियमांमध्ये समाविष्ट केली गेली. प्रतिष्ठित संस्थांनी एखादा प्रश्‍न निर्माण झाला तर मार्गदर्शनाचा आधार म्हणून राज्यघटनेतील मूल्ये शिरोधार्य मानली पाहिजेत. पण हे स्पष्ट करतानाच ज्या पद्धतीने या वादाला राजकीय रंग देण्यात आला, तोही निषेधार्हच होता, हेही नमूद करायला हवे. काहींनी विद्यापीठाला लक्ष्य करण्याची संधी म्हणून या प्रकाराकडे पाहिले. गुणवान विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुवर्णपदकासाठी प्रायोजकत्व देणाऱ्या व्यक्ती वा संस्थेच्या अटी मान्य करण्याचे विद्यापीठाचे धोरण असेल, तर त्यानुसार निर्णय घेतला तर यात दोष कुणाचा, गेली दहा वर्षे हे पदक त्या अटीनुसार दिले जाते, तर आताच वाद का असे प्रश्‍नही या निमित्ताने उभे राहिले.

सोशल मीडियावर या विषयाची "पोस्ट' आल्यानंतर त्याबाबत सखोल माहिती न घेताच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यातून विद्यापीठाच्या प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले. या वादात शेलारमामा कोण, त्यांचे कार्य कोणते, हे विषय मागे पडले. मूळ मुद्दा हा भेदाभेद करणारी अट स्वीकारण्याचे धोरण बदलण्याचा असताना त्याची राजकीय धुळवड खेळली गेली. अर्धवट माहितीच्या आधारे आलेल्या बातम्यांमधून राज्यस्तरावरील नेतेही अभ्यास न करताच बोलले, ही बाब चिंता करण्यासारखी आहे. या पुढे कोणत्याही पारितोषिकासाठी जाचक अटी स्वीकारायच्या नाहीत, असे विद्यापीठाचे धोरण असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. एखाद्या घटनेचा आधार घेऊन विद्यापीठाची प्रतिमा डागाळण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे मात्र कदापि समर्थन करता येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Pune award