सीरियाच्या पटावर अमेरिका-रशियाची खेळी

निखिल श्रावगे
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

उशिरा का होईना, पण सामंजस्याने सीरियातील पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारी रशिया यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेले आहेत. या दोघांच्या, विशेषतः अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणांमुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे.

उशिरा का होईना, पण सामंजस्याने सीरियातील पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारी रशिया यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेले आहेत. या दोघांच्या, विशेषतः अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणांमुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे.

सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात 2011 मध्ये सुरू झालेल्या निदर्शनांना आज जवळपास साडेपाच वर्षे लोटली आहेत. या काळात अहिंसक ते हिंसक आणि आता यादवीकडे असा या आंदोलनाचा प्रवास झाला आहे. सीरियन सरकार, एक हजाराहून अधिक दहशतवादी टोळ्या, "अल-कायदा‘, "जब्हत फतेह अल-शम‘, "इसिस‘, "हेजबोल्लाह‘ या दहशतवादी संघटना आणि इराण, तुर्कस्तान, रशिया व अमेरिका या सगळ्यांनी मिळून ही वेळ आणली आहे. आपापसांतील समर्थन आणि विरोधाच्या जिवावर हा भडका उडाला आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपापल्या समर्थक गटांना रसद पुरवणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरोव यांनी आणि अर्थात त्यांच्या अध्यक्षांनी चर्चेचा बराच काथ्याकूट करून गेल्या महिन्यात सात दिवसांचा शस्त्रसंधी लागू केला. हा करार किती काळ टिकणार याबद्दल शंका असतानाच, जेमतेम दोन दिवस शांततेत घालविल्यावर सर्व घटकांनी पुन्हा हातात बंदुका घेऊन रोजची हाणामारी सुरू केली आहे. एक-एक गाव, उपनगर आणि शहरावरून असद सरकार आणि त्यांचे विरोधक यांच्यात जोरदार धुमश्‍चक्री सुरू आहे. राजधानी दमास्कसबरोबरच होम्स आणि हमा ही दोन शहरे असद सरकारकडे आहेत. सध्याच्या घडीला अलेप्पो या सीरियातील सर्वांत मोठ्या आणि आर्थिक, व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांसाठी रस्सीखेच सुरू आहे. अलेप्पोचा ताबा आता असद विरोधकांकडे आहे. सीरियातील समस्यांचा अभ्यास करता, अलेप्पो शहर जो राखेल त्या गटाचे पारडे जड होईल, असे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे अलेप्पोसाठीच या गटांचा आटापिटा सुरू आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात सीरियाचे 69 सैनिक मारले गेल्यामुळे सीरियन सरकार आणि त्याला पाठिंबा देणारा रशिया यांनी शस्त्रसंधी धुडकावून अलेप्पोमध्ये अडकलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पाठवलेल्या मदत-साहित्यावर हवाई हल्ला करून ते खाक केले. यात मदतकार्य करणारे वीस जण मारले गेले. 

