प्रशासकीय निर्णयांसाठीही 'वॉर गेमिंग'

notes-500
notes-500

संभाव्य परिणामांची आधीच कल्पना असेल, तर परिस्थिती सहजतेने हाताळता येते. नोटाबंदीमुळे उद्‌भविणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला असता तर ते अधिक योग्य ठरले असते. अशा वेळी "वॉर गेमिंग'चे तंत्र उपयुक्त ठरू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी अचानक पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाला सामोरे जाणे अनेकांना कठीण जात असले, तरी "अच्छे दिन' येतील, या आशेवर ही अपरिहार्यता त्यांनी स्वीकारली आहे. सुरवातीच्या काही दिवसांत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बॅंकेत जमा होणारा पैसा पाहिला, तर त्यावरून खूप पैसा (काळा व पांढरा- दोन्ही) व्यवहारात आहे, असे निदर्शनास येते. पुढील काळात लोकांनी अधिकाधिक प्लॅस्टिक मनीचा वापर करणे अपेक्षित आहे. त्यायोगे, एकूणच अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होईल.


या निर्णयाची दुसरी बाजू म्हणजे, नव्या नोटा मिळवताना आणि बहुतांशवेळा बंद असलेल्या "एटीएम'ला तोंड देताना नागरिकांना बऱ्याच अडचणींतून जावे लागले. त्याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही बॅंका आणि "एटीएम'समोरची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचेही दिसले. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे तयारीत नव्हती, हेही साहजिक आहे. त्यातील एक कारण या निर्णयाबद्दल गोपनीयता राखणे, हेही असू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करणे शक्‍य नव्हते. त्याचवेळी, सरकारला नोटाबंदीमुळे उद्‌भवणाऱ्या समस्येची व्यापकता लक्षात आली नसावी, असेही दिसते. विशेषतः मोदी प्रशासनाच्या, जे तंत्रज्ञानप्रेमी आणि सुशासनासाठी तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करतात, या संभाव्य परिणामांचा विचार त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला असता, तर ती गोष्ट अधिक योग्य ठरली असती.
थोडक्‍यात, सरकारने खूप आधीच (गोपनीयतेची खबरदारी घेऊन) निर्णयाची "खेळी' खेळायला हवी होती. जगभरातील सर्व सैन्यदले "वॉर गेमिंग' तंत्राचा वापर करतात. शत्रूपक्षाची पुढील चाल लक्षात घेऊन त्यानुसार रणनीती आखण्यासाठी हे तंत्र महत्त्वाचे ठरते. या तंत्राने मिळालेली सगळीच उत्तरे नेहमीच अचूक असतील असे नाही, पण भविष्यातील धोके समजून घेण्यासाठी ती नक्कीच उपयुक्त ठरतात. आजकाल अशा प्रकारची तंत्रे इतर अनेक क्षेत्रांतही निर्णय घेताना मदतीसाठी वापरली जात आहेत. लष्कराशिवाय सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातही "वॉर गेमिंग' तंत्राची उपयुक्तता सिद्ध होत आहे. ही तंत्रे "क्रायिसस गेमिंग' किंवा "पॉलिटिको-मिलिटरी गेमिंग' म्हणूनही ओळखली जातात.


खरे तर, "वॉर गेमिंग' किंवा "क्रायसिस गेमिंग' ही संकल्पना अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. मुख्यत्वेकरून, "रॅंड कॉर्पोरेशन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या "थिंक टॅंक'ने 1950 च्या दशकात ही संकल्पना विकसित केली होती. पुढे मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नोलॉजी (एमआयटी) येथे ती आणखी स्पष्टपणे विस्तारली गेली. कोणताही गेमिंग एक्‍सरसाइज हा निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे उद्‌भविणाऱ्या अनपेक्षित, आकस्मिक गोष्टी उलगडण्यासाठी फायदेशीर ठरतो. उदाहरणार्थ, एखाद्या शहरात विशिष्ट आजाराची साथ पसरण्याची शक्‍यता असल्याची कल्पना मिळाली, तर "वॉर गेमिंग'साठी वेगवेगळ्या परिस्थितींचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे विचार करावा लागेल. हजार लोकांना या आजाराची बाधा झाली आहे, हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्डांची संख्या मर्यादित आहे, या आजारांवरील औषधोपचारांचा साठ्याचा तुटवडा आहे, अशा सर्व शक्‍यता गृहीत धरून आरोग्य मंत्रालय, डॉक्‍टर, केमिस्ट, औषधनिर्माण उद्योग, सामाजिक कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे, पोलिस, पर्यटन क्षेत्र आदी क्षेत्रांतील प्रतिनिधींना, त्यांच्या क्षेत्रात काय उपाय करता येऊ शकतात, हे सुचवण्यास सांगितले जाते. अशी परिस्थिती हाताळण्यास संबंधित यंत्रणेला काय मर्यादा येऊ शकतील, प्रत्येक क्षेत्रावर त्याचा कसा परिणाम होईल, अशा सर्व शक्‍यतांचा ऊहापोह यात केला जातो. अशा वैचारिक घुसळणीतून मग तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांची संख्या वाढवायला हवी, पुरेशा लशी उपलब्ध नाहीत (परदेशातून मागवाव्या लागतील) असे काही चांगले उपायही समोर येतात.


