पावसाचा लपंडाव

पाऊस कधीही पडला, तरी त्याची गरजच अधोरेखित होत आहे. आत्ताचा पाऊस सर्वदूर नाही.
weather update rain forecast water storage monsoon
weather update rain forecast water storage monsoonSakal

- महेंद्र सुके

गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना काही भागांत पावसाची ये-जा सुरू आहे. ‘क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे...’ या बालकवी यांच्या कवितेतला पाऊस श्रावण संपल्यानंतरही काही ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे.

काही ठिकाणी अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अनेक धरणांची पाणीसाठ्याची तहान भागलेली नाही. त्यामुळे पाऊस कधीही पडला, तरी त्याची गरजच अधोरेखित होत आहे. आत्ताचा पाऊस सर्वदूर नाही.

माॅन्सूननेही दगा दिला. त्यामुळे सरासरीपेक्षा ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची चिंता सतावते आहे. पावसाची ‘उपमा’ देऊन कवी डॉ. यशवंत मनोहर ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’ असं म्हणतात.

जगणे समृद्ध करणारा ‘पाऊस’ सर्व स्तरांत आणि सर्व गावांत पोहोचणे आवश्‍यक आहे. पावसाविषयीच्या तक्रारी मात्र अलीकडच्या काळात जास्तच वाढल्या आहेत. तो चकवतो. कधी फसवतो. अनेकांची त्रेधातिरपट उडवतो आहे.

हवामान बदलाचे संकट आपल्या दारापर्यंत आले आहे, याचीच दवंडी जणू पाऊस आपल्यालाही देतो आहे. महानगरांसह गावोगावी उत्सवाचे वातावरण आहे. गणपती दर्शनासाठी गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत भक्तगणांच्या रांगा लागताहेत. त्या रांगा पावसात भिजताहेत. अशा गर्दीच्या ठिकाणी पाऊस आल्यास संयम ठेवण्याची गरज आहे.

धावाधाव, धक्काबुक्की करून चेंगराचेंगरी होणार नाही, हे आव्हान पेलण्याची अतिरिक्त जबाबदारी त्या-त्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आहे. राज्यभरात काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे समाजप्रबोधनपर उपक्रम राबवतात. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करतात.

ऊन-पावसाचा खेळ सुरू असताना गणेशदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना हवामान बदलाचे संकट परतून लावण्यासाठी काय करायला हवे, याविषयीच्या काही चित्रफिती, ध्वनिफिती दाखवल्या, तर ती समयसूचक जनजागृती ठरू शकेल. प्रत्येक मंडळाला उत्सव साजरा करण्यासाठी जाहिरातदार हवे असतात.

त्यासाठी संबंधित जाहिरातदारांचे पोस्टर्स, चलचित्रफिती उत्सवकाळात गर्दीच्या ठिकाणी प्रसारित केल्या जातात. त्या जाहिरातींसोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी एक भाग राखून ठेवला, तर हवामानबदलाच्या संकटाविषयीची माहिती सर्वत्र पोहचण्यात मदत होऊ शकेल. इतर सण,उत्सवातही अशा प्रकारचे प्रबोधन आवश्यक आहे.

हवामानबदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांची संख्या वाढत आहे. आपल्याकडेही वाढत्या तापमानाचे चटके बसायला लागले आहेत. नदीनाल्यांना येणारे पूर जनजीवन उद्‌ध्वस्त करताहेत. दुसरीकडे कोरड्या दुष्काळाचे संकट आहे.

पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्थांपासून जगभरातली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील माणसे या हवामान बदलाच्या धोक्यातून सावरण्यासाठी वेगवेगळ्या परिषदा घेत आहेत. आपला देश नैसर्गिक वैविध्याने संपन्न आहे. त्यामुळे निसर्गाशी असलेला पावसाचा अध्याय हा अध्यात्म म्हणून समजून घेता येईल का, याविषयी चिंतन व्हायला हवे.

पुरून उरेल, असा जलसाठा धरणांत असला पाहिजे. आपली शेती फळावी-फुलावी यासाठी ऋतुमानानुसार पाऊस पडला पाहिजे. पाऊस ऋतुचक्रानुसार पडायला हवा आणि पाऊसरूपी समृद्धतेपासून कोणतेही गाव अलिप्त राहू नये, यासाठी हवामानबदलाच्या संकटावर मात करण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण जपण्याची आणि निसर्गप्रेमी होण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com