राज आणि नीती : तैवानचे ‘नो लॉकडाऊन’ मॉडेल

विनय सहस्रबुद्धे
Thursday, 21 January 2021

तैवानच्या सामाजिक जीवनात सामूहिकतेचे संस्कार पूर्वीपासूनच आहेत. कोरोनाच्या संकटाला तोंड देताना या देशाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, ते  या संस्कारामुळे. संस्थात्मक तत्परता, आपत्ती व्यवस्थापन यातही तैवानचे वेगळेपण उठून दिसते.

तैवानच्या सामाजिक जीवनात सामूहिकतेचे संस्कार पूर्वीपासूनच आहेत. कोरोनाच्या संकटाला तोंड देताना या देशाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले, ते  या संस्कारामुळे. संस्थात्मक तत्परता, आपत्ती व्यवस्थापन यातही तैवानचे वेगळेपण उठून दिसते.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सार्वत्रिक लसीकरण सुरू झाल्याने साथ-नियंत्रणाकडून आपण आता निर्मूलनाकडे वळू लागलो आहोत. यापूर्वीच्या जागतिक महासाथीच्या अनुभवाप्रमाणेच ‘कोविड-१९’च्या बाबतीतही सुरुवातीचे चाचपडणे संपल्यानंतर वैश्‍विक समुदायाने या अभूतपूर्व गुंतागुंतीच्या आव्हानाचा निकराने मुकाबला केला. भारतीय जनतेने आणि भारत सरकारनेही हे आव्हान परिपक्वतेने पेलले. लोकजागृति, लोकसहभाग आणि लोकनिर्धार हे आपल्या कामगिरीचे तीन महत्त्वाचे पैलू म्हणता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरादात्तपणे ज्या पद्धतीने या लोकलढ्याचे नेतृत्व केले, त्यात ‘जान भी, जहाँ भी’ या त्यांनीच मांडलेल्या सूत्राचे मोठे मोल होते. जनतेनेही राष्ट्रीय नेतृत्वाला सर्वतोपरी साथ दिली. प्रतिदशलक्ष बाधित रुग्णांपैकी ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचे आपल्या देशातले प्रमाण जागतिक आकडेवारीशी तुलना करता तळातल्या (सर्वात किमान) काही देशांमध्ये समाविष्ट होते ही गोष्टही उल्लेखनीय आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साथ रोगाच्या लागणीसारख्या संकटांचा मुकाबला करतांना भारताच्या बाबतीत ‘प्रचंड लोकसंख्या’ हा मुद्दा नेहमीच पुढे येतो. छोट्या आकाराच्या व कमी लोकसंख्येच्या देशांना हे तुलनेने सोपे असते. पण प्रश्‍नपत्रिका मुदलातच सोपी असली तरी अभ्यास, परिश्रम, आकलनक्षमता यांना पर्याय नसतोच. ज्या छोट्या देशांनी या भांडवलावर साथ-रोग नियंत्रणात अतिशय उल्लेखनीय यश मिळविले आहे, त्यात चिमुकल्या तैवानचा क्रमांक बराच वरचा आहे. महत्त्वाचे म्हणजे कोराना साथ सुरू झाल्यापासून आजपर्यंत तैवानमध्ये एका दिवसासाठीही लॉकडाऊनची गरज भासली नाही, आणि गेल्या १०-११ महिन्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या फक ८ (आठ) एवढी मर्यादित राहू शकली आहे. तैवानचे हे यशच त्यांनी अनुसरलेल्या ‘तैवान मॉडेल’कडे जगाचे लक्ष वेधून घेते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१७ वर्षांपूर्वी, २००३ मध्ये तैवानने ‘सार्स’ या साथ रोगाचा अनुभव घेतला होता. ‘सार्स’ हा कोरोनाचा चुलत भाऊ म्हणता येईल. त्यावेळी या साथीने त्या देशात एकूण ७३ जणांचे बळी घेतले होते. शिवाय, ‘सार्स’च्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने तैवानची विलक्षण कोंडी केल्यासारखेही झाले. या अनुभवातून शिकून ‘तैवान सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’ या सरकारी संघटनेने साथरोग प्रतिबंधासाठी अनेक कायदेशीर व व्यावहारिक उपायपद्धती निर्माण केल्या. एक नवीन कायदाही त्यानंतर लागू केला गेला. आज या त्यावेळच्या गृहपाठाचा मोठा लाभ तैवानला मिळत आहे. तैवानमध्ये एखाद्या साथरोगाचा प्रादुर्भाव अधिकृतपणे जाहीर केला गेल्यानंतर ‘सेंट्रल एपिडेमिक्‍स कमांड सेंटर’ या त्यांच्या मध्यवर्ती संस्थेला सर्वोच्च अधिकार बहाल केले जातात. ही संस्था आरोग्य खात्याचा भाग असल्याने आरोग्य मंत्र्याला या विशिष्ट विषयाबाबत पंतप्रधानांपेक्षाही अधिक व्यापक अधिकार प्राप्त होतात.

साथ रोगाच्या प्रादुर्भावाची माहिती दडवून ठेवणाऱ्यांना कठोर शासन करणे, तसेच अधिकृत जबाबदारी नसतांना माहिती वितरित करण्यावर प्रतिबंध इ. उपाययोजनाही या देशात कसोशीने अमलात आणल्या जातात. तैवानमधील सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे अडीच कोटी लोकांना आरोग्य-विमा उतरविणे सक्तीचे आहे. या सक्तीच्या विम्यामुळे ज्यांना ज्यांना कोरोना चाचणी करावी लागली त्यांचा तो खर्च वाचला आणि शिवाय विमेदारांची आरोग्यविषयक आणि व्यक्तिगत माहितीही पूर्वीपासूनच संग्रहित असल्याने बाधितांच्या प्रवासांची, स्थलांतरांची व त्यायोगे त्यांच्या संसर्ग-प्रसार क्षमतेची सर्व माहिती व तिचे मॉनिटरिंग शक्‍य झाले.

खासगीपणाला कात्री
चीनमधील वुहान येथील विषाणुविषयक संस्थेने ३१ डिसेंबर २०१९ ला एका अनाकलनीय साथरोग विषाणूबाबत माहिती दिल्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांचे सक्तीचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया अंमलात आणली गेली. फेब्रुवारी महिन्यात आरोग्य मंत्र्यांना आणखी विशेषाधिकार व विशेष निधी बहाल करणारा कायदाही तिथल्या संसदेत तत्परतेने संमत करण्यात आला. तैवान आणि चीन (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) यांचे संबंध मधूर नसले तरी हजारो नागरिकांची परस्परांच्या देशात नित्त्याची जा-ये असते. शिवाय द. कोरिया, जपान, युरोप व अमेरिकेतून जा-ये करणाऱ्यांवर ही कठोर निर्बंध सैल झाले असले तरी परदेशातून येणाऱ्यांना १४ दिवसांचे होम क्वारंटाईन आजही सक्तीचे आहे. ज्यांना सरकारी व्यवस्थेतच राहाणे भाग आहे त्यांना परिसराबाहेर अक्षरशः पाऊलही टाकता येत नाही.

आपल्याकडे ‘आधार’ कार्डाच्या सक्तीबद्दल बरेच प्रश्‍न उपस्थित केले जातात. तैवानमध्येही असे कार्ड आहे, जसे ते अनेक देशांमधून असतेच. या कार्डामुळे नागरिकांच्या प्रवास-इतिहासाचा मागोवा घेत राहाणे व त्यांच्यामुळे होणारे संसर्ग संक्रमण रोखणे; दोन्ही शक्‍य झाले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात इथल्या किनारपट्टीवर डायमंड प्रिन्सेस या अलिशान क्रूझ शिपचा प्रवास झाला होता. यापैकी काही प्रवासी बाधित झाल्याचे लक्षात येताच सर्व तैवानी प्रवाशांच्या सेल फोन क्रमांकाचा डेटाबेस तयार केला गेला व ते जिथे जिथे जातील तिथे अन्य फोन धारकांना एस.एम.एस.द्वारे धोक्‍याची पूर्वसूचना देण्याची यंत्रणा अंमलात आणली गेली. ‘खाजगीपण’ किंवा प्रायव्हसी ही महत्त्वाची; पण सार्वजनिक हितासाठी काहींच्या खाजगीपणाला कात्री लागणे ही तिथे स्वीकारले गेले, हे उल्लेखनीय!

तैवानच्या या यशात त्यांच्या मास्क वापरण्याच्या काटेकोरपणाचाही वाटा आहे. तैवान, जपान, द कोरिया इ. देशातील लोकांना साथ-रोग नसतांनाही मास्क वापरण्याची सवय आहे. जानेवारीअखेरीस या देशाने ६० लाख मास्कचा साठा तयार केला आणि प्रति-व्यक्ती, प्रति-सप्ताह दोन मास्क खरेदी करण्याची मुभा दिली. या मास्कवर ग्राहकाचे नाव घालून ते दिले जातात, त्यामुळे कोणी गैरफायदा घेत नाही वा कोणी वंचितही राहात नाहीत. पहिल्या दोन महिन्यातच तैवान सरकारने मास्क निर्मितीतील ६६ कंपन्यांना उत्पादनाचे लक्ष्य ठरवून दिले. परिणामी हा देश प्रतिदिनी १ कोटी २० लाख मास्कच्या उत्पादनाची झेप घेऊन शकला.

नो लॉकडाऊन आणि मृतांची संख्या दहाच्या आत हे तैवानच्या साथ-रोग विरोधी लढ्याच्या यशातील उल्लेखनीय मुद्दे. साथ-रोगांना आळा घालण्याची संस्थात्मक तत्परता, विविध खात्यातील समन्वय व त्यासाठी आरोग्य खात्याचे निर्विवाद वर्चस्व, आणि पुन्हा सगळे वेगाने पूर्ववत सुरू करायचेय, यावर सार्वत्रिक सहमती हे यशाचे मुख्य घटक आहेत. तैवानच्या आपत्तीव्यवस्थापनाचा कित्ता भारतासह इतरांनी गिरवावा असाच आहे.

‘लवकर निघा, सुरक्षित गाडी चालवा, वेळेवर पोहोचा’ हे जसे रस्ते वाहतुकीला लागू आहे तसेच ते आपत्ती व्यवस्थापनातही महत्त्वाचे आहे. तैवानच्या सामाजिक जीवनात सामूहिकतेचे संस्कार पूर्वीपासून आहेत. तेथील सांस्कृतिक एकजिनसीपणा, लोकतांत्रिक कार्यपद्धतीतही विरोधासाठी विरोध न करण्याची निकोप परंपरा व नेतृत्वाची निर्णायकता यांचाही या यशातील वाटा मान्य केला पाहिजे.
vinays57@gmail.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinay sahasrabuddhe Writes about Taiwan Lockdown Model