उशिरा का होईना, पण सामंजस्याने हा पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील संबंध जरा जास्तच ताणले गेले आहेत. अमेरिकेने रशियासोबत सीरियाच्या प्रश्नावर आता बोलणी थांबवली आहे, तर रशियाने 2000 मध्ये अमेरिकेसोबत केलेल्या कराराला केराची टोपली दाखवली आहे. अमेरिका-रशिया आपल्याकडील प्रत्येकी 34 टन प्लुटोनियम नष्ट करतील, असा हा करार होता. चौतीस टन म्हणजे सुमारे सतरा हजार अणुबॉंब तयार करण्यासाठी लागणारा दारूगोळा! त्यामुळे एकमेकांना अटकाव करू पाहणारे अमेरिका-रशिया आता बेधडकपणे आपले धोरण सीरियात रेटत आहेत. या रेट्यात गेल्या काही दिवसांत हजारो नागरिक अलेप्पोत मरण पावले आहेत. लहान मुले आणि स्त्रियांची संख्या त्यात अधिक आहे. अलेप्पोत जाणारी सर्व मदत असद सरकारने रोखून धरल्याने वा खाक केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. उपासमारी, इमारतींचे सांगाडे, पाण्याची वानवा, बॉंबवर्षाव झालेली रुग्णालये आणि मृतदेहांमुळे पसरणारी रोगराई याचे फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांतून बाहेर येणारे चित्र मन हेलावून सोडणारे आहे. अलेप्पोनंतर हे देश इराकमधील मोसुल आणि त्यानंतर सीरियातील रक्का या "इसिस‘च्या ताब्यातील दोन महत्त्वाच्या शहरांकडे आपला मोर्चा वळवतील. किंचित अस्ताकडे कललेली "इसिस‘ या दोन शहरांसाठी आपली सर्व ताकद खर्ची करेल असे दिसते. प्रसंगी त्यांच्याकडून रासायनिक हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. अलेप्पोपेक्षा जास्त रक्तपात आणि अडकलेल्या सामान्य नागरिकांची मनुष्यहानी मोसुल आणि रक्कामध्ये घडेल. साम-दाम-दंड-भेद वापरून आपले सिंहासन वाचवणारे असद आणि त्यांना खाली खेचू पाहणारे त्यांचे विरोधक यांच्यातील या हिंसक सुंदोपसंदीत सामान्य प्रजा अक्षरशः होरपळून निघत आहे. विरोधकांमध्ये फूट पाडून आपली खुर्ची बळकट करणारे असद पुढील काळाचा विचार करता स्वतःच्या राजकीय वाटेवर सुरुंग पेरत आहेत. या एका प्रश्नामुळे पश्‍चिम आशियातील सर्व देशांचा, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक धोरणांचा बाज बदलला आहे. त्याबरोबरच 1970 च्या दशकातील शीतयुद्ध संपवून आता छुपे शीतयुद्ध घडवून आणत असलेली अमेरिका आणि रशिया हे त्यांनीच पेटवलेल्या या आगीत ओढले गेले आहेत. बराक ओबामांची सीरियाच्या प्रश्नावर झालेली सपशेल नामुष्की त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या मानगुटीवर बसणार आहे. युद्धखोर समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्‍लिंटन हे हा प्रश्‍न कसा हाताळतात यावर जागतिक शांतता आणि घडू-बिघडू पाहणारे आंतरराष्ट्रीय संबंध अवलंबून आहेत. 

सरतेशेवटी अमेरिका आणि रशियाला एकमेकांशी जुळवून घेऊन यावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नाही. आता ते चर्चेचा घोळ घालत बसतात की आपले लष्करी सामर्थ्य छुप्या पद्धतीने लादतात हे बघावे लागेल. या दोघांच्या किंबहुना अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणांमुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे. त्याबद्दल या दोन देशांनी काही संवेदना दाखवणे त्यांच्या तुच्छतावादात बसत नाही. दुसऱ्याच्या मांडवात आणि तिसऱ्याच्या सारीपाटात अमेरिका आणि रशियाचा हा रुसण्या-फुगण्याचा संसार चालू आहे. त्याला प्रचंड अशा अर्थकारणाची गडद किनार आहे. चर्चा फिसकटते तिथे भांडण आणि हिंसाचार सुरू होतो, या राज्यशास्त्राच्या प्राथमिक तत्त्वाचे प्रत्यक्ष प्रयोग सीरियातील यादवीत सुरू आहेत. सीरिया आणि पश्‍चिम आशियाच्या दुर्दैवाने आता या प्रयोगाची दीर्घांकाकडे वाटचाल होत आहे. चर्चा करून हा वाद तात्पुरता मिटूही शकेल. राखेखालचा हा विस्तव मात्र पुढील बरीच वर्षे नक्कीच विझणार नाही. 

Web Title: US and Russia finally agree to resolve Syrian crisis