शस्त्र'क्रिया (अग्रलेख)

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

आक्रमक कारवाई करून पाकिस्तानने चालविलेल्या छुप्या युद्धाला भारताने उघड प्रत्युत्तर दिले आहे. यातून दिसलेला कणखरपणा हा पाकिस्तानसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे.

आक्रमक कारवाई करून पाकिस्तानने चालविलेल्या छुप्या युद्धाला भारताने उघड प्रत्युत्तर दिले आहे. यातून दिसलेला कणखरपणा हा पाकिस्तानसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरातील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर थेट हल्ले चढविले. तेथील कांगावखोर मुलकी सरकार आणि भारताशी वैर करण्यात मग्न असलेले लष्कर या दोघांनाही हा सणसणीत तडाखा आहे. पाकिस्तानने चालविलेल्या छुप्या युद्धाला दिलेले हे थेट आणि उघड प्रत्युत्तर आहे. अशा "सर्जिकल स्ट्राइक‘चा गाजावाजा करावा की नाही, यावर चर्चेचा रतीब घातला जाईल. मात्र भारतातील जनभावना पाहता सरकार गप्प नाही, प्रसंगी नियंत्रणरेषेपलीकडे जाण्याचा कणखरपणा दाखवू शकते, हा संदेश देणे सरकारसाठी गरजेचे होते. भारताकडून अशी कारवाई झाल्यानंतर यातील नामुष्की स्पष्ट असल्यानेच "अगा जे घडलेचि नाही‘, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला. दहशतवाद्यांचा वापर करायचा, स्वतः नामानिराळे राहायचे आणि काश्‍मिरींच्या भल्याचा मक्ता आपल्याकडेच असल्याचे जगाला भासवायचे, या कपटनीतीलाही भारताने चपराक लगावली आहे. संयमाचा उपदेश प्रत्येक वेळी भारताला करण्याने उपखंडातील पेच मिटणार नाही, याचीही अमेरिकी महासत्तेला आणि जगाला जाणीव करून दिली. सतरा जवानांचा घास घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचे "उरी‘चे शल्य केवळ लष्करालाच नव्हे, तर साऱ्या देशवासीयांना डाचत होते. आणखी किती काळ असे अपमान गिळत राहायचे, या प्रश्‍नाने साऱ्यांनाच अस्वस्थ केले होते. या अस्वस्थतेचा दबाव सरकारवर स्वाभाविकपणे निर्माण झाला. मुळात नरेंद्र मोदी यांचे सरकार जशास तसे उत्तर देण्याचे समर्थन करत सत्तेवर आल्याने उरीच्या हल्ल्यानंतरही मुत्सद्देगिरीची नेहमीची भाषा लोकांच्या पचनी पडणारी नव्हती, उलट त्यावर संतापच व्यक्त होत राहिला. आपल्याच प्रतिमेचे हे ओझेही सरकारला वागवावे लागणे अनिवार्य आहे. सर्वंकष युद्ध हा पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी करण्यातल्या मर्यादाही स्पष्ट आहेत. दुसरीकडे हे सरकारही काही करत नाही, अशी भावना मूळ धरते आहे. या स्थितीत सरकारने दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्याचे निमित्त करून आक्रमक कारवाईचा पर्याय निवडल्याचे दिसते. कारगिल संघर्षाच्या वेळी देखील भारताने नियंत्रणरेषा ओलांडली नव्हती, हे लक्षात घेतल्यास या कारवाईचे महत्त्व लक्षात येते. नेहमी पाकिस्तानसोबत चर्चेचे समर्थन करणारा देशातील वर्गही पाकिस्तानला समजेल अशा भाषेत बोलायला हवे, या मनःस्थितीत दिसत होता. या वातावरणात पुढे पाऊल टाकून दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याची कारवाई या नवभावनेला प्रतिसाद देणारीही आहे. या कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ उभे करून सरकारने आणि सरकारच्या या कृतीला पाठिंबा देऊन कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी व्यापक राष्ट्रीय वृत्तीचे दर्शन घडविले. उरीनंतर भारत-पाकिस्तान संबंधांचे स्वरूप कायमचे बदलल्याचेही या कारवाईने अधोरेखित झाले.

पठाणकोट येथे पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही भारताने प्रामुख्याने राजनैतिक पातळीवरच प्रश्‍न हाताळला होता. दहशतवादधार्जिण्या पाकिस्तानचे अंतरंग जगापुढे उघड करणे, हल्ल्यातील पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाचे पुरावे पाकिस्तानला देणे, त्या देशावर अन्य मार्गांनी दबाव आणणे हाच मार्ग भारताने पत्करला होता. हा देश थेट कारवाई करण्याचे टाळतो आहे, याचाच अर्थ त्याच्यात ते धाडस नाही, असा उफराटा अर्थ बहुधा पाकिस्तानने घेतला होता. त्यामुळेच पुन्हा उरीमध्येही हल्ल्याचा कट रचला गेला. पाकिस्तानच्या विरोधात सरकारने राजनैतिक मार्गांचा वापर सुरू केला होताच. त्या देशातील दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषदेवर (सार्क) भारताबरोबरच बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान यांनीही बहिष्कार घातला, हे त्या प्रयत्नांचेच एक फलित. आपली बाजू सत्य आहे, याची खात्री असली तरी तेवढे पुरेसे नसते, ते जगाला पुन्हापुन्हा ओरडून सांगावेही लागते. सरकारने तो प्रयत्न केला. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तानी नेत्यांचे धाबे दणाणले होते, त्यामुळेच अण्वस्त्रांचा वापर करू, अशी दर्पोक्ती करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असावी. अशा धमक्‍यांनी भारतीयांना नमविता येईल, हा त्यांचा होरा मात्र पूर्णपणे चुकला.

या लष्करी कारवाईचे स्वरूप मर्यादित ठेवण्यातही भारताने सुज्ञपणा दाखविला आहे. दहशतवाद्यांचा खातमा करून तसे पाकिस्तान सरकारला रीतसर कळविण्यात आले. आता याच्याविरोधात जर पाकिस्तान काही करू पाहील तर तो दहशतवाद्यांचा उघडउघड समर्थक आहे, हेच सिद्ध होईल. बेभान होऊन युद्धखोरी करण्याऐवजी नेमकी आणि परिणामकारक कारवाई करण्याचा मार्ग लष्कराने अवलंबला. मात्र युद्धाच्या उन्मादाचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आर्थिक विकासाच्या ज्या आकांक्षा घेऊन भारत वाटचाल करीत आहे, त्यांच्यावर पाणी फेरले जाणे परवडणारे नाही. या कारवाईनंतर पाकिस्तानातील लष्कर मुलकी सरकारला आणखीनच झाकोळून टाकण्याची शक्‍यता आहे. भारताच्या या कृतीनंतर हा नेहमीचा गोळीबार असा पवित्रा पाकने घेतला असला, तरी त्याची तीव्रता लपणारी नाही. या आक्रमक पवित्र्याविरोधात पाककडून काही ना काही कृती होईलच. यातून सर्वंकष युद्धाचा भडका उडू नये, याची काळजी घ्यायला हवी; तसेच पाकिस्तानच्या घातपाती कारवायांविषयी अखंड सावधच राहावे लागेल.

Web Title: Weapon 'action

फोटो गॅलरी