ही ‘शस्त्रक्रिया’ कोण करणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

म्हैसाळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात केंद्रामुळे पुन्हा एकदा समाजाचा कुरूप चेहरा समोर आला आहे. गर्भांचा कत्तलखाना चालविणारा जेवढा दोषी आहे, तेवढेच मुलीचा जन्म नको, असे म्हणणारेही दोषी आहेत.

म्हैसाळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात केंद्रामुळे पुन्हा एकदा समाजाचा कुरूप चेहरा समोर आला आहे. गर्भांचा कत्तलखाना चालविणारा जेवढा दोषी आहे, तेवढेच मुलीचा जन्म नको, असे म्हणणारेही दोषी आहेत.

एकीकडे स्त्रियांच्या सर्व क्षेत्रांतील यशस्वी वाटचालीचे दाखले देऊन समाज कसा पुढे जात आहे, याचे दावे केले जात असताना याच समाजात फार मोठ्या प्रमाणात असलेल्या बुरसटलेल्या मानसिकतेचे वास्तवही ठळकपणे समोर येते. त्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत समाजातील बदल प्रतीकात्मकच राहणार. मिरज तालुक्‍यातील म्हैसाळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात केंद्रामुळे पुन्हा एकदा हे दाहक सत्य समोर आले आहे. या गावात बाबासाहेब खिद्रापुरे हा होमिओपॅथीचा डॉक्‍टर बेकायदा गर्भपात केंद्र चालवून उमलू पाहणाऱ्या अनेक कळ्या खुडून टाकत होता. स्वाती जमदाडे ही महिला गर्भपाताची शस्त्रक्रिया होत असताना मरण पावली आणि तिच्या मृत्यूच्या चौकशीत हे सगळे बाहेर आले. तेथे आतापर्यंत तब्बल १९ गर्भ सापडले आहेत. ही संख्या मोठी असू शकते.

डॉक्‍टराच्या या लूटमारीत स्वातीची शोकांतिका सर्वांना चटका लावणारी, तितकीच व्यवस्थेला धक्‍का देऊन जागे करणारी आहे. तिला पहिल्या दोन मुली होत्या. ती तिसऱ्यांदा गर्भवती होती. सोनोग्राफीमध्ये मुलगी असल्याचे समजले. गर्भपातासाठी नवरा मागे लागला होता. स्वातीच्या वडिलांनी विरोध केला; मात्र पतीच्या हट्टापायी गर्भपातास तयार व्हावे लागले.

खिद्रापुरेच्या बेकायदा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनातही उमटलेत; पण नुसत्या चर्चेपेक्षा अशा डॉक्‍टरांवर कायमस्वरूपी इलाज करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. मुळात होमिओपॅथी डॉक्‍टरला शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार कोणी दिला? मेडिकल कौन्सिल, आरोग्य खाते किंवा पोलिस यंत्रणांना याचा सुगावा कसा लागला नाही? इतके मृत्यू झाल्यानंतर अचानक जाग आल्याप्रमाणे आता शोधाशोध सुरू आहे, हे संपूर्ण यंत्रणेचे अपयश नव्हे काय? अवैध गर्भपात करून भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ. खिद्रापुरे याने जमिनीत गाडलेले भ्रूण कुजलेल्या अवस्थेत पोलिसांनी शोधून काढले. स्वातीचा बळी अवैध सोनोग्राफी सेंटरमुळेच गेला, असा आवाज प्रसारमाध्यमांनी उठविला आणि त्यानंतर सरकारी हालचाल सुरू केली.  

सध्या गावोगाव हॉस्पिटलनामक इमले उभे करून धंदा करणारे डॉक्‍टर वाढले आहेत. सुरवातीला निमंत्रित तज्ज्ञ डॉक्‍टर हॉस्पिटलमध्ये बोलावून किरकोळ शस्त्रक्रिया, बाळंतपणे करून अशा ‘कसाईखान्यां’ची सुरवात होते. त्यानिमित्ताने संपर्कात आलेल्यांना या कामी जुंपले जाते. वास्तविक थोडेसे जरी संशयास्पद वाटले तरी अनेक उपप्रश्‍न पुढे यायला हवेत. डॉक्‍टरांच्या संघटनांनीही याबाबत दक्ष असायला हवे. जिल्हास्तरावर बोगस डॉक्‍टरांचा शोध घेणाऱ्या समित्या असतात. केवळ बोगस पदव्या शोधणे म्हणजे काम, असाच या समित्यांचा समज असावा. खरे तर स्त्री-भ्रूणहत्येच्या कृत्याविरोधात गेल्या काही वर्षांत झालेली लोकजागृती आणि समाजाचा होत असलेला सकारात्मक दृष्टिकोन या जमेच्या बाजू आहेतच. एका बाजूला लोकजागृती आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची कठोर अंमलबजावणी अशा दोन्ही पातळ्यांवर काम होणे गरजेचे आहे. पण ते होत नाही आणि त्याचाच फायदा खिद्रापुरेसारखे डॉक्‍टरकीची झूल पांघरलेले नराधम उठवतात.

ओढ्याकाठी पुरलेल्या १९ बॅगा आणि त्यात पुरलेली ती अर्भके म्हणजे देशाचे भवितव्यच त्याने मातीखाली गाडले आहे, असे म्हटले पाहिजे. स्वातीचा गर्भपात करायला भाग पाडणारे जमदाडे कुटुंबीय प्रातिनिधिक आहेत. कुटुंबातले अनेक घटक याकडे दुर्लक्ष करतात. तो त्यांचा वैयक्तिक मामला, असा दृष्टिकोन नातलगांचा असतो. समाजातील अनेक घटक कमी-अधिक प्रमाणात अशा दुष्कृत्यांना बळ देत असतात. मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा, ही मानसिकता आजही समाजातून पुरती पुसलेली नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे.

स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात केला तर आजन्म कारावास, सदोष मनुष्यवधाचे कलमही लागू होते. तरीही असे प्रकार सर्रास सुरू आहेत, यावरून भीषण परिस्थितीची कल्पना येते. खिद्रापुरेकडे सोलापूर, कोल्हापूर, शिराळा आदी ठिकाणचे पत्ते मिळाले आहेत. म्हणजे या डॉक्‍टरच्या ‘कत्तलखान्या’चा प्रसार दूरपर्यंत गेल्याची शक्‍यता आहे. असे किती खिद्रापुरे आजच्या घडीला असे कत्तलखाने चालवत असतील, याचा कसून शोध घेतला पाहिजे व गुन्हेगारांना कठोर शिक्षेपर्यंत पोचवले पाहिजे, त्याशिवाय अशा अवैध धंद्याला आळा बसणार नाही. एखादा बीडचा सुदाम मुंडे किंवा खिद्रापुरे यांचा पर्दाफाश झाला, की यंत्रणा जागी होते आणि नंतर पुन्हा सारे पूर्ववत होते. दुसरीकडे मुलींचा जननदर घटल्याने लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र दिसते आहे. एकूणच या सामाजिक विसंगतीच्या मुळाशी मनात घट्ट बसलेले पूर्वग्रह आहेत, मुलगा-मुलगी यांच्यात भेद करणारे बुरसटलेले विचारही आहेत. ते काढून टाकण्यासाठी कोणती ‘शस्त्रक्रिया’ करावी लागेल, हाच आपल्यासमोरचा यक्षप्रश्‍न आहे.

Web Title: who will the operation?