राज आणि नीती : ऑक्‍सफर्डछाप वैचारिक रॅगिंग

Rashmi-Samant
Rashmi-Samant

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण मानला जातो, ते योग्यच आहे. पण या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम फक्त सरकारच करू शकते हा समज मात्र भाबडेपणाचा ठरतो. सोशल मीडियाचे नियंत्रण करणारे विविध प्लॅटफॉर्म्सचे संचालक कोणती ‘पोस्ट’ प्रकाशित होऊ द्यायची व कोणती नाही, हे ठरवितात तेव्हा ते निखळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मार्गातच भलामोठा अडथळा निर्माण करतात. सायंकाळी उशिरा वा रात्री होणाऱ्या चॅनेलीय चर्चांमधून त्या-त्या चर्चांचे अँकरही एखाद्या पाहुणा म्हणून निमंत्रित केलेल्याचा आवाज लीलया कसा दाबून टाकतात त्याची शेकडो उदाहरणे आपण बघतोच. वृत्तपत्रांच्या संपादकांना संपादकीय विशेषाधिकार असतो. त्याचा वापर करून कोणती बातमी कुठे छापायची, त्यासाठी फाँट कोणता वापरायचा, वृत्ताला किती प्राधान्य द्यायचे वा नाकारायचे, वाचकांची पत्रे किती व कोणती छापायची, हे सर्व संपादकीय समूह ठरवितो. त्यांच्याकडूनही कळत-नकळत इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येऊ शकतो. तसे नसते तर ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रश्‍मी सामंत हिच्या बहुचर्चित राजीनाम्याचे वृत्त आपल्यापर्यंत तपशीलवारपणे पोचले असते. 

ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या युनिवर्सिटी स्टुडंट्‌स युनियनच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या या रश्‍मीला निवडणुकीनंतर लगेचच आभासी माध्यमांमधील झुंडशाहीशी सामना करावा लागला. त्या संघर्षात घायाळ रश्‍मीला अखेर पद सोडावे लागले! हे का घडले? कसे घडले? याची चर्चा निदान मराठी वृत्तपत्रांमधून तरी अपवादानेच घडून आली. एका रश्‍मी (शुक्‍ला)बाबतच्या उलट-सुलट चर्चेने मराठी वृत्तपत्रांचे रकाने भरून निघत असताना दुसऱ्या रश्‍मीवर झालेल्या अन्यायाची वाच्यताही न करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्या/घेतल्याचे उदाहरण खचितच नाही! ब्रिटिश विद्यापीठात प्रवेश घेताना ग्लोबल लीडरशीप फेलो म्हणून निवडलेली रश्‍मी सामंत ही कर्नाटकातल्या उडुपीतली २२ वर्षाची मुलगी, ऑक्‍सफर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी. ती तिच्या कुटुंबातली पहिली पदवीधर. उडुपीच्याच मणिपाल विद्यापीठातून पदवी संपादल्यावर तिने ऑक्‍सफर्ड विद्यापीठात उर्जाविषयक अभ्यासासाठी एमएस्सीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. गेल्या फेब्रुवारीत ऑक्‍सफर्ड युनिवर्सिटी स्टुडंट्‌स युनियनच्या अध्यक्षपदाची निवडणूक रश्‍मीने मोठ्या हिंमतीने लढविली, एकूण ३७००मतदारांपैकी जवळपास २०००विद्यार्थ्यांची मते संपादून विजयीही झाली. ती पदाधिकार स्वीकारतच होती, त्याच वेळी तिच्या विचारांसंदर्भात शंका-कुशंका उपस्थित करून सोशल मीडियावर तिला अक्षरशः सळो की पळो केले गेले. आपल्या हेतूंबद्दल शंका घेण्याच्या या विकृत अभियानामुळे अर्थातच तिची प्रचंड मानहानी झाली. अखेर या स्वाभिमानी भारत-कन्येने अवघ्या सहा दिवसांत, १६ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा राजीनामा अर्थातच तिच्यावर झालेल्या ‘वैचारिक रॅगिंग’ची परिणती म्हणायला हवा. रश्‍मीने अनेक मुलाखतींमधून राजीनामा हा आपल्याला मिळालेल्या वंशभेदकारक वागणुकीचा परिणाम असल्याचे सांगितले. ब्रिटनसारख्या देशात वरवर दिसत नसली तरी वंशभेदाची भावना अजूनही व्याप्त असल्याचे म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी हा मुद्दा राज्यसभेतही उपस्थित केला होता. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या प्रतिसादात ‘‘भारतीयांना मिळणाऱ्या वंशभेदमूलक वागणुकीकडे आपण कानाडोळा करू शकत नाही,’’ असे सांगून हा प्रश्‍न ब्रिटनबरोबरच्या चर्चेत जरूर उपस्थित करू, असे आश्‍वासनही दिले. रश्‍मीला राजीनामा द्यावा लागण्यामागे ज्या दबावतंत्राची भूमिका होती त्याच्या केंद्रस्थानी आहे ती वैचारिक अस्पृश्‍यता आणि असहिष्णुता. त्याचा पुरावा म्हणता येतील, असे अनेक मुद्दे या घटनाक्रमात आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रश्‍मीने प्रचाराचे मुख्य सूत्र ठरविले होते वसाहतकालीन मानसिकतेतून मुक्तीचे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्बन डायॉक्‍साईडच्या उत्सर्गावर नियंत्रण आणण्याचे. (डिकोलोनायझेशन आणि डिकार्बनायझेशन) शक्‍यता आहे, की डिकोलोनायझेशनचा मुद्दा वर्णवर्चस्ववादी भूमिकेचा छुपा पुरस्कार करणाऱ्यांना रूचला नसेल!

