महिला टेनिसचा नवा चेहरा

मुकुंद पोतदार
सोमवार, 12 जून 2017

टेनिसचा खेळ जगभर लोकप्रिय होण्यात या खेळामधील विजेत्यांच्या कामगिरीइतकीच त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व निर्णायक ठरले आहे. कोर्टवर पंचांशी हुज्जत घालणारा आणि विविध विषयांवर परखड भाष्य करणारा जॉन मॅकेन्रो, शाकाहारापासून समलिंगी संबंध अशा विषयांपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडणारी मार्टिना नवरातिलोवा, हलक्‍याफुलक्‍या शैलीत समालोचन करणारा जिम कुरियर असे खेळाडू म्हणूनच आजही चर्चेत आहेत. इतर खेळांच्या तुलनेत टेनिसचे चाहते आपल्या चॅंपियनकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. या खेळाने तसे सर्वगुणसंपन्न असे समृद्ध विजेते घडविले आहेत. अर्थात त्यांची खेळातील तडफ आणि चमक असाधारण असते, यात शंकाच नाही.

फ्रेंच ओपनची महिला एकेरीतील विजेती जेलेना ऑस्टापेन्को हिचे यश म्हणूनच स्वागतार्ह ठरते. लॅटवियासारखा छोट्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी, जागतिक क्रमवारीत ४७व्या स्थानावर असलेली, केवळ २० वर्षांची असलेली जेलेना महिला टेनिसचा चेहरा ठरू शकते, हे विलक्षण आहे. कारकिर्दीत केवळ आठवीच ग्रॅंड स्लॅम स्पर्धा खेळताना तिने हे यश संपादन केले. सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांच्या अनुपस्थितीत नव्या चेहेऱ्याची विजेती अपेक्षित होतीच. याबाबतीत रुमानियाची सिमोना हालेप, डेन्मार्कची कॅरोलीन वॉझ्नीयाकी, पोलंडची अँग्निस्का रॅडवन्स्का यांच्या नावांची चर्चा जास्त होती; पण तसे झाले नाही. सेरेनाचा अपवाद वगळता अलीकडे महिला टेनिसमध्ये सातत्याचा अभाव दिसून येतो. जर्मनीची अँजेलिक केर्बर हिनेही निराशा केली. चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये फ्रेंच ओपनने नेहमीच अनपेक्षित विजेते दिले आहेत. जेलेनाचे वैशिष्ट्य म्हणजे ती कमालीचा आक्रमक खेळ करते. या एका निकषावर ती फार मोठी मजल मारू शकते. मुख्य म्हणजे महिला टेनिसची धुरा पेललेल्या विजेत्यांचा इतिहास पाहिल्यास ताकदवान आणि आक्रमक खेळ किती महत्त्वाची आहे, हा मुद्दा नवरातिलोवा-स्टेफी, ग्राफ-सेरेना अशा तीन पिढ्यांमधून अधोरेखित होतो. गेल्या दोन दशकांचा इतिहास पाहिल्यास अनपेक्षित विजेतीचे हे काही पहिलेच उदाहरण नाही; पण आजच्या घडीला महिला टेनिस ज्या अवस्थेत आहे, ते पाहता जेलेनाची स्तुतिसुमने गाण्यात काही दिग्गजही आघाडीवर आहेत. बिली जीन किंग, ख्रिस एव्हर्ट, गॅब्रिएला साबातिनी यांच्या प्रतिक्रिया हेच दर्शवितात. त्यामुळेच जेलेना ही विलक्षण विजेती ठरते.

Web Title: women tennis sports marathi news