बेभान झुंडींचे बळी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

अफवांमधून पसरणारा विखार, त्यातून तयार होणाऱ्या झुंडी आणि निरपराधांची हत्या, या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. कोणत्याही सबबीखाली कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून जायला हवा.

अफवांमधून पसरणारा विखार, त्यातून तयार होणाऱ्या झुंडी आणि निरपराधांची हत्या, या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. कोणत्याही सबबीखाली कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून जायला हवा.

मानवी समूहाचे केव्हा झुंडीत रूपांतर होईल आणि त्या झुंडी केव्हा हिंसक बनतील, हे आजवर मानसशास्त्राला पडलेले अगम्य असे कोडे आहे. त्याचे विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न अनेक मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. ही राक्षसी मानसिकता काही क्षणांत झुंडींमध्ये तयार होते आणि बघता बघता ती हिंसक रूप धारण करते, हे खरे आहे. झुंडीची ही मानसिकता प्रामुख्याने नैराश्‍यातून तयार होते आणि एकटा माणूस जे करू धजणार नाही, ते मानवी समूहाचे झुंडीत रूपांतर झाल्यावर ती झुंड करून जाते. त्यात पुन्हा समूहाचा एक भाग म्हणून गुन्हा केला, की त्याबद्दल शिक्षा होणे कठीण असते, असाही ग्रह मानवी मनात निर्माण झालेला असतो. धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल अशा साक्री तालुक्‍यात रविवारी अशाच झुंडशाहीचे प्रत्यंतर आले. तेथे सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या पाच जणांची त्या झुंडीने दगडांनी ठेचून हत्या केली. हे पाच जण म्हणजे मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय निर्माण झाला होता. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात घडलेला हा पहिलाच प्रकार नसला, तरी त्यामुळे विविध राज्यांत निव्वळ संशयावरून वा अफवांवर विश्‍वास ठेवून, संबंधितांना दगडांनी ठेचून मारण्याच्या प्रकाराचे लोण महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचले आहे, यावर शिक्‍कामोर्तब झाले.

धुळे जिल्ह्यात रविवारी ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली, त्याच्या बरोबर महिनाभर आधी म्हणजेच एक जून रोजी औरंगाबाद जिल्ह्यातही अशाच प्रकारे मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरली आणि सोशल मीडियावरून पसरलेल्या त्या अफवेची खातरजमा कोणी करण्याआधीच जमावाचे रूपांतर झुंडीत झाले. झालेल्या मारहाणीत दोन निरपराधांचा हकनाक जीव गेला. धुळ्यात ही अमानुष घटना घडली, त्याच दिवशी मालेगावातही मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा उठली आणि परभणीहून आलेल्या दोघांना जमावाने भीषण मारहाण केली. मालेगावात जमाव इतका अनावर झाला होता, की पोलिसांनी लाठीमार केला, तेव्हा पोलिसांची व्हॅन उलटवून देण्यापर्यंत जमावाची मजल गेली. देशभरात अशा प्रकारे जमावाने ठेचून मारण्याचे प्रकार गेल्या महिनाभरात त्रिपुरा, आसाम, झारखंड, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांत घडत असून, झुंडीच्या या मारहाणीत आजपावेतो देशभरात १९ बळी गेले आहेत.

कायदा हातात घेण्यात हल्लेखोरांना जराही वावगे वाटत नाही, असे दिसते. हा बेगुमानपणा नेमका कशामुळे आला, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारे घडलेल्या अनेक घटनांमध्ये मुले पळविणाऱ्या टोळीविषयीच्या अफवा हा धागा समान दिसतो. जर असे कोणी आढळले तर संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात देणे हे नागरिक म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसे का घडत नाही? गोरक्षणाच्या नावाखाली देशाच्या काही भागांत घडलेले मारहाणीचे आणि प्रसंगी खुनाचे प्रकारही गंभीर असून, या सगळ्यालाच आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी गांभीर्याने काही पावले उचलण्याची गरज आहे; किंबहुना कोणत्याही सबबीखाली कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून जायला हवा. झारखंडमध्ये एका मुस्लिम व्यापाऱ्याला निर्घृणपणे दगडांनी ठेचून ठार करण्यात आले आणि आरोपींना अटकही झाली. पुढच्या सहा महिन्यांत त्यातील ११ आरोपींना जन्मठेप झाली खरी; मात्र अन्य आठ आरोपींची जामिनावर मुक्‍तता झाली. झुंडीचा एक भाग होऊन काहीही केले तरी पुढे आपण जामिनावर सुटू शकतो, अशी भावना जमावातील अनेकांच्या मनात असते, यात शंकाच नाही. त्यामुळे आता मराठवाड्यात घडलेल्या अशा घटना असोत, की साक्री वा मालेगाव येथील हे प्रकार असोत, त्यातील सर्व आरोपी पकडले जातील व त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आहे. त्याचवेळी ‘व्हॉट्‌सॲप’ असो की ‘फेसबुक’ की ‘ट्विटर’, यावरील माहितीची खातरजमा करून घेण्याबाबत लोकांचे प्रबोधन करायला हवे. अफवा पसरवणे आणि त्यामुळे झुंडी बेभान झाल्या की त्याची मजा घरी बसून घेणे, असा काहींचा अमानुष ‘शौक’ असू शकतो. त्यामुळे या ज्या काही घटना महाराष्ट्रात घडल्या, तेव्हा समाजमाध्यमांवरून अफवा कोणी पसरवल्या होत्या, याचाही छडा लावून त्यांना कठोर शिक्षा होईल, याची दक्षता पोलिसांनी घ्यायला हवी. अन्यथा, अफवा पसरवणे आणि त्यामुळे गर्दीचे रूपांतर झुंडीत होणे आणि पुढे त्या झुंडींची मजल इतरांचे जीव घेण्यापर्यंत जाणे, असे प्रकार सुरूच राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp fake message claimed five people in dhule