कॉंग्रेस आत्मचिंतन करणार तरी कधी?

अनंत बागाईतकर
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

निवडणुका जिंकण्याची प्रबळ यंत्रणा तयार करण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश येत असल्याने पक्षाची सतत पीछेहाट होत आहे. अशा वेळी स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले नाही, तर कॉंग्रेसच्या अस्तित्वाला लागलेले ग्रहण त्याला अस्ताकडे नेऊ शकते, याचे भान पक्षश्रेष्ठींना कधी येणार?

निवडणुका जिंकण्याची प्रबळ यंत्रणा तयार करण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश येत असल्याने पक्षाची सतत पीछेहाट होत आहे. अशा वेळी स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले नाही, तर कॉंग्रेसच्या अस्तित्वाला लागलेले ग्रहण त्याला अस्ताकडे नेऊ शकते, याचे भान पक्षश्रेष्ठींना कधी येणार?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या काही जुन्या, अनुभवी नेत्यांबरोबर अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी काही ताजे कटू अनुभव सांगितले आणि पक्षाच्या एकंदरीतच भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेली ही मंडळी होती. त्यांच्या चिंता रास्त होत्या. या चर्चेचा सारांश काय होता ? वानगीदाखल काही निरीक्षणे नमूद करता येतील. कॉंग्रेस पक्षाची वाढ केवळ खुंटलेली नाही, तर पूर्णपणे थांबलेली आहे. जनमानसात कॉंग्रेसबद्दल आकर्षण राहिलेले नाही. समाजाचा नावीन्याकडे ओढा आहे आणि त्या कसोटीवर कॉंग्रेस पक्ष उतरताना आढळत नाही. कॉंग्रेसचे नेतृत्व व नेते इतिहासात रममाण झालेले आढळतात म्हणजेच, "ये हमने भी किया था, हमनेही ये शुरू किया था' किंवा थेट नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी यांची उदाहरणे देऊन लोकांना देऊन त्या गतवैभवाची ते विक्री करू पाहतात. नावीन्य आणि उच्चाकांक्षी वर्गाला आकर्षित करण्याचे रसायन कॉंग्रेसने अद्याप विकसित केलेले नाही. त्यामुळेच कॉंग्रेस पक्ष प्रवाही न राहता डबक्‍यासारखा साचलेपणा त्यात आला आहे.

ही घसरण अशीच चालू राहिली तर पक्ष विखंडित होईल, पक्षाचे तुकडे होतील, असे या मंडळींचे म्हणणे होते. आताच कॉंग्रेस संस्कृतीमधील तीन पक्ष अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष आणि आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांचा "वायएसआर कॉंग्रेस पक्ष'. कॉंग्रेस संस्कृतीचा हवालाच द्यायचा झाल्यास तेलंगणातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती हादेखील कॉंग्रेसमधून फुटून निघालेल्या मंडळींनी स्थापन केलेला आहे. मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव हे "सोनिया गांधी या माझ्या आईसारख्या आहेत,' असे सांगत असत. तर या मंडळींच्या म्हणण्यानुसार कॉंग्रेसचे आणखी तुकडे होऊ शकतात आणि ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचा ताकदवान नेता असेल, तो त्या ठिकाणी आपला सवतासुभा निर्माण करू शकेल. अशी शक्‍यता कुठेकुठे दिसते?

हरियानात माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा किंवा पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारखे नेते असतील तर ही बाब नाकारता येणार नाही. एवढेच काय, हिमाचल प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तेथील तालेवार नेते वीरभद्रसिंह यांना डावलण्याचा आणि मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी नाकारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दरवाजा ठोठावला होता आणि नंतर स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, तथाकथित कॉंग्रेस हायकमांडने माघार घेऊन तो पेचप्रसंग टाळला. पंजाब निवडणुकीपूर्वीदेखील कॅप्टनसाहेबांनी हाच खेळ खेळला होता. हरियानात ओमप्रकाश चौताला यांच्या उमेदवाराला राज्यसभा निवडणुकीत मदत करून भाजपला पराभूत करण्याचा कॉंग्रेस हायकमांडचा मनसुबा हुडा यांनी हाणून पाडला होता. याचा सारांश एवढाच की कॉंग्रेसने स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले नाही तर पक्षाच्या अस्तित्वाला लागलेले ग्रहण खग्रास होऊ शकते, पक्षाला अस्ताकडे नेऊ शकते या सर्वसाधारण निष्कर्षाप्रत ही मंडळी पोचली आहेत. "कॉंग्रेस पक्षात सध्या सच्च्या कार्यकर्त्यापेक्षा मॅनेजर्सची चलती आहे,' हे आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी ऐकवले.

