असहिष्णुतेचा बळी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

अमेरिकेतील भारतीय तंत्रज्ञाच्या हत्येतून समोर आलेला "परक्‍या'विषयीचा द्वेष हा अपवादात्मक मानणे फार अवघड आहे. याचे कारण सवंग लोकानुनयाचे राजकारण आणि असहिष्णुता या वातावरणात ती घडली आहे.

"माझ्या देशातून चालता हो', असे ओरडत एका भारतीय तंत्रज्ञावर बेछूटपणे गोळ्या झाडणारा अमेरिकी नाविक आणि हा हल्ला होताच स्वतःचा जीव धोक्‍यात घालून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारा अमेरिकी तरुण, या अमेरिकी महासत्तेतील दोन प्रवृत्ती आहेत, असे म्हणता येईल. चोवीस वर्षांचा इयान ग्रिलोट या तरुणाने हल्ला होत असताना बघ्याची भूमिका घेतली नाही. भारतीयाला मदत करताना तो गोळीबारात जखमी झाला आणि "व्यक्ती कोणत्या वंशाची आहे, याच्याशी मला कर्तव्य नाही. कोणीही स्वाभाविकपणे जे केले असते तेच मी केले', असे नम्रपणे म्हणाला. आपल्या दुरवस्थेला दुसऱ्याला जबाबदार मानणारी आणि हा आपला- तो परका, असा भेद करणारी पहिली प्रवृत्ती, तर फक्त माणूस हीच ओळख मानणारी, सामंजस्य आणि उदारमतवादाला महत्त्व देणारी दुसरी प्रवृत्ती.

अशा परस्परविरोधी प्रवृत्तींचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे मुळात वेगवेगळ्या प्रकारचे दुभंगलेपण अमेरिकेमध्ये दिसत आले आहे. कधी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या पक्षांच्या माध्यमातून ते प्रतीत होते, कधी रंगभेदातून त्याचे अस्तित्व दिसते; तर कधी आधुनिकता आणि स्थितिप्रियता यांतील दरीतूनही ते जाणवते. तरीही तेथील व्यवस्था ज्या व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही या मूल्यांमुळे ओळखली जाते, त्याचीच वीण उसवण्याइतके हे दुभंगलेपण टोकदार आणि सर्वव्यापी होईल, अशी भीती यापूर्वी व्यक्त झाली नव्हती. ती आता मात्र का व्यक्त होत आहे, याचा विचार करायला हवा. वास्तविक, अशा प्रकारचा हल्ला अमेरिकेत पहिल्यांदाच झालेला नाही. आजवर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडून वंशद्वेषातून आणि वर्णद्वेषातून हल्ले झाले आहेत; परंतु त्या त्या वेळच्या अमेरिकी सरकारांनी हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध तत्परतेने निःसंदिग्ध भूमिकाही घेतली.

अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातील क्षुल्लक घटनांवरही ट्विट आणि भाष्य करणाऱ्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अभियंत्याच्या हत्येबद्दल मिठाची गुळणी धरली आहे. त्यांचे हे मौन सूचक आहे. त्यामुळेच या हत्येबद्दल संताप आणि निषेधाबरोबरच मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली. या वंशद्वेषी हल्ल्यात दुर्दैवाने मरण पावलेले श्रीनिवास कुचीभोतला यांच्या पत्नीने "आम्हाला तुम्ही या देशाचे मानता की नाही', असा सवाल विचारला. त्यामागे स्थलांतरितांविषयीच्या द्वेषाचे लक्ष्य ठरल्याची वेदना आहे आणि ट्रम्प सरकारच्या धोरणांबद्दलची नाराजी. या घटनेशी स्थलांतराविषयीच्या धोरणाचा काहीही संबंध नाही, असा खुलासा अमेरिकी प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असला तरी, त्यावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नाही. "सवंग लोकानुनयाच्या राजकारणामुळे अमेरिका, युरोपमध्ये सांस्कृतिक ऱ्हास सुरू असून, अशा हत्यांमधून त्याचीच लक्षणे दिसताहेत', असे युरोपियन पार्लमेंटमधील ब्रिटनच्या सदस्य नीना गिल यांनी म्हटले आहे. सध्याच्या वास्तवावर बोट ठेवणारी ही टिप्पणी महत्त्वाची आहे.

