विशेष : उच्च तंत्रशिक्षण नि मातृभाषा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
Marathi
MarathiSakal

प्रत्येक महत्त्वाच्या बदलाची सुरुवात क्रांतिकारी पावलाने होते. देशातल्या आठ राज्यांमधील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा नवीन शैक्षणिक वर्षापासून निवडक शाखांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा निर्णय असाच ऐतिहासिक क्षण आहे.

देशातल्या आठ राज्यांमधील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा नवीन शैक्षणिक वर्षापासून निवडक शाखांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा व नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘अ.भा.तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) ११ प्रादेशिक भाषांमधून बी.टेक अभ्यासक्रमांना मुभा देण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. या निर्णयांमुळे हिंदी, मराठी, तमीळ, तेलगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, बंगाली, आसामी, पंजाबी आणि ओडिया या प्रादेशिक भाषांमधून बी.टेक अभ्यासक्रम प्रवेशास घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींची द्वारे खुली होतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेवर भर दिल्याने गरीब, ग्रामीण आणि आदिवासी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण होईल, असे ते म्हणाले. प्राथमिक शिक्षणातही मातृभाषेला प्रोत्साहन दिले जात आहे, असे सांगत याप्रसंगी सुरू करण्यात आलेला ‘विद्याप्रवेश’ हा कार्यक्रम यादृष्टीने उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. ‘एआयसीटीई’चा हा स्वागतार्ह उपक्रम आहे. येत्या काही वर्षांत त्यांची व्याप्ती वाढवावी, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचे त्यांच्या मातृभाषेत व्यावसायिक अभ्यासक्रम घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. ‘एआयसीटीई’ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ८३ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात सुमारे ४४ टक्के विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून अभियांत्रिकीचा अभ्यास करण्याच्या बाजूने कौल दिला.

चांगले आकलन

पुरोगामी व दूरदर्शी असे एनईपी-२०२०, प्राथमिक शालेय स्तरापासूनच मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करते. मातृभाषेतून विषयांचे चांगले आकलन होते आणि विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक आकलनाचा विकासही होतो. जी मुले सुरुवातीच्या काळात मातृभाषेतून शिक्षण घेतात, ती परकी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करतात, हे अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणे म्हणजे आत्मसन्मान आणि स्वत:ची ओळख निर्माण करणे, तसेच बालकाचा सर्वांगीण विकास करणे, या तथ्यावर ‘युनेस्को’ व इतर संस्था भर देत आहेत. दुर्दैवाने अजूनही काही शिक्षक आणि पालक इंग्रजीला प्राधान्य देतात, परिणामी मातृभाषा दुय्यम/तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते. ‘नोबेल’ विजेते सर सी. व्ही. रमण यांचे विचार यासंदर्भात आजही प्रस्तुत आहेत. ते म्हणाले होते, ‘‘मातृभाषेतूनच विज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे. अन्यथा, विज्ञान हा एक तथाकथित प्रतिष्ठित उपक्रम ठरेल. मातृभाषेतून शिक्षण न दिल्यास योग्य आकलन सहजपणे होणार नाही, परिणामी विज्ञान/वैज्ञानिक तथ्ये जाणून घेण्यासाठीच्या संबंधित चर्चेत आपण सहभागी होऊ शकणार नाही, वैचारिक योगदान देऊ शकणार नाही.’’ आपल्या शैक्षणिक व्यवस्थेने अभियांत्रिकी, औषध, कायदा आणि मानवतेशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याइतकी अभूतपूर्व प्रगती केली आहे, मात्र मातृभाषेतील अभ्यासक्रमांअभावी अनेकांना त्या ज्ञानापासून वंचित राहावे लागले. वर्षानुवर्षे आपण बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखत राहिलो.

जगात स्थानिक भाषांना प्राधान्य

जगभरात सर्वोत्तम उच्च शिक्षण देण्यासाठी आपापल्या स्थानिक भाषा वापरल्या जातात. ‘जी-२०’ गटातील बहुतेक देशांमध्ये अत्याधुनिक विद्यापीठे आहेत, ज्यांत त्यांच्या देशातील मुख्य भाषेतून शिक्षण दिले जाते. दक्षिण कोरियामधील ७० टक्के विद्यापीठे कोरियन भाषेतून शिक्षण देतात. या देशाच्या सरकारने २०१८मध्ये शाळांमध्ये तिसऱ्या इयत्तेपूर्वी इंग्रजी शिकवण्यावर बंदी घातली, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता कमी होत असल्याचे जाणवले. जपानमध्येही विद्यापीठांमधील अभ्यासक्रम जपानी भाषेतच आहेत. चीनमधील विद्यापीठांतही मॅंडरीनमधून शिक्षण दिले जाते. फ्रान्समध्ये फ्रेंच या एकमेव भाषेतून शालेय शिक्षण देण्याचे धोरण आहे. जर्मनीतील शाळांमध्ये शिक्षणाची भाषा प्रामुख्याने जर्मन आहे, आणि अगदी उच्च शिक्षणाचा विचार केला तर मास्टर्सपर्यंतच्या अभ्यासक्रमांपैकी ८०टक्के पेक्षा जास्त अभ्यासक्रम जर्मन भाषेत शिकवले जातात. भाषांमधील वैविध्य जपणारा कॅनडा शिक्षणाप्रती योग्य दृष्टिकोनाचे दर्शन घडवितो. तेथील बहुतांश प्रांतांमध्ये इंग्रजी हे शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे, तर फ्रेंच भाषिक लोकसंख्या जास्त असलेल्या क्यूबेकमध्ये बहुतेक प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांबरोबरच अनेक विद्यापीठांमध्येही फ्रेंच भाषेतून शिक्षण दिले जाते.

