वेण्णाकाठी...(पहाटपावलं)

mahabaleshwar vennakathi
mahabaleshwar vennakathi

आता महाबळेश्वरमध्ये राहिलं आहेच काय, असं मनात कितीही वेळा आलं, तरी त्या स्थळाकडे अधूनमधून पाय वळतातच. अगदी आजही गेली पन्नास वर्षे ही परंपरा माझ्याकडून चालली आहे. इथलं सगळंच आता बदललं आहे. या ठिकाणी सारी स्थित्यंतरं पाहत आलो आहे. इथली माणसं, टोल नाका, पर्यटकांची गर्दी, दुकानं, बाजाराची अरुंद गल्ली, हॉटेल, मोटरगाड्या, खाण्यापिण्याचे ठेले... एखादी लोचट माशी कितीही हाकलली, तरी पुन्हापुन्हा अंगावर बसते तसाच हा विचार! जीव नकोसा करून सोडण्याची अहमहमिका... सारं सारं आता पूर्ण बदललं आहे. बारा महिने-तेरा काळ शांती हरवलेलं वातावरण, भौतिक सुख लुटण्यासाठी तुंबळ गर्दी आणि पैशांची प्रचंड उधळण. बदललाय तो फक्त इथला निसर्ग आणि भव्यदिव्य प्राकृतिक सौंदर्य. खरंतर ती दिव्य अनुभूती घेण्यासाठीच इथं वारंवार यायचं. शक्‍यतोवर गर्दी आणि कोलाहल यांपासून दूर. तसा बेत आखायचा. तसा मार्ग धरायचा...नवा श्वास भरायचा. जमलेला कार्बनचा थर काढून फुफ्फुसं शुद्ध करायची. रक्त ताजंतवानं करायचं. अधनंमधनं "चोक' झालेली कुडी थोडी "ट्युनअप' करायची. 
परवा अशीच हुक्की आली आणि गाडी घेऊन महाबळेश्वरचा रस्ता धरला. पुणे-बंगळूर रस्त्यावरून गाडी चालवताना अंगात उत्साहाची एक वेगळीच शिराणी संचारते. हात, पाय, मन, डोळे साऱ्या देहालाच अधीर असोशी लागून राहते. कधी एकदा महाबळेश्वरचं लावण्यलाघव न्याहाळायला मिळतंय, अशी अवस्था होऊन जाते. प्रत्येक वेळी, प्रत्येक ऋतूत न्यारी अनुभूती. कल्पिताहून अद्‌भुत. 


मनातलं भिरभिरं फिरत असतानाच वाईचा पसरणी घाट ओलांडून वर आलो. पाचगणीत पोचलो. चेहऱ्याला थंड हवेचे झोत स्पर्श करू लागले; पण गाडी चालवताना मात्र हात-पाय लुळे पडत चालले. कारण गाड्यांची गुदमरवणारी गर्दी. लांबच लांब पसरलेल्या रांगा. बेशिस्तीचं उद्वेगजनक प्रदर्शन. "मॅप्रो'च्या आसपासची घामाझोकल... झुंबड. खाण्या-पिण्याची अधाशी खैरात. काय हा भक्षणाचा सोस! हल्ली फक्त जिभेचाच उत्सव साजरा करण्यासाठी माणसं इथं येतात की काय? त्यातही बेहिशेबी नि अनावश्‍यक असलेली अतोनात खरेदी!.. 


मुंगीच्या पावलांनी गाडी पुढं सरकत्येय. पुढं-मागं तीन-चारशे गाड्या. मिनिटाला पाच-सहा इंच आगेकूच. सहज बाजूनं जात असलेल्या एका स्ट्रॉबेरीवाल्याला विचारलं, "कुठवर लागलीय रांग?' "पार वेण्णा लेकपर्यंत गाड्या उभ्या आहेत,' त्यानं माहिती दिली. 
देहामनातला होता नव्हता तो सगळा उत्साह उतरून गेला. 
गाडीच्या विंडशील्डमधून मी पाहतोय फक्त एका अनर्थाची रांगच रांग. येणं कशासाठी - चाललंय काय? 
आणखी अडीच- तीन तास तरी महाबळेश्वर येत नाही. बाहेर प्रचंड कोलाहल आणि गाडीत निराशेचा मनहूस सन्नाटा. मी व्हीलवर हात ठेवून हतबुद्धसा बसून. 
"महाबळेश्वर' या लांबलचक शब्दासाठी इथल्या अंतरशिळावर (milestone) "म'श्वर' अस लघुरूप लिहिलेलं असतं. 
राम गणेश गडकऱ्यांच्या शब्दांतली एक चिरविरही कविता आहे ः 
"कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही... ' 
तशीच काहीशी प्रतिक्रिया आता माझ्या निःस्तब्ध मनात ठेका धरू लागली,- 
"वेण्णाकाठी "म'श्वर आता पहिले उरले नाही...' 
मी अनुभवलेलं "म'श्वर आता केवळ नश्वर म्हणूनच उरलं आहे!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com