ट्रम्प यांनी तर सारी निवडणूक याच सवंग लोकप्रियतेच्या तंत्राद्वारे जिंकली. आपापल्या वांशिक, सांप्रदायिक, प्रादेशिक अस्मिता जिथे विरघळून जातात, अशा "मेल्टिंग पॉट'ची उपमा अमेरिकी भूमीला दिली जात असे. कोणीही यावे, कष्ट आणि गुणवत्तेच्या जोरावर प्रगती साधावी आणि त्यायोगे अमेरिकेलाही समृद्ध करावे, अशी त्या देशाची प्रतिमा होती. भारतातल्या अनेक तरुणांनी त्या देशाचा मार्ग पत्करला आणि प्रगती साधली. एवढेच नव्हे, तर आजही अनेकांना खुल्या, स्वतंत्र अमेरिकेचे आकर्षण वाटते. श्रम, भांडवल, संस्कृती यांची खुली ये-जा हेच जागतिकीकरणामागचे तत्त्व होते. गेली अनेक वर्षे जगभर अमेरिका त्याचा पुरस्कारही करीत आहे. "अमेरिका फर्स्ट' असा नारा देत ट्रम्प त्या धोरणापासून 180 कोनात बदल करू पाहत आहेत. ते करताना जी बेछूट वक्तव्ये त्यांनी केली, त्याचा दुष्परिणाम समाजात होणार, हे उघड आहे. भारतीयाची हत्या हा त्याचाच परिपाक. अमेरिकी तरुणांमधील रोजगारविहीनतेला केवळ स्थलांतरितच जबाबदार आहेत, असे समीकरण मांडून खुल्या स्पर्धात्मकतेला ट्रम्प तिलांजली देऊ पाहत आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी तेथे जाणारे अनेक भारतीय आहेत. "इन्फोसिस'सारख्या कंपन्या अनेक तंत्रज्ञ, अभियंत्यांना तेथे पाठवितात. पाच वर्षांपर्यंतचा व्हिसा मिळवून काम करणाऱ्यांच्या किमान वेतनाची मर्यादा वाढवून ट्रम्प यांनी एकीकडे भारतीयांच्या संधींना अटकाव करण्याचा आणि दुसरीकडे कर महसूल वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

आपल्या देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्यकर्त्याने प्रयत्न केले पाहिजेत, यात शंका नाही; पण वांशिक दरी वाढविणे, परक्‍यांविषयी द्वेष निर्माण करणे, हे त्यासाठीचे उपाय नाहीत; परंतु सोपी उत्तरे मांडून आपले राजकारण पुढे रेटण्याच्या नादात ट्रम्प यांना हे भान राहिलेले नाही. आपल्या देशातील तरुणांची कार्यात्मक आणि वेतनविषयक स्पर्धात्मकता वाढविण्याचे प्रयत्न करायला ट्रम्प यांचे हात कोणी बांधले आहेत? पण तो दूरचा मार्ग झाला. नुसती भाषणे ठोकून हे घडत नसते. त्यांच्यासारख्या राजकारण्यांना प्रश्‍न विचारलेले आवडत नाही. विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना प्रशासनाच्या अधिकृत पत्रकार परिषदेलाच न बोलावण्याचा पराक्रमही त्यांनी केला आहे. यामागची असहिष्णुता स्पष्ट आहे. भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयीचे गांभीर्य अनेक पटींनी वाढते, ते या पार्श्‍वभूमीवर.

Web Title: victim of intolerance