भारतात जास्तीत जास्त व्यावसायिक अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवले जातात, ही शोकांतिका आहे. भारतात विज्ञान, अभियांत्रिकी, औषध आणि कायदेविषयक अभ्यासक्रमांच्या संदर्भात ही स्थिती अगदीच बिकट आहे. या क्षेत्रांसाठी प्रादेशिक भाषांमधील अभ्यासक्रम अस्तित्वातच नाहीत. सुदैवाने, आपल्या भाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व आपल्याला जाणवू लागले आहे. ही भीषण स्थिती आपल्याला कशी सुधारता येईल? गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवताना आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारताना आपल्या भाषांचे जतन करण्याचा मार्ग, आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दाखवते. आपण विद्यार्थ्यांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण (किमान इयत्ता पाचवीपर्यंत) देऊन सुरुवात करीत व्याप्ती हळूहळू वाढवावी. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीत बोलायचे तर, या १४ महाविद्यालयांनी प्रादेशिक भाषेतून अभ्यासक्रम सुरू करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असताना, देशभरात इतरही ठिकाणी अशा प्रकारचे आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे. खासगी विद्यापीठांनीही परस्परांच्या सहकार्याने काही द्विभाषिक अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या प्रादेशिक भाषांमधून उच्च शिक्षण घेता यावे, यातील मोठा अडथळा म्हणजे उत्कृष्ट दर्जाच्या पाठ्यपुस्तकांचा अभाव. विशेषत: तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तके प्रादेशिक भाषांत सहज उपलब्ध होत नाहीत. त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत भारतीय भाषांमधील अभ्यासक्रम सुलभरीत्या पोहोचवविण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला वापर शक्य आहे. आपल्या देशात डिजिटल शिक्षण यंत्रणा नवखी असून, या यंत्रणेतही व्यापक प्रमाणात इंग्रजीचाच वापर करण्यात आला आहे, त्यामुळे बहुतेक मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही. या परिस्थितीतही बदल होण्याची आवश्यकता आहे.

एआयसीटीई आणि आयआयटी, मद्रास यांनी परस्परांच्या सहकार्याने ‘स्वयम’चे अभ्यासक्रम मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली, मल्याळम आणि गुजराती अशा आठ प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्याचा घेतलेला निर्णय, हे स्वागतार्ह पाऊल आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना याचा चांगला उपयोग होईल. त्यांना भविष्यात इंग्रजीचे वर्चस्व असलेले अभ्यासक्रमही अधिक सहजतेने आत्मसात करता येतील. उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी आपल्याला तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची गरज आहे. कोणताही विषय मातृभाषेतून शिकणे कमी ताणाचे असते. प्रत्येकाने जमतील तितक्या भाषा शिकाव्यात. पण त्यासाठी मातृभाषेचा पाया भक्कम असावा. मी ‘मातृभाषा विरुद्ध इंग्रजी’ असे म्हणत नसून ‘मातृभाषा आणि इंग्रजी’ अशा दृष्टिकोनाचा पुरस्कार करतो. आजच्या काळात विविध देश परस्परांशी वेगाने संलग्न होत आहेत, अशा स्थितीत विविध भाषांवरचे प्रभुत्व हे जागतिक स्तरावर अनेक नव्या संधी प्रदान करणारे ठरते.

आपण परस्परांशी संवाद साधताना मातृभाषेतून बोलणे कमीपणाचे वाटू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या भाषेकडे दुर्लक्ष करत राहिल्यास आपण ज्ञानाचे एक साधन गमावू आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांना त्यांच्या सांस्कृतिक मुळांपासून, तसेच मौलिक अशा सामाजिक, भाषिक वारशापासून वंचित ठेवू. आणखी काही संस्था येत्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम राबविण्यास पुढाकार घेतील, असा विश्वास आहे. भारत हा अफाट प्रतिभांचा देश आहे. परदेशी भाषा बोलण्यातली अक्षमता, ही युवकांच्या प्रगतीत अडथळा ठरू नये. मातृभाषेतून शिक्षणाच्या संधीतून त्यांनी पूर्ण क्षमतेनिशी प्रगती केली पाहिजे.

(लेखक भारताचे उपराष्ट्रपती आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com