बालकांना समृद्ध करणाऱ्या शब्द, रेषांचा सन्मान

अमृता पटवर्धन
रविवार, 18 डिसेंबर 2016

बाल साहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी टाटा ट्रस्टने पराग उपक्रमाअंतर्गत मुंबई लिटरेचर लाइव्हबरोबर "बिग लिटिल बुक अवार्ड'ची स्थापना केली. नुकताच हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला - लेखनासाठी माधुरी पुरंदरेंना (मराठी भाषा) आणि चित्रकारितेचा अथनू रॉय यांना. बहुभाषिकतेला महत्त्व देत, दरवर्षी लेखनाच्या पुरस्कारासाठी वेगवेगळी भारतीय भाषा निवडली जाईल. बाल साहित्यात चित्रकाराची भूमिका खूप मोठी असते. लहान मुले, पुस्तकांमधील शब्दांआधी चित्रांकडे आकर्षित होतात.

बाल साहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी टाटा ट्रस्टने पराग उपक्रमाअंतर्गत मुंबई लिटरेचर लाइव्हबरोबर "बिग लिटिल बुक अवार्ड'ची स्थापना केली. नुकताच हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला - लेखनासाठी माधुरी पुरंदरेंना (मराठी भाषा) आणि चित्रकारितेचा अथनू रॉय यांना. बहुभाषिकतेला महत्त्व देत, दरवर्षी लेखनाच्या पुरस्कारासाठी वेगवेगळी भारतीय भाषा निवडली जाईल. बाल साहित्यात चित्रकाराची भूमिका खूप मोठी असते. लहान मुले, पुस्तकांमधील शब्दांआधी चित्रांकडे आकर्षित होतात.
चित्रकाराचे हे महत्त्वाचे योगदान दुर्लक्षित राहाते. या पार्श्वभूमीवर मुलांसाठी उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या लेखक चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे व पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळावा म्हणून वाचणे किती महत्त्वाचे आहे, याची समाज म्हणून आपल्या सर्वांनाच आठवण व्हावी, यासाठी हा पुरस्कार. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये मुलांमधील सर्जनशीलता, स्वतंत्रपणे विचार, विश्‍लेषण करण्याची क्षमता जोपासली जात नाही, हे अनेक अभ्यासांमधून अधोरेखित झाले आहे. याचं एक मोठं कारण आपली शिक्षणपद्धती. केवळ पाठ्यपुस्तके आणि परीक्षा यावरील अतिरेक आहे, भारतीय भाषांमधील सकस, दर्जेदार लेखन आणि गोष्टींच्या पुस्तकांचा घरी आणि शाळेत असलेला अभाव हाही आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते.

माधुरी पुरंदरे यांनी मराठी बालसाहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. बालांसाठी "राधाचे घर' व "यशाच्या गोष्टी'पासून "किशोरवयीन मुलांसाठी' "त्या एका दिवशी' आणि "हानाची सूटकेस' (अनुवादित) ही त्यांची पुस्तके वेधक आहेत. मुलांच्या भावविश्वाला बारकाईने टिपत, विनोद, नवाचार, संस्कृती याची गुंफण घालत, मधुरीताईंच्या गोष्टी उलगडतात. कृत्रिमता नसलेली, ओघवती, मुलांशी संवाद साधणारी माधुरीताईंची भाषाशैली बालसाहित्याला समृद्ध करते. त्यांच्या पुस्तकांमधील, प्रश्न विचारणारी, भांडणारी, रुसणारी, कल्पना करणारी, मुलं आपल्या मनात वास्तव्य करतात. बिग लिटील बुक अवार्डच्या जुरी, प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांनी म्हटल्याप्रमाणे, "माधुरीताईंच्या लेखनात संवेदनशीलता आणि विनोद यांची दुर्मिळ गुंफण आढळते.' माधुरीताई शब्द आणि चित्र या दोन्ही माध्यमांतून गोष्ट, पात्र, सांस्कृतिक परिