आनंदात सहभागी (पहाटपावलं)

vinay patrale
vinay patrale

अनेकदा दुखवटा व्यक्त करताना, "तुमच्या दुःखात मी सहभागी आहे,' असा संदेश आपण पाठवतो. एखाद्याच्या घरी एखाद्या प्रियजनाचे निधन झालेले असते, त्याला हा संदेश वाचून बरे वाटते. आपण एकटे नाही, बरेच लोक आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला त्यांचे स्वकीय समजतात. माझ्यावर झालेल्या आघाताची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे मनात कणव येऊन त्यांनी ती व्यक्त केली आहे. वाटल्यामुळे दुःख कमी होते. येणाऱ्या मोबाईलवरील संदेशामुळे थोडे हलके वाटते. हे हलके वाटण्यासाठीच तर पाठवणाऱ्याने "मी सहभागी आहे,' असे म्हटलेले असते. 

दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहानुभूत असणे, हा एक मानवी गुण आहे. "अरेरे, फार वाईट झाले,' अशी प्रतिक्रिया देणे हे सहज आहे. दुःखी व्यक्तीजवळ हे अभिव्यक्त करणे जनरीतीस धरून आहे. पण, या प्रतिसादाला एक वेगळी किनार आहे. मी सुरक्षित आहे... मी आनंदात आहे... तो दुःखात आहे... हे मला आवडणारे आहे. हे व्यक्त करताना तो आवडल्याचा भावपण नकळत डोकावतोय. मी दुसऱ्याचे सांत्वन करताना त्याच्यापेक्षा मूठभर मोठा असल्याची भावना मला सुखावतेय. "हे जे काही आहे, ते त्याला सहन करायचे आहे', हे माझ्यासाठी सुखद आहे. इच्छा असो की नसो... मनाला सूक्ष्म गुदगुल्या करणारे आहे. 
म्हणूनच एका मर्यादेपेक्षा अधिक सहानुभूती मनुष्याला नकोशी वाटते. सहानुभूतीला आकर्षित करणाऱ्या परिस्थितीतून त्याला लवकरात लवकर बाहेर यावेसे वाटते, हेही तितकेच सत्य आहे. 

तुम्ही स्वतःला विचारा. शाळेत असताना एखादा मित्र नापास झाला असेल, तर त्याचे सांत्वन करायला जाणे तुम्हाला अधिक आवडते, की तुमच्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्यास घरी जाऊन त्याचे अभिनंदन करणे अधिक आवडते? माणसाच्या स्वभावाची गंमत अशी आहे. रांगेत खूप मागे नंबर लागल्यास आपल्याला वाईट वाटते. पण आणखी चार- पाच जण आपल्यामागे येऊन उभे राहिल्यास मग तेवढेसे वाईट वाटत नाही. किंबहुना थोडे बरे वाटते. 

दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होताना जशी मनाला एक सुखद किनार सुखावत असते, तसा दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होताना एक वैषम्याचा किडा आतमध्ये कुरतडत असतो. कुठेतरी त्याच्याशी स्वतःची तुलना करीत असतो. थोडासा धूर आतून निघत असतो. "काय समजतोस लेका स्वतःला' असा भाव अजाणता व्यक्त होत असतो. म्हणूनच सफलतेसाठी दुसऱ्याचे अभिनंदन करण्यासाठी जाणारा मनुष्य त्याला तिसऱ्याच्या सफलतेच्या गोष्टी सांगतो. त्यातून त्याला, "तू स्वतःला फार ग्रेट समजू नकोस हा,' हेच सुचवायचे असते. 

खरी मैत्री अथवा खरे प्रेम हे दुःखात सहभागी होणे नसून, ते सुखात सहभागी होण्यात आहे. निर्मळ मनाने एखाद्याच्या गुणवत्तेचे कौतुक करण्यात आहे. चांगल्या बाबींना चांगले म्हणण्यात आहे. मन तुलना करण्याच्या खटपटीत गुंतत असेल, तर त्याला कान पकडून चूप करण्यात आहे. 
गीतेमध्ये "भावसंशुद्धी' हा शब्द आलेला आहे. तो एक प्रकारे मानस तपाचा भाग आहे. दुसऱ्याचे अभिनंदन करताना चेहऱ्यावर हास्य आहेच, मुखात अभिनंदनपर शब्दही आहेत; पण त्याचबरोबर मनामध्येसुद्धा अभिनंदनाचा भाव असला पाहिजे, तर ती भावसंशुद्धी. 

एखाद्यावर आपले प्रेम आहे, अथवा मैत्रीभावना आहे असे वाटत असेल, तर ते ओळखण्याची ही सोपी कसोटी आहे. त्याच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेच; पण त्यापेक्षाही मनापासून आनंदात सहभागी होता आले पाहिजे. सहभागी होताना थोडे स्वतःच्या मनात डोकावून पाहावे. कुठेही दंभाचा अथवा ईर्षेचा अंश आढळला, तर तो निपटून काढावा. हे स्वतःच स्वतःचे ऑपरेशन करण्यासारखे आहे, इतरांना कळण्याचे काही कारण नाही. मनाच्या मर्कटाला एकदा ही सवय लागली, की ते बिचारे सवयीचे गुलाम असते. हळूहळू त्याला प्रत्येकाच्या आनंदाने आनंदी होण्याचे व्यसन लागते. त्याच्या "स्व'चा विस्तार वाढत जातो. त्याची प्रसन्नता मग प्रसंगावर आधारित न राहता स्वतंत्र होत जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com