मान चुकलेच; पण इतरांचे काय?

शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

संसदेच्या सुरक्षेबाबत चित्रफीत काढल्याबद्दल खासदार भगवंत मान यांना कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती केली जावी; परंतु उगाचच सुरक्षेच्या नावाने खोटे गळे काढणे आणि त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणे, हा दांभिकपणाच आहे.

संसदेच्या सुरक्षेबाबत चित्रफीत काढल्याबद्दल खासदार भगवंत मान यांना कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती केली जावी; परंतु उगाचच सुरक्षेच्या नावाने खोटे गळे काढणे आणि त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणे, हा दांभिकपणाच आहे.

आम आदमी पक्षाचे लोकसभा सदस्य भगवंत मान यांनी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती मिळेल अशा स्वरूपाची चित्रफीत त्यांच्या मोबाईलवर चित्रित केली. त्यांनी ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याने एकच गोंधळ सुरू झाला. शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज या विषयावरून झालेल्या गोंधळामुळे होऊ शकले नाही. "प्रमुख गोंधळी‘ सत्तापक्ष होता आणि त्यांना इतर विरोधी पक्षांनीही साथ दिली. हे प्रकरण गंभीर आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. नकलाकार आणि हास्यअभिनेता म्हणून ओळख असलेले भगवंत मान यांनी हे अत्यंत अशोभनीय असे काम केले आणि त्यामुळेच त्यावरील गदारोळ हा अपेक्षित असला, तरी तो समर्थनीय आहे काय, हेही तपासून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर ज्या संसदेने 2001 मध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांचा हल्ला सहन केला आहे, त्या संसदेला सुरक्षाव्यवस्थेतील ही ढिलाई परवडणारी आहे काय, हा प्रश्‍न विचारून त्याचेही उत्तर सुबुद्धपणे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. केवळ एका सदस्याने केलेल्या या प्रकाराचा बाऊ करणे, पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि तेथे "आप‘ला प्रचंड पाठिंबा मिळत आहे म्हणून भाजप-अकाली दलाने संसदेत यावरून गदारोळ करणे हेदेखील कितपत उचित आणि समर्थनीय आहे, याचेही उत्तर शोधले पाहिजे. भगवंत मान यांनी केलेला प्रकार हा गुन्हा आहे आणि त्यावर चर्चा होऊ शकत नाही, तर फक्त "ऍक्‍शन‘ म्हणजेच "कारवाई‘ होऊ शकते. त्यामुळेच संसदेत जो काही गोंधळ झाला, तो एका दिवसापुरता झाला असे मानले तरी ते संसदेच्या परिपक्वतेचे लक्षण मानता येणार नाही. राज्यसभेत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी हाच मुद्दा मांडताना, ही बाब "डिस्कशन‘ची नसून "ऍक्‍शन‘ची आहे आणि सरकारने ती तत्काळ करावी, अशी मागणी केली; परंतु या विषयावर राजकारण करणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी गोंधळ करणेच पसंत केले.
संसदेत सध्या आलेल्या मंडळींना या संदर्भातील इतिहासाची माहिती होणे आवश्‍यक आहे. तेरा डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला झाला. सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. त्यानंतर काही दिवसांनी गतिमान बातम्या देण्यात पटाईत असलेल्या एका वृत्तवाहिनीने संसदेची सुरक्षा व्यवस्था किती चोख आहे यासाठी "स्टिंग ऑपरेशन‘ केले. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या "डमी‘ला म्हणजेच त्यांच्यासारखाच दिसणारा माणूस शोधून आणि त्याला त्यांच्यासारखा पेहराव घालायला लावून संसदेत नेले. मुख्य प्रवेशद्वारातून त्या माणसाला प्रवेशही मिळाला. मुख्य दरवाजावरही त्याला अडविण्यात आले नाही. हे सर्व त्यांच्या मागे असलेला वृत्तवाहिनीचे कॅमेरामन टिपत चालला होता. ही चित्रफीत दाखवली गेली आणि त्यावरूनही गदारोळ झाला; परंतु त्या वृत्तवाहिनीविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. कारण, सर्व राजकारण्यांना त्यांचे चेहरे पडद्यावर झळकवायचे असतात आणि वृत्तस्वातंत्र्यावर घाला घातल्याची उगाच टीका व्हायला नको, असे निव्वळ बेगडी कारण पुढे करून कारवाई केली गेली नाही; अन्यथा या वृत्तवाहिनीने केलेला प्रकार आणि भगवंत मान यांनी केलेला प्रकार सारखाच आहे. संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेशी केलेला तो खेळ आहे.

