esakal | राज आणि नीती : सहभाग प्रश्नात, की उत्तरात?

बोलून बातमी शोधा

Nurse Checking
राज आणि नीती : सहभाग प्रश्नात, की उत्तरात?
sakal_logo
By
विनय सहस्रबुद्धे

कोरोनाचे वास्तव योग्य परिप्रेक्ष्यात समजून घ्यायला हवे. त्याचे वार्तांकनही संयमाने व जबाबदारीने केले पाहिजे. भयाचे वातावरण तयार होणे सध्याच्या लढाईसाठी घातक ठरेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा भयावह आहे! या तडाख्याने मानवी जीवनाची क्षणभंगुरता विलक्षण ठळकपणे तुमच्या आमच्या जाणीवेच्या कक्षांमध्ये आणून उभी केली आहे. संकटकाळात अशा अवचित बसलेल्या तडाख्यामुळे काही काळ आपल्याला भेलकांडल्यासारखे होते आणि क्षणभर काही समजेनासे होते, डोळ्यांसमोर अंधार उभा राहतो आणि जे सामान्यतः स्पष्टपणे दिसायला हवे, तेही दिसेनासे होते. परिणामी कोलाहल वाढतो आणि आपण आणखीनच दिग्‌भ्रमित होतो! अशा स्थितीत काही गोष्टी उद्‌मेखून अन्य कोणी लक्षात आणून दिल्याशिवाय आपल्या ध्यानातच येऊ नयेत, अशी स्थिती निर्माण होते.

कोरोनाविषयक भारतातील परिस्थितीबाबत काहीसे असेच घडताना दिसते आहे. कोरोना संकटाची भयावहता आणि दाहकता आपल्याला दिसते आहे, त्यापेक्षा ती कमी आहे असे मानण्याचे वा कोणी कोणाला सांगण्याचे कारण नाही. पण जगाच्या तुलनेत आपण नेमके कोठे आहोत, हे समजून घ्यायला हवे. २३ एप्रिल २०२१ च्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रतिदशलक्ष बाधितांची संख्या ११,७८५ एवढी आहे. तीच संख्या अमेरिकेच्या बाबतीत ९६,६५१ म्हणजे भारताच्या तुलनेत ८.२० पटींनी अधिक आहे. ब्रिटनमध्ये ही संख्या भारतापेक्षा ५.५२ पटींनी तर जर्मनीत ३.३१ पटींनी अधिक आहे. एक मार्च २०२१ ते २३ एप्रिल २०२१ या काळात बहुसंख्य देशांनी कमीअधिक फरकांच्या कालावधीत कोरोनाच्या नव्या लाटेची दाहकता अनुभवली. साहजिकच अनेक ठिकाणी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. भारत, या विशिष्ट कालावधीत रुग्णसंख्यावाढीच्या संदर्भात १०५ क्रमांकावर आहे. फ्रान्स १८ व्या, तर ब्रिटन ३८व्या क्रमांकावर आहे. हीच गोष्ट कोरोनाच्या या लाटेत बळी पडलेल्यांच्या संदर्भात आहे. फेब्रुवारी २४ ते एप्रिल २३ या काळात भारतातील मृत्यूंची संख्या प्रतिदशलक्ष १३७.३५ एवढी आहे, तर ब्रिटनमध्ये ही संख्या १८८०.१८ आणि अमेरिकेत १७२५.६६ एवढी आहे! प्रतिदशलक्ष मृत्यूंच्या संख्येच्या संदर्भात जागतिक क्रमवारीत अमेरिका १५व्या स्थानावर, तर भारत १०७व्या, हे लक्षात घ्यायला हवे.

भारतातील कोरोनाबळींची संख्या अचानक वाढल्यामुळे स्मशानांमधून रचल्या जाणाऱ्या सरणांची संख्याही वाढली. चितांच्या ज्वाळांची भेसूर छायाचित्रे प्रकाशित करून अमेरिकेतील व काही युरोपीय देशांमधील वृत्तपत्रांनी काहीसे भडक आणि बरेचसे यउठवळ वार्तांकन केले; पण प्रत्यक्ष त्या देशांमधील आकडेवारी काय सांगते? साथ-रोग संशोधनात निश्‍चितपणे बाधितांच्या संख्येपैकी किती जण अंतिमतः रोगाला बळी पडतात, त्या संदर्भातली आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. यालाच बाधित मृत्यूदर म्हणतात. २४ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, भारतातील बाधित दर १.१३% आहे.अमेरिकेत तो १.७५% तर ब्रिटनमध्ये २.८९% आहे.

आपण नेमके कुठे आहोत?