राजकीय आणि आर्थिक निर्णय घेताना अशी "सिनॅरिओ-बिल्डिंग' तंत्रे उपयोगी ठरतात. अशा प्रकारच्या सरावासाठी, ही तंत्रे विकसित करण्यासाठी आणि चालविण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाधारित ऍप्लिकेशन्सवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. आज विविध क्षेत्रांत "सर्जिकल स्ट्राइक'चा वापरण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा अशा स्ट्राइकपूर्वी भविष्यातील परिणामांचा अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते.
नोटाबंदीच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर "वॉर गेमिंग'च्या मदतीने या निर्णयामुळे उद्‌भवणारी परिस्थिती राजकीय, कायदा व सुव्यवस्था, चलन व्यवस्था अशा सर्व पातळ्यांवर योग्यरीत्या, सहजतेने हाताळण्यासाठी सरकार सक्षम आहे की नाही, हे ओळखून त्याचा अभ्यास करता येतो. साहजिकच, चलनातील 85 टक्‍क्‍यांहून अधिक मूल्याच्या नोटा रद्द करताना संभाव्य आव्हानांची चर्चा हा निर्णय घेणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींनी केली असेल. अशा चर्चेत काय करायला हवे, यावर अधिक भर असतो. मात्र, "मॉडेलिंग आणि सिम्युलेशन' किंवा "क्रायासिस टेकनिक्‍स'मध्ये कसे करायला हवे, हे सांगितले जाते. "एटीएम'मध्ये दोन हजाराची नोट टाकताना उद्‌भवतील अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारणे आवश्‍यकच होते. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या बॅंकांमध्ये पुरेशी रक्‍कम पोचविण्यासाठी अतिरिक्त सुरक्षारक्षकांची गरज असल्याचे आधीच लक्षात आले असेल. पर्यटनासारख्या इतर अनेक उद्योग क्षेत्रांवर याचा काय परिणाम होईल, यावरही यात प्रकाश टाकला गेला असेल. कदाचित, परदेशी पर्यटकांकडून राष्ट्रीय स्मारकांच्या ठिकाणी जुने चलन (म्हणजे तिकिटाचा दर पाचशे रुपयांपर्यंत मर्यादित ठेवला गेला असल्यास) स्वीकारण्याचा पर्याय त्यातूनच आलेला असू शकतो.


आज सरकारला "मॉडेलिंग अँड सिम्युलेशन' आणि "गेमिंग टेक्‍निक'सारख्या विश्‍लेषणात्मक पद्धतींमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता आहे. याचा उपयोग भविष्याचा वेध घेण्यासाठी, धोरणात्मक निर्णय त्वरित घेण्यासाठी आणि योग्य ते धोरणात्मक बदल सुचविण्यासाठी होऊ शकेल. "एटीएम'समोरच्या रांगा का आहेत हे समजून घेण्यासाठी कारणे शोधणे हे काही "रॉकेट सायन्स' नाही, पण संभाव्य परिणामांची आधीच कल्पना असेल, तर परिस्थिती सहजतेने हाताळता येऊ शकते. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये "गेमिंग'चे साधे साधे सराव केल्यास अनेक अनपेक्षित आव्हाने समोर येतील आणि त्यावर मात करण्यासाठी रणनीती आखता येऊ शकेल.
(अनुवाद : सोनाली बोराटे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com