आणखी एक प्रकार !जी भाजपची मंडळी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ केल्याबद्दल गोंधळ करीत आहेत, त्यांच्याच एका माजी (आता जूनमध्ये निवृत्त) खासदारसाहेबांचा हा किस्सा. हे महाशय संसदेच्या सुरक्षाविषयक समितीचे सदस्यही होते. त्यांनी एकदा त्यांच्या मोटारीवर चक्क बनावट पार्किंग लेबल लावून संसदेच्या आवारात प्रवेश केला होता. संसदेत केवळ स्वतः वाहन चालविणाऱ्या खासदारांनाच वाहन उभे करण्यासाठी जागा दिली जाते. त्यासाठी संसदेचे पार्किंग लेबल दिले जाते. त्यात काही सुरक्षाविषयक गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. कोणाला त्याचे डुप्लिकेट लेबल तयार करता येऊ नये यासाठी ही खबरदारी असते. त्यावर लहानसा चौकोनी चकचकीत मोनोग्राम असतो. या खासदार महाशयांकडे एकाहून अधिक गाड्या आहेत. पार्किंग लेबल एकाच गाडीसाठी मिळते. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या लेबलवरून त्याचे डुप्लिकेट लेबल तयार केले आणि त्यावर मोनोग्राम म्हणून तयार कपड्यांवरील चकचकीत मोनोग्राम काढून चिकटवला. त्यांना वाटले की आता त्यांची गाडी कोणी अडवणार नाही; परंतु हल्ली गाडी संसदेच्या फाटकाजवळ आली की तिचे वर्णन संगणकीय आवाजावरून सांगितले जाते आणि ज्या नोंदलेल्या गाड्या असतात त्याचे तपशीलही सांगितले जातात. बनावट लेबलमुळे संगणकावर संबंधित मोटारीचा क्रमांक आला नाही आणि त्यामुळे त्यांना अडविण्यात आले. मग चौकशीची चक्रे फिरली. त्यांची खोट्या मोनोग्रामची चोरीही उघडकीस आली. हा मामला हक्कभंग समितीकडे गेला. हातपाय पडून हे प्रकरण माघारी घेण्यात आले. एवढा गंभीर अपराध करूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
हा इतिहास झाला. आता तर "सेल्फी‘चे युग आहे. पंतप्रधानांसह राजकीय नेतेही "सेल्फी‘ काढत असतात. अनेक संसदसदस्य त्यांच्या समर्थकांना, कुटुंबीयांना, अनुयायांना संसद भवन दाखविण्यासाठी आणत असतात. त्यात गैर काहीच नाही; पण संसदेच्या आवारात ठिकठिकाणी ते छायाचित्रे काढत असतात. हे कोणत्या सुरक्षितेत बसते? हे प्रकार संसदेचे सुरक्षा कर्मचारी मुकाट्याने सहन करतात. कारण, मागे एकदा चुकून एका सुरक्षा कर्मचाऱ्याने एका संसदसदस्याला ओळखपत्रासाठी विचारणा केल्यावर, त्या खासदाराने चिडून त्याला थोबाडीत मारले होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही अडचण होते आणि मग त्यातून हा दुर्लक्षाचा प्रकार होतो.

तात्पर्य एकच! भगवंत मान यांनी चूक केली आहे, अपराध केला आहे त्यांना कायद्यानुसार जी शिक्षा होणे शक्‍य आहे ती केली जावी; परंतु उगाचच सुरक्षेच्या नावाने खोटे गळे काढणे, पंजाबमधील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून "आप‘ला बदनाम करणे, असले दांभिक प्रकार केले जाऊ नयेत. गुजरातमध्ये दलितांवर अमानुषपणे अत्याचार केल्याबद्दल विरोधी पक्ष निषेध करीत असताना त्याला न जुमानता लोकसभेचे कामकाज रेटून चालविले जाते आणि भगवंत मान यांच्याप्रकरणी मात्र दोन मिनिटांत लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब होते, हा देशातील राजकीय भोंदूपणाचा अतिठळक नमुना आहे. सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील असतो आणि तो जाहीर चर्चेचा नसतो. योग्य ती प्रतिबंधात्मक आणि वेळेवर कारवाई हा त्यावरील उपाय असतो. मान यांची चित्रफीत चोवीस तासांहून अधिक काळ सोशल मीडियावर होती. सरकारकडे सर्व यंत्रणा असताना ती तत्काळ रद्द करणे तंत्रज्ञानाने सहज शक्‍य होते; पण ते न करता फुकट आरडाओरडा करण्यात लोकप्रतिनिधींनी वेळ घालविला ! या सर्वाचा अर्थ लोकांनीच लावावा!

Web Title: Value matters; What can I do?