कॉंग्रेसचे होणार काय ? राजकीय पक्षांच्या प्रवक्‍त्यांमधील "आद्य प्रवक्ते' म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल आणि ज्यांची प्रवक्तेपदाची कारकीर्द आदराने आठवली जाते त्या बॅ. विठ्ठलराव गाडगीळांची आठवण येते. नरसिंह राव यांच्या कारकिर्दीनंतरच कॉंग्रेसची ज्या पद्धतीने घसरण सुरू झाली होती, त्यावरून अंदाज घेऊन गाडगीळांनी कॉंग्रेस नेतृत्वाला ब्रिटिश लेबर पार्टीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून काही आमूलाग्र सुधारणा व बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसे टिपणही त्यांनी सादर केले होते आणि काही लिखाणही केले होते. अर्थात कॉंग्रेस नेतृत्वाने पक्षबांधणीपेक्षा "व्यवस्थापन कौशल्य' यालाच महत्त्व दिले. त्या कौशल्याच्या आधारेच 2004 मध्ये सत्ता मिळाली. परंतु, निवडणुका जिंकण्याची प्रबळ यंत्रणा तयार करण्यात पक्षाला अपयश येत राहिले. परिणामी 2014 मध्ये आपल्या अभूतपूर्व व ऐतिहासिक नीचांकी आकड्यावर (44) हा पक्ष येऊन थांबला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगर परिषदा यांचे निकाल सर्वविदीत आहेत. ओडिशामध्येदेखील नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. तेथे कॉंग्रेस भुईसपाट ! ज्या राज्यात कॉंग्रेसची अबाधित सत्ता होती, तेथे कॉंग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. एकेकाळी भाजप हा केवळ हिंदीभाषक प्रदेशापुरता मर्यादित पक्ष मानला गेला होता. परंतु, या पक्षाने सातत्यपूर्वक परिश्रम करून विस्तार केला आणि त्याची फळे आता त्यांना मिळू लागली आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये आजही राजकारण हे भाजप आणि कॉंग्रेस असे दोन ध्रुवीय आहे आणि तसे असूनही कॉंग्रेसला मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांत पंधरा-वीस वर्षे सत्तेपासून वंचित राहावे लागत आहे. तेथे तिसरा पर्याय निर्माण झाल्यास तो कॉंग्रेसची जागा घेईल. दिल्ली, गोवा, गुजरात, पंजाबसारख्या राज्यात आम आदमी पक्षाचा उदय हा कॉंग्रेसच्या मुळावर येत आहे. अन्य राज्यांत इतर राजकीय शक्ती फोफावून कॉंग्रेसला नेस्तनाबूत करतील.

कॉंग्रेसला "घराण्या'पासून मुक्ती नाही हे वास्तव आहे. पण भारतीय राजकारणात अनेक घराणी नांदत असल्याने कॉंग्रेसचाच अपवाद कशाला ? नव्या नेतृत्वाने "पाठंगुळी - पाठकुळी' राजकारणाला प्राधान्य दिलेले आहे. बिहार, पश्‍चिम बंगाल आणि आता उत्तर प्रदेश ! स्थानिक प्रबळ प्रादेशिक पक्षाबरोबर हातमिळवणीचा हा प्रयोग आहे. यात गैर काही नाही. भाजपनेदेखील एकेकाळी हाच मार्ग अवलंबिला होता आणि आपले हातपाय हळूहळू पसरले होते. परंतु, त्याच बरोबरीने भाजपने आपले वेगळेपण जपले व जोपासले होते आणि योग्य वेळी नेतृत्वबदल करून केंद्रात सत्ता काबीज केली. बदलत्या व जागरूक समाजाच्या आकांक्षांना गोंजारून, तसेच तुलनेने राज्याराज्यांमध्ये आपल्या सरकारांमार्फत उत्तम प्रशासन व राज्यकारभार देऊन या वर्गात भाजपने आपली प्रतिमानिर्मिती केली. त्या आधारेच पक्षाने दिल्लीची सत्ता मिळविली. हे सर्व करणे कोणत्याच पक्षाला - कॉंग्रेसलाही अशक्‍य नाही. गरज आहे स्वतःमध्ये उचित, कालानुरूप बदल करण्याच्या इच्छाशक्तीची !

Web Title: when will congress introspect