हवेत कशाला शाळेत बाउंसर?

school-bouncer
school-bouncer

तुम्ही एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला जा, राजकीय भाषणाला जा, किंवा बड्या लोकांच्या समारंभाला जा, तुम्हाला सर्वप्रथम दिसतो तो बाउंसर. हे बाउंसरचे फॅड आता शहरांत जागोजागी दिसत आहे. त्याला सार्वजनिक गणेश मंडळेदेखील अपवाद राहिलेली नाहीत.

काही वर्षांपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते भाविकांची गर्दी नियंत्रित करत असल्याचे चित्र रस्तोरस्ती दिसत होते; पण, आता त्यांची जागा या बाउंसरनामक बलदंड देहयष्टीच्या व्यक्तिमत्त्वाने घेतली. आता कहर म्हणजे शाळांमध्येही त्यांना नेमण्यात येऊ लागले आहे. पुण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने चक्क बाउंसरची नेमणूक केली आहे. कारण काय तर म्हणे शिस्तपालन. शाळेतील शिक्षिकेने या बाउंसरकडून विद्यार्थ्याला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली; तीही पोटऱ्यांना ठणका लागेपर्यंत.  

शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थ्यांच्या नशिबी असा ‘शैक्षणिक सासूरवास’ का? मुळात हवेत कशाळा शाळेत बाउंसर? शिक्षणाचे झपाट्याने व्यावसायिकरण झालं आहे, हे आता आपण सर्वांनीच एकमुखाने मान्य केलंय. किंबहुना हे मान्य करण्याशिवाय पर्यायच आता आपल्यापुढं राहिलेला नाही. अशा पार्श्‍वभूमीवरही शाळा ही संस्काराची केंद्रे आहेत, हा आशेचा किरण अद्यापही मनात तग धरून आहे. शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, तेथील शिकविण्याच्या पद्धती, शालेय साहित्य, पायाभूत सुविधा यांबाबत मतभिन्नता असली तरीही शाळेतील मुलाची, आपल्या विद्यार्थ्याची सुरक्षितता याबद्दल मात्र एकवाक्‍यता दिसते. पण, या बाउंसर प्रकरणाने या एकवाक्‍यतेला, विश्‍वासालाच तडा गेला आहे. शिक्षक हे पिढी घडवतात, असे आपण म्हणतो. त्याला कारण, मुलांमध्ये मिसळून जाण्याचे शिक्षकांचे कौशल्य, विषय समजावून सांगण्याची त्यांची हातोटी हे जसे महत्त्वाचे असते, तसेच त्यांच्या नजरेतील धाकही विद्यार्थ्यांना घडवत असतो. शिक्षकाचा हा धाक जातो, तेव्हा बाउंसरची गरज शाळा आणि शिक्षकाला लागते. शाळांचा केंद्रबिंदू विद्यार्थी राहिलेला नसावा, असेच यावरून कोणालाही वाटेल. शिक्षण हे विद्यार्थिकेंद्रित नसते त्या वेळी बाउंसर नेमण्याची सुपीक कल्पना जन्माला येते. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात नेमके आपण कुठून कुठे चाललो आहोत, असा प्रश्‍न निर्माण करणारी ही घटना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com