वन्यजीवही मानू सोयरे!

वन्यजीवही मानू सोयरे!

बिबटे कुठे नाहीत असा प्रश्न पडावा इतके ते सर्वत्र आढळून येत आहेत. पुण्याच्या जवळच काही दिवसांपूर्वी बिबट्या आढळला होता. मुंबईत तर जवळपास रोजच त्यांच्याबद्दलच्या बातम्या येत असतात. कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील शेतात, आसाम आणि तमिळनाडूतील चहाच्या मळ्यांमध्ये आणि राजस्थान, आंध्र प्रदेशातील खडकाळ प्रदेशांतही बिबट्यांनी संसार थाटल्याचं दिसून येतं. जीवशास्त्रज्ञ, प्रशासन आणि प्रसिद्धिमाध्यमे या सर्वांचीच मती गुंग करणाऱ्या या बिबट्यांना घाबरणारी माणसं आहेत, तशीच त्यांच्यावर प्रेम करणारीही माणसं आहेत. मी जीवशास्त्राची अभ्यासक झाले, तेव्हा माणसं जशी मानवी वस्तीत राहतात, तसे वन्यप्राणी जंगलातच राहतात, असा माझाही पूर्वग्रह होता. माझे प्रशिक्षण आणि ‘नॅशनल जिओग्राफिक’सारख्या वाहिन्यांनी आणि पुस्तकांनी हा समज आणखीनच पक्का केला. म्हणून दशकभरापूर्वी दाट मानवी वस्तीतील नगरमध्ये शेतजमिनींवर राहणाऱ्या बिबट्यांच्या अभ्यासाला सुरवात केल्यावर अशा जागीही बिबटे राहू शकतात, हे पाहून आश्‍चर्याचा धक्का बसला आणि भीतीही वाटली; परंतु माणसाच्या वस्तीजवळ राहणाऱ्या वन्यप्राण्यांकडे पाहण्याची माझी दृष्टी पुढे अभ्यासातून पूर्ण बदलली. त्या परिसरात बिबट्यांचे प्रमाण चांगले होते. त्या शेतजमिनींमध्ये त्यांना पिल्लेही होत होती आणि आश्‍चर्य म्हणजे बिबटे तिथं असल्याचं लोकांनाही माहीत होतं ! 

दिवसा शांत असणारे बिबटे रात्री मात्र त्या प्रदेशातील राजेच असतात. ग्रामीण भाग रात्री शांत असतो, रस्त्यांवर चिटपाखरूही नसतं. वन्यप्राण्यांसाठी ते ‘जंगल’च असतं. बिबट्यांना अप्रतिम रात्र-दृष्टी लाभलेली असते आणि आपण त्यांना पाहू शकतो त्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे ते आपल्याला पाहू शकतात. परंतु ते निशाचर असल्याने आणि त्यांचा स्वभाव संकोची, लाजाळू असल्याने त्यांच्याबद्दल आपल्याला खूपच कमी माहिती आहे आणि हेच आपल्या भीतीचं कारणही असावं. 

वन्यजीवांची जबाबदारी असलेल्या वन विभागाला बिबटे, हत्ती आणि माकडांसारख्या हट्टी प्राण्यांना संरक्षित जंगलातच ठेवणे बऱ्याचदा शक्‍य होत नाही. दुर्दैवाने, माणसांचा वावर असलेल्या प्रदेशातील वन्यजीवांसंबंधी होणारे जास्तीत जास्त हस्तक्षेप राजकीय दबावातून घडतात. मानवी वस्तीत आढळणाऱ्या वन्यप्राण्याला जेरबंद करावे किंवा त्याला पकडून इतरत्र सोडावे, असा लोकाग्रह असतो; परंतु माणसांवर हल्ला न करता ग्रामीण भागात राहणाऱ्या वन्यप्राण्याला पकडून दुसऱ्या जंगलात सोडलं, तर तो नव्या जागेत गोंधळून जातो. त्या परिसरातील इतर वन्यप्राण्यांशी त्यांचा संघर्ष होण्याची शक्‍यता असते. तो तेथील माणसांवर हल्ले करू शकतो. 

मुंबई वन विभागाने आपल्या कामाची पद्धत बदलली आणि बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करण्याऐवजी माणसांसोबत काम करायला सुरवात केली. त्यांनी सर्वप्रथम आपली क्षमता वाढवली, नियंत्रण कक्ष स्थापित केला, बचाव पथकांना प्रशिक्षण आणि उपकरणांनी सुसज्ज केलं, इतर कार्यालयांसोबत चांगला समन्वय साधला. नंतर मुंबईच्या बिबट्यांविषयी मूलभूत माहिती मिळविण्यासाठी शास्त्रज्ञांनाही त्यात सामावून घेतलं. याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या वारली या आदिवासी जमातीकडून पर्यावरणीय, सामाजिक तसेच पारंपरिक ज्ञान मिळवलं. ते ज्ञान बिबट्या असलेल्या भागांतील पोलिस, उद्यान परिसरातील संस्था आणि घाबरलेल्या लोकांना देण्यात आलं. लोकांना बिबट्यांच्या अस्तित्वाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेता यावं, या उद्देशाने मुंबई, ठाणे, जुन्नर या परिसरात मोहिमा आखल्या जात आहेत. त्याला जोड हवी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याची. वन्यप्राण्यांबद्दलच्या भीतीची जागा निकोप आदराने घ्यावी, यासाठी आपला परिसर वापरण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे आणि त्यांच्याबद्दलची आपली समज वाढवणे हाच या समस्येवरील एकमेव उपाय आहे. यात मुख्यत्वे वन्यप्राण्यांना हाताळताना येणाऱ्या समस्या सोडविणे आणि त्यांचे नुकसान कमीतकमी होणे, यांचा समावेश आहे. माणसं आणि विविध वन्यजीव एकाच परिसरात राहणं, हे देशाचं एक वैविध्य म्हणावे लागेल. आज आपण काळाच्या अशा एका टप्प्यावर उभे आहोत, जिथून आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. एकतर इतर देशांनी केला तसा वन्यजीवांचा संपूर्ण नायनाट करून आपण पर्यावरणाची हानी करू शकतो, अथवा वन्यजीवांसोबत आपला परिसर ‘शेअर’ करत कसे मजेत राहावे, हे इतरांना दाखवून देऊ शकतो. दुसरा पर्याय अधिक योग्य आहे, नाही काय ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com