श्रद्धांजली : द्रोणाचार्यांच्या भूमिकेत ! 

श्रद्धांजली : द्रोणाचार्यांच्या भूमिकेत ! 

"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी इतिहास असलेली ही चंदेरी दुनिया कुणी आपल्या अभिनयाने पुढे नेली, कुणी आपल्या तंत्रकुशलतेने, तर कुणी सर्जनशील निर्मितीच्या बळावर... अक्षरश: हजारो नामवंत आणि नगण्य कलावंतांनी ही मायावी दुनिया उभी केली. जिनं अवघ्या भारतीय जनमानसावर सत्ता गाजवली. रोशन तनेजा हे यांपैकीच एक अग्रणी कलावंत. त्यांनी पडद्यावर आपले अभिनयकौशल्य अभावानेच दाखवले. पण अभिनेत्यांच्या पिढ्यान्‌पिढ्या तनेजासरांच्या प्रशिक्षणाच्या बळावर मोठ्या झाल्या. एका अर्थाने ते हिंदी चित्रपटसृष्टीचे द्रोणाचार्यच होते. वयाच्या 87व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने मुंबईत देहावसान झाले, तेव्हा आठवणींचा एक प्रदीर्घ पट अनेक कलावंतांच्या मनात उजळला असेल. 

गेल्या शतकात 1970 नंतर चित्रपटांचे बाज बदलत गेले. ग्लॅमरस सिताऱ्यांकडे चलनी नाणे म्हणून पाहिले जाऊ लागले. त्या काळात अभिनय कशाशी खातात, हे जाणणारी माणसे मात्र कमीच होती. 1974च्या सुमारास पुण्याच्या "एफटीआयआय'मध्ये अभिनयकलेचे धडे देणाऱ्या रोशन तनेजा यांनी शबाना आझमी, जया बच्चन, नसीरुद्दीन शाह, राकेश बेदी आदी दमदार कलावंतांना अभिनयाची बाराखडी शिकवली. त्यांच्या अगणित शिष्यांची ही रेघ अगदी रणबीर कपूर किंवा सोनम कपूरपर्यंत ओढता येईल. "झक्‍कास' अदांमुळे फेमस झालेला अनिल कपूर आणि गोविंदा ही तारेमंडळीही त्यांच्याच तालमीत तयार झालेली.

"जगणाऱ्या कुणालाही अभिनय येतोच. त्याला योग्य तसे वळण दिले, तर चांगला अभिनयही येऊ शकतो. अभिनय ही काही दरवेळी दैवदत्त देणगी असतेच असे नाही'' असे ठामपणे मत मांडणाऱ्या तनेजा यांनी "मेथड ऍक्‍टिंग'चे धडे देऊन अभिनेत्यांच्या फळ्याच्या फळ्या उभ्या केल्या. आजमितीस मुंबईत आणि इतरत्र अभिनयाच्या अनेक व्यावसायिक शाळा निघाल्या आहेत. पण तनेजा यांच्या जुहूस्थित शाळेचा लौकिक नेहमीच दशांगुळे वर राहिला, तो त्यांच्या तपसाधनेमुळे. सिडनी पोलॉकसारख्या दिग्गज हॉलिवूड कलावंताकडून अभिनय शिकून आलेल्या तनेजा यांनी आयुष्यभर शिक्षकाची भूमिका पार पाडली, ती सगळ्यांपेक्षा लाजबाब ठरली. म्हणूनच शबाना आझमीसारख्या नामवंत अभिनेत्रीलाही तनेजासरांचे वर्णन "पाया पडावे अशी एकमेव व्यक्‍ती' असे करावेसे वाटले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com