शिस्तीचा मार्ग प्रशस्त (परिमळ)

सिसिलिया कार्व्हालो
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

छोट्या-छोट्या गोष्टीत मोठे आनंद दडलेले असतात. असे क्षण आपल्याला पदोपदी भेटत असतात. परंतु, तो क्षण ओलांडल्यानंतर अनेकदा त्याचं महत्त्व पटतं. तथापि, काही जणांनी मात्र त्या क्षणांचं महत्त्व बरोबर ओळखलेलं असतं. रस्त्यात पडलेला अडथळा- मग तो कचऱ्याच्या पिशवीचा का असेना, उचलून कचरा पेटीत टाकून देणाऱ्याबद्दल आपण मनातल्या मनात कौतुक करतो. परंतु आपण स्वतः मात्र आपल्याच कंबरेतून वाकून ते उचलण्याची तसदी पुढच्या वेळी का होईना घेतली; तर ते आपल्यातील परिवर्तन असते. एका छोट्याशा गोष्टीने आपल्यात घडवलेले ते परिवर्तन असल्याने; ती खूप मोठी गोष्ट असते.

छोट्या-छोट्या गोष्टीत मोठे आनंद दडलेले असतात. असे क्षण आपल्याला पदोपदी भेटत असतात. परंतु, तो क्षण ओलांडल्यानंतर अनेकदा त्याचं महत्त्व पटतं. तथापि, काही जणांनी मात्र त्या क्षणांचं महत्त्व बरोबर ओळखलेलं असतं. रस्त्यात पडलेला अडथळा- मग तो कचऱ्याच्या पिशवीचा का असेना, उचलून कचरा पेटीत टाकून देणाऱ्याबद्दल आपण मनातल्या मनात कौतुक करतो. परंतु आपण स्वतः मात्र आपल्याच कंबरेतून वाकून ते उचलण्याची तसदी पुढच्या वेळी का होईना घेतली; तर ते आपल्यातील परिवर्तन असते. एका छोट्याशा गोष्टीने आपल्यात घडवलेले ते परिवर्तन असल्याने; ती खूप मोठी गोष्ट असते. प्रदूषणात सहभागी व्हायचं नाही; म्हणून ‘आम्ही या वर्षी फटाके जाळलेच नाहीत’ असे म्हणणाऱ्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांनी कितीतरी मोठं कार्य केलेले असते. आपल्या आवाक्‍यात येणारी अशी छोटी छोटी कामे म्हणजे आपल्या मनाची शिस्त असते. ही शिस्तच आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करीत जाते.

‘स्मॉल इज ब्युटिफूल’ (१९७३) या ई. एफ. शूमाकरच्या पुस्तकात त्यांनी अर्थशास्त्रीय लेख संकलित केलेले आहेत. त्यात छोट्या-छोट्या गोष्टीतील काटकसर किती आवश्‍यक असते, याविषयीचे विचार सांगत असताना ‘एखाद्या वस्तूचा कमीत कमी उपभोग अर्थात प्रमाणबद्ध उपभोग हा जास्तीत जास्त आनंदाकडे नेतो’ असे म्हटले आहे. हे विचार आपल्याला महात्मा गांधींच्या ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्त्वाकडे नेतात. तसेच ‘हे विश्‍व आपल्या गरजेसाठी पुरेसे आहे; परंतु, आपल्या हावेसाठी अपुरे असल्याच्या’ महात्मा गांधीजींच्या विचारांची आठवण करून देतात. याच विचारांचे प्रत्यंतर महात्मा गांधींच्या आचरणात होते.

एकदा रस्त्याने चालताना महात्मा गांधीजींनी पाहिले; की एक गृहस्थ रस्त्यात थुंकला. त्यांनी त्याची थुंकी रुमालाने उचलली होती; आपला देश हे आपले घर आहे. आपल्या घरात जसं आपण वाट्टेल तेथे थुंकत नाहीत; तर मग आपण रस्त्यात तरी का थुंकावे, हा संदेश गांधीजींनी किती साध्या गोष्टीतून दिला!

आर्य चाणक्‍यांची गोष्ट आठवते. एकदा रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात आर्य चाणक्‍य आपले काम करीत बसले होते; त्यांचा मित्र त्यांना भेटायला आला; तेव्हा त्यांनी एक दिवा विझवला आणि दुसरा लावला. तेव्हा त्यांचा मित्र त्यांना म्हणाला, ‘तू असे का केलेस?’ आर्य चाणक्‍य म्हणाले, की आधीचा दिवा हा सरकारी मोबदल्यातून जाळलेला दिवा होता. तेव्हा मी सरकारी काम करीत होतो. आता तू आल्यावर माझे वैयक्तिक बोलणे चालले आहे. त्यामुळे आती मी माझ्या स्वतःच्या पैशावर असलेल्या तेलाचा दिवा जाळत आहे. किती हे प्रामाणिकपण आणि किती ही तत्त्वनिष्ठा! या तत्त्वनिष्ठेच्या दिव्याच्या प्रकाशात आपल्यासारख्या सामान्य माणसांचेही मार्ग उजळत राहतात.

Web Title: way way of discipline