"आघाडी'वर रणरागिणी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

एकविसाव्या शतकातही महिलांना "चूल आणि मूल' यातच गुंतवून ठेवण्याचे प्रकार सुरू असतानाच आता आणखी एक नवे क्षेत्र महिलांना खुले झाले आहे. लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार महिला सुरवातीला "मिलिटरी पोलिस' या पदावर सामावून घेतले जातील

देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेल्या वीर जवानांच्या शौर्यगाथा आपण अनेकदा ऐकल्या आहेत; मात्र आता लवकरच हातात बंदुका घेऊन देशाच्या रक्षणार्थ सिद्ध झालेल्या रणरागिणीही सीमेवर बघावयास मिळणार आहेत. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाशीच्या राणीने बजावलेल्या शौर्यगाथेच्या कहाण्या आपण आजवर ऐकत आलो; पण एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक उजाडले तरी भारतीय लष्करात महिलांना प्रवेशबंदीच होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेत मात्र महिलांची तुकडी होती आणि तिला झाशीच्या राणीचे नाव देण्यात आले होते. केवळ पुरुषांसाठीच राखीव असलेल्या या क्षेत्राची "अभेद्य' तटबंदी भेदण्याचे काम गेल्या वर्षी भारतीय हवाई दलाने अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या महिलांची लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्‍ती केल्यामुळे झाले आणि भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात नवे सोनेरी पान लिहिले गेले. त्यापासून स्फूर्ती घेऊन आता लष्करानेही हा विचार सुरू केला असून, लवकरच देशाच्या रक्षणासाठी हातात बंदुका घेऊन महिला सैनिक सीमेवर उभ्या ठाकणार आहेत. भारतीय लष्करात आजवर वैद्यकीय, कायदेविषयक, अभियांत्रिकी, तसेच सिग्नलिंग अशा काही विभागांतच महिलांना प्रवेश होता; पण थेट सीमेवर जाऊन लढायला मात्र त्यांना परवानगी नव्हती. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, फिनलंड आणि फ्रान्स अशा काही देशांत महिला सैनिकांची परंपरा जुनी आहे.

लष्करभरतीच्या धोरणात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासंबंधातील प्रक्रिया सुरू झाली असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी जाहीर केले असून, त्यांच्या या घोषणेचे स्वागत करायला हवे. एकविसाव्या शतकातही महिलांना "चूल आणि मूल' यातच गुंतवून ठेवण्याचे प्रकार सुरू असतानाच आता आणखी एक नवे क्षेत्र महिलांना खुले झाले आहे. लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार महिला सुरवातीला "मिलिटरी पोलिस' या पदावर सामावून घेतले जातील. या लष्करी पोलिसांची कामे ही आर्मी कॅंटोन्मेंट, तसेच अन्य लष्करी आस्थापनांवर पहारे देण्यासंबंधातील असून, लष्करातील जवानांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. या अनुभवांनंतर त्यांना थेट सीमेवर धाडण्यात येईल. आता महिला या क्षेत्रातही कर्तृत्वाची नवी शिखरे काबीज करतील, त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

Web Title: women officers in indian military