आम्ही चाकरमानी! (ढिंग टांग)

आम्ही चाकरमानी! (ढिंग टांग)

प्रति,
मुख्येमंत्री, महाराष्ट्र राज्य
रा. मलबार हिल्ल, बॉम्बे-1.

प्रत रवाना : 1. शेठ शामळदास किराना-भुसारवाले (12 ह. रुपये) 2. सुवर्णलंकार पतपेढी (24 ह.)3. श्री मन्या सुतनाडे ऊर्फ मन्याभाई (5 ह.) 4. श्री. मनुगोंडा पाटील (सासरे) (दीड लाख ह.) 5. बरेच दोस्त लोक! (टोटल 33 ह.)...विस्मरणात गेलेल्यांसी नुसताच णमस्कार.

विषय : आजी-माजी आमदारांच्या पगारवाढीबाबत तातडीने हालचाल करणेबाबत.

पत्र लिहिन्यास कारन कां की तुमचे उपकार कसे माणू, हेच कळत नाही. आजी आमदारांना लाख-दीड लाख पगार वाढवून माजी आमदारांनी अर्धा लाख पेन्शन देण्याचे विधेयक आपन (मागल्या दाराने) आनून इमिजिएट मंजुरी दिल्याचे वृत्त ऐकून हर्षवायू झाला. आणंद गगणात मावेणा, आनि गगण ठेंगने, अशी आवस्था झाली!! बसल्याजागी आपल्याला माहे पण्णास हजार भेटणार, हे कळल्यावर मला काही कळेनासे झाले. थोड्या वेळाने घान वास आल्याने मी भानावर आलो. आमचे सासरे मनुगोंडा पाटील हे त्यांची चेप्पल माझ्या नाकाला लावत होते. 


नानासाहेब, मी एक साधासुधा सिंपल माजी आमदार आहे. लोकसेवा करन्यात माझी हयात गेली. लोकांनीच मला निवडून बॉम्बेला पाठवले होते. मी जरा ज्यास्तच लोकशेवा केल्याने ते लोकान्ला पसंद आले नाही व त्यांनीच मला फुडच्या टर्मला घरी बशिवले. कमाई बंद झाली. माल है, तो ताल है अशे म्हंटात, ते खरेच आहे. तुटपुंजी मिळकत आनि खायला तोंडे डझनावारी...कसे जुळवावे? ह्या विवंचणेत असताणाच ही रेवडीसारखी गोड गोड बातमी आली. चेहरे चुकवत गपचिप हिंडनाऱ्या कर्जबाजारी मान्साला अचानक बंपर लॉटरी लागल्यावर जशे वाटेल, तश्‍शेच्या तश्‍शे मला वाटत आहे. थॅंक्‍यू! 


काय करावे? कसे करावे? ह्याचाच विच्यार करत बसलो होतो. पेन्शन-पगारवाढीची बातमी काणावर आली नव्हती. तेवढ्यात पैलाच फोण शामळदास शेठ ह्यांचा आला. नाक्‍यावर त्यांचे किरानाभुसाराचे दुकाण आहे. पन गत काही महिण्यांपासून त्यांनी आपल्याला डाळ-तांदूळ-तेल देन्याचे बंद केले. "उधारी थकली, सबब राशन बंद‘ असे कारन दिले. पन कालच्या रोजी त्यांनी स्वत: फोण करुन किराना घेऊन जान्यास सांगितले. माहे पण्णास हजार आमदनी असलेल्या मानसाला क्रेडिट देने आपली डूटीच आहे, असे तो गोडबोल्या शेठ म्हनत होता. पाठुपाठ आमचे सासरे इरगोंडा (त्यान्ला सगळे बापसाहेब म्हंतात!) "काही आडचन नाही णा?‘ असे स्वत:हून विचारत आले. म्हातारा एताणा म्हैसूरपाकाचा बॉक्‍स पन घेऊण आला होता!! नाकावरची चेप्पल न काढताच त्यांनी ही गोड बातमी मला सांगितली. लगुलग मन्याभाईने दाराबाहेरूनच मला हटकून ""क्‍या भाई, महोब्बत कम हो गई क्‍या?‘‘ असे सलगीने विचारले. गेल्याच आठवड्‌यात "*** माझे पाच हजार टाक! नाय तर बगतो तुला!‘‘ असा दम त्याणे कॉलर धरून दिला होता. आमच्या पतपेढीचे संचालक रा. गंगाराम मनीवार ह्यांनी "काय लागलं तर आपन आहोत‘ असा मेसेज पाठवला. दोस्त लोकांनी "कोंबडं कधी कापता? श्रावणाला मारा गोळी!‘‘ असा सल्ला दिला. एकंदर सगळे गोडीगुलाबीने वागू लागले आहेत. हे सारे आपल्यामुळे घडले, नानासाहेब!!
आमदाराला काहीही खर्चपानी नसतो, हा गैरसमज कोनी पसरवला? हे सरासर चूक आहे. करदात्यांचा घामाचा पैसा आजी-माजी आमदारांवर का उधळता? असे लोक विचारत आहेत, असे ऐकले. साहेब, त्यांचे काहीही ऐकू नका. माजी आमदारांना जाम काम राहात असते. आम्ही लोकप्रतिनिधी हे चाकरमानीच असतो. जन्तेची चाकरी करुन मानाने राहाने, हे आमचे काम आहे. आम्ही मानाने राहावे, हे करदात्यांचे काम आहे!! प्रेस्टिज नावाची काही गोष्ट आहे की नाही? तेव्हा काहीही झाले तरी आमचे पगार-पेन्शन कमी करू नका, महागाई जाम वाढली आहे. पुन्हा थॅंक्‍यू! आपलाच. एक माजी आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com