रश्‍मी ही विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी लक्षणीय मताधिक्‍याने निवडलेली पहिली भारतीय. तिचा विजय बहुधा प्रस्थापितांना अनपेक्षित आणि न रूचणाराही असेल, असे मानण्यास वाव आहे. कारण निवडणुकीपूर्वी विरोधात काहीही न बोलणारी मंडळी निवडणुकीनंतर मात्र समाजमाध्यमांवरील कुमारवयात तिने लिहिलेल्या पोस्ट्‌सचे भांडवल करून तिच्यावर अक्षरशः तुटून पडली. ही तिची जुनी मतप्रदर्शने अल्लड, असमंजस वयातील आहेत. या संदर्भात तिने विस्तृत स्पष्टीकरण दिल्यानंतर आणि माफी मागितल्यावरही, तिला बाजू मांडण्याची संधी न देता; अत्यंत अलोकतांत्रिक पद्धतीने तिच्यावर दबाव टाकण्याचे तंत्र ऑक्‍सफर्डमधील प्रस्थापित वैचारिक अंमलदारांनी सुरूच ठेवले.

ही वादग्रस्त मतप्रदर्शने खरे म्हणजे जाता जाता मारलेल्या शेऱ्यांसारखीच होती. मलेशियातील उपाहारगृहात तिने काढलेल्या फोटोला ‘चिंगचॅंग’ असे शीर्षक दिले होते, त्याने चिनी समुदाय दुखावल्याचा दावा करण्यात आला. एका लिंगपरिवर्तित महिलेबद्दलची तिची अशीच खूप आधीची टिप्पणी हाही वादग्रस्त विषय ठरला. कहर म्हणजे तिच्या फेसबुकवर तिच्या आई-वडिलांचा फोटो आहे. त्यामागे श्रीरामाचे चित्र असून, त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिले आहे. त्यावरून तिची कौटुंबिक पार्श्‍वभूमी मुसलमानविरोधी असल्याचा बेफाट निष्कर्ष काढून या मुद्द्यावरही तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले.

वैचारिक झुंडशाहीचे दर्शन
हे सर्व समाज-माध्यमीय उत्खननातून हेतूपूर्वक बाहेर काढलेले मुद्दे निवडणुकीनंतर तिच्या विरोधात जे अग्नि-वादळ निर्माण केले, त्यासाठी इंधन म्हणून वापरले गेले. यावर रश्‍मीने स्पष्टीकरणे दिली, अनवधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असेही सांगितले. पण हितसंबंधी गटाच्या वैचारिक अस्पृश्‍यतावादी भूमिकेत तसूभरही फरक पडला नाही. यातला विरोधाभास असा की ऑक्‍सफर्ड स्टुडंट्‌स युनियन कॅंपेन फॉर रेशियल अवेरनेस अँड इक्वालिटी या मंचानेच तिच्याविरुद्ध पद्धतशीरपणे वातावरण तापविले, राजीनाम्यासाठी सर्व प्रकारे दबाव आणला. आपल्या स्वाभिमानाला धक्का देण्याचे प्रकार सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर रश्‍मीने राजीनामा दिला, ऑनलाईन वर्गात दाखल होण्याचा पर्याय निरूपायाने स्वीकारून उडुपीला परतली!

‘परदेशी विद्यापीठातील वर्णवर्चस्ववाद खुलेपणाने समोर येतोय. तिथे एक प्रकारची वैचारिक झुंडशाही आहे. तिच्यापुढे मूलभूत लोकतांत्रिक मूल्यांची अक्षरशः पायमल्ली होते’’, ही रश्‍मीची एका मुलाखतीतील विश्‍लेषणात्मक प्रतिक्रिया परिस्थितीचे गांभीर्य समजण्यास उपयुक्त ठरावी. आश्‍चर्याचा जरी नाही तरी विलक्षण खेदाचा भाग म्हणजे भारतातील व जगातीलही वैचारिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सकाळ-सायंकाळ पत्रके काढणारे रश्‍मी प्रकरणावर गप्प आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेत स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा दावा करून ऊर बडवून घेणारे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक ख्यातकीर्त विद्यापीठातील या मुस्कटदाबीबाबत मौन बाळगून आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्‌स वॉच इ. संघटनांनाही या प्रकरणात रश्‍मीच्या मानवाधिकारांचे हनन झाल्याचे वाटत नाही. या सर्व ‘विचारस्वातंत्र्यवादी’ मंडळींनी या वैचारिक रॅगिंगकडे डोळेझाक करावी हे त्यांच्या दांभिकतेच्या परंपरेला साजेसेच असले तरी त्यामुळे वैचारिक अस्पृश्‍यतेच्या प्रश्‍नाची दाहकता कमी होत नाही. प्रश्‍न अर्थातच रश्‍मी सामंतचा नाही! तिच्यावरील अन्यायाबाबत मौन बाळगणाऱ्यांच्या अहंगंडाचा फुगा अजूनही फुगतोच आहे, काळ सोकावतोय, हा खरा चिंतनीय मुद्दा आहे.
vinays57@gmail.com

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com