मुद्रा : सालस आणि सोज्वळ

संतोष भिंगार्डे | Friday, 16 August 2019

विद्या सिन्हा यांचा चेहरामोहरा आणि अभिनय प्रवृत्ती त्या धाटणीच्या चित्रपटांत घट्ट बसणारी. मीनाकुमारी, नर्गिस, वैजयंतीमाला, माला सिन्हा, जया भादुरी अशा बिनीच्या अभिनेत्री आपल्या अभिनय कौशल्याने पडदा गाजवत असतानाच विद्या सिन्हा ही मूळची मुंबईकर अभिनेत्रीही येथे कमी बजेटच्या, परंतु उत्तमोत्तम चित्रपटांद्वारे दमदारपणे पाऊल रोवून उभी होती. सालस आणि सोज्वळ भूमिका ही त्यांची खासियत.

मुद्रा  
सत्तरच्या दशकात एकीकडे संतप्त तरुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायकांची आणि त्यांच्या मसालापटांची चलती असतानाच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत एक शांत-संयत प्रवाहही वाहत होता. ऋषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य आदींनी बळ दिलेला तो प्रवाह होता मध्यमवर्गीय जाणीवांना आपल्या कवेत घेणारा.

विद्या सिन्हा यांचा चेहरामोहरा आणि अभिनय प्रवृत्ती त्या धाटणीच्या चित्रपटांत घट्ट बसणारी. मीनाकुमारी, नर्गिस, वैजयंतीमाला, माला सिन्हा, जया भादुरी अशा बिनीच्या अभिनेत्री आपल्या अभिनय कौशल्याने पडदा गाजवत असतानाच विद्या सिन्हा ही मूळची मुंबईकर अभिनेत्रीही येथे कमी बजेटच्या, परंतु उत्तमोत्तम चित्रपटांद्वारे दमदारपणे पाऊल रोवून उभी होती. सालस आणि सोज्वळ भूमिका ही त्यांची खासियत. त्याला कदाचित त्यांचे वैयक्तिक आयुष्यही कारणीभूत असावे. नायिकेच्या भूमिकेतून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा त्यांचा विवाह झालेला होता. हे विशेषच म्हणावे लागेल. याचे कारण चित्रपट हा त्यांच्या घरातच होता. त्यांचे वडील राणाप्रताप सिंह हे स्वतः चित्रपट निर्माते होते.

वयाच्या अठराव्या वर्षी या सौंदर्यवतीने ‘मिस मुंबई’ हा किताब जिंकला होता. १९६८ मध्ये व्यंकटेश्वरम्‌ अय्यर यांच्याशी प्रेमविवाह झाल्यानंतर त्या चित्रपटात आल्या. त्याचे नाव होते राजाकाका. साल होते १९७४. तो पडला; पण नंतर आलेल्या ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’, ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटांनी त्यांना नावलौकिक मिळवून दिला. पुढे त्यांनी ‘बिजली’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यात अभिनयही केला. पतीनिधनानंतर सन २००० मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियास्थित डॉ. नेताजी साळुंखे यांच्याशी विवाह केला; परंतु तो फार काळ टिकला नाही. वैयक्तिक आयुष्यात या सालस अभिनेत्रीला मोठा संघर्ष करावा लागला. तब्बल चौदा वर्षांनी विद्याने बॉलीवूडमध्ये फेरप्रवेश केला. काही हिंदी मालिकांतही त्या दिसल्या; पण हा काळ आता त्यांच्यासाठी नव्हताच. त्यांच्या जाण्याने सत्तरच्या दशकातील साध्या, सरळ चित्रपट प्रवाहाचा एक दुवा हरपला आहे.