विशारदाचे ‘शल्य’ विवेक मूर्ती (नाममुद्रा)

सारंग खानापूरकर 
सोमवार, 24 एप्रिल 2017

अमेरिकेच्या "सर्जन जनरल' पदावरून हटविले गेल्यामुळे भारतीय वंशाचे डॉक्‍टर विवेक मूर्ती (वय 39) सध्या चर्चेत आहेत. इतक्‍या लहान वयात "सर्जन जनरल'सारख्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे आणि नंतर शस्त्रास्त्र नियंत्रण धोरणाचा जोरदार पुरस्कार करणारे म्हणून ते अमेरिकी जनतेला परिचित आहेत. वास्तविक हे पद राजकीयदृष्ट्या वादाचे ठरण्याचे कारण नव्हते; परंतु "ओबामा केअर' या योजनेचे खंदे पाठीराखे असल्याने नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ते खुपू लागले असावेत. 

मूर्ती हे अमेरिकेचे "सर्जन जनरल' झालेले भारतीय वंशाचे पहिलेच. अमेरिकेच्या "पब्लिक हेल्थ सर्व्हिस कमिशन्ड कॅडेट'मध्ये ते व्हाइस ऍडमिरल या पदावरही आहेत. "सर्जन जनरल' हे पद गेले असले तरी ते व्हाइस ऍडमिरल या पदावर कायम राहणार आहेत. कर्नाटकातून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या कुटुंबामध्ये मूर्ती यांचा जन्म झाला. येथील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यपीठातून त्यांनी जैवरसायन शास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी एमडी आणि आरोग्य व्यवस्थापन शास्त्राचीही पदवी घेतली. विद्यार्थी असतानाच "व्हिजन्स वर्ल्डवाइड' या संस्थेची स्थापना करत त्यांनी भारत आणि अमेरिकेतील एड्‌सग्रस्त बालकांच्या शिक्षणावर भर दिला. अमेरिकेतील आरोग्य सेवांमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या डॉक्‍टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचा "डॉक्‍टर्स फॉर ओबामा' हा गटही स्थापन करत जगजागृती मोहीम राबविली. या कामामुळे प्रभावित होत तत्कालीन अध्यक्ष ओबामा यांनी 2011 मध्ये त्यांची देशाच्या आरोग्यविषयक सल्लागार मंडळावर नियुक्ती केली. रुग्णांवर होणाऱ्या उपचारांमध्ये तत्परता यावी आणि त्यांचा दर्जाही सुधारावा, यासाठीही त्यांनी कार्य केले. 2014 मध्ये अनेक राजकीय नेत्यांचा विरोध असूनही ओबामा यांनी सर्जन जनरल पदावर मूर्ती यांना नेमले. 

तेथे त्यांना अनेक नव्या योजना राबवायच्या होत्या. नागरिकांमध्ये वाढत असलेल्या स्थूलतेबाबत जनजागृती करत त्यावर परिणामकारक उपचारपद्धती राबविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. डॉक्‍टरांनी क्‍लिनिक/रुग्णालयापुरता स्वत:चा व्यवसाय न ठेवता सामाजिक दृष्टीकोन जपावा, असे त्यांनी आवाहन केले होते. अनेक रोग हे केवळ वैयक्तिक कारणांमुळे निर्माण न होता, त्यासाठी तुमच्या सभोवतालचे सामाजिक आणि आर्थिक स्थिती जबाबदार असते, असे त्यांचे मत होते. चार वर्षांचा कालावधी त्यांना दिला असताना केवळ अडीच वर्षांतच या पदावरून हटविले गेल्यामुळे, त्यांना काही सुधारणांसाठी सुरवात करता आली, पण त्यांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास वेळ मिळाला नाही. 

Web Title: Vivek Murthy urgeon General of the United States of America