ही संख्याशास्त्रीय माहिती देण्याचा उद्देश संकटाची भयावहता कमी लेखण्याचा नाही. ही कोरडी, भावनाशून्य आकडेवारी ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत, त्यांचे सांत्वन करू शकणार नाही हेही खरेच! पण संकटकाळात ‘भीती’नेदेखील फार मोठी सामाजिक- मानसिक हानी होत असते. ही सामाजिक भयकंपितता कमी होऊन धैर्याने, सर्वांनीच या संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध व्हायचे असेल, तर आपण नेमके कुठे आहोत? हे समजायला हवे व त्यासाठी ही आकडेवारी. जन-मानसातील या भीतीचे एक कारण गैरसमजुतींचा पगडा हेदेखील आहे. रेमडेसिव्हिर या औषधाच्या संदर्भात, ते घेतल्याशिवाय तरणोपाय नाही अशी एक खूप घट्ट, प्रचलित गैरसमजूत आहे. प्राणवायूच्या गरजेच्या संदर्भातही विशिष्ट दाबाचा प्रवाह असलेला प्राणवायू विशेष गंभीर रुग्णांसाठीच वापरायला हवा, असा वैद्यकशास्त्रीय संकेत आहे, असे तज्ज्ञ सांगतात. या अनुषंगाने विचार केल्यास प्राणवायू पुरवठ्याच्या संदर्भातही आजाराच्या गंभीरतेनुसार रुग्णांची वर्गवारी करून प्राणवायू व्यवस्थापन केले तर उपलब्ध प्राणवायू पुरवून-पुरवून वापरता येऊ शकतो. पण भीतीचा पगडा असलेल्या अवस्थेत विवेकाचा विचार मागे पडतो आणि साध्या-साध्या उपायांचेही विस्मरण होते.

समाजमनावर भीतीची गडद-काळी छाया जमा होण्यात प्रसारमाध्यमांचाही मोठा वाटा आहे. ‘कोरोनाचा कहर’, ‘मृत्यूचे तांडव’ किंवा ‘रुग्णसंख्येचा विस्फोट'' या प्रकारची वृत्तशीर्षे (हेडलाईन्स) वास्तवाला पूर्णपणे सोडून नसतीलही कदाचित; पण हे वास्तव - सत्याचा अपलाप न करता - कमी भीतीदायक शब्दरचनेत मांडता येते हे वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या कधी लक्षात घेणार? शासनावर टीका करणे, दोष दाखवून देणे, हे वृत्तपत्रांचे कामच आहे. पण ते करत असताना भयग्रस्त समाजाला दिलासा देणे, हेदेखील माध्यमांचे कर्तव्य ठरते. बहुसंख्य वृत्तवाहिन्यांना त्याचे आज भान दिसत नाही. संकटकाळात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या प्रमुख स्तंभांनी पोक्तपणे विचार करून प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. पण दिल्ली उच्च न्यायालयाने एकीकडे न्याययंत्रणेतील रुग्णांसाठी `अशोका’ हॉटेल ताब्यात घेऊन व्ही.आय.पी. रुग्णालय तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगामुळेच कोरोनाची दुसरी लाट आल्याचे निरीक्षण नोंदवून टीकेचे आसूड ओढले आहेत.

या संदर्भात गेल्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुकींपूर्वी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना ‘डिजिटल निवडणूक प्रचारावर’ भर देण्याचे जे आवाहन केले होते, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया उल्लेखनीय आहेत. जुलै २०२० मध्ये आयोगाने बोलाविलेल्या बैठकीत कॉंग्रेस, राजद आणि तिन्ही कम्युनिस्ट पक्षांनी जनसभा आणि पदयात्रांऐवजी डिजिटल प्रचारावर भर देण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता.अशा स्थितीत निवडणूक आयोगाने फेब्रुवारीच्या अखेरीस जाहीर केलेल्या कार्यक्रमात पारंपारिक प्रचाराला मुभा देणे स्वाभाविक होते. देशभरातील कोरोना लाटेचे खापर पूर्णपणे भाजपाच्या प्रचारावर फोडणारी मंडळी या वास्तवाकडे सपशेल डोळेझाक करीत आहेत!

एकूणच या पार्श्‍वभूमीवर नागपूरच्या शिवानी दाणी-वाखरे या कार्यकर्तीने कथन केलेली नारायण दाभाडकर या ८५वर्षीय ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाची कहाणी मन हेलावणारी आणि सज्जनशक्तीविषयी विश्‍वास जागविणारी आहे. त्यांना करोना उपचारांसाठी रुग्णालयात महत्प्रयासाने प्रवेश मिळाला असताना, आपला बेड एका तरुण रुग्णाला दिला. `माझे जीवन जगून झाले आहे. माझ्यापेक्षा या दोन लहानग्यांच्या पित्याला ऑक्‍सिजन-बेडची गरज आहे’ असे सांगून त्यांनी स्वतः घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. दोन-तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला; पण एक आदर्श उदाहरण समोर ठेवून ते गेले. कोरोना आणि देश, काल स्थितीचा विचार करताना ही सज्जनशक्ती आजही शाबूत आहे, ही जाणीव मनाला विलक्षण उभारी देणारी आहे, खचितच!

या सर्व पार्श्वभूमीवर सरकार, स्वयंसेवी व सामाजिक संघटना आणि इतर अनेक जण आपापल्या परीने कोरोनाच्या अक्राळविक्राळ समस्येशी लढत असताना आपण एक नागरिक म्हणून समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपापल्या परीने काम करणार, की समस्येच्या जटिलतेत भर पडेल, असे वर्तन करून आणखी अडचणी निर्माण करणार? मुद्दा स्पष्ट आहे! नागरिक या नात्याने आपला सहभाग कशात? प्रश्नात, की प्रश्नांच्या उत्तरात?

vinays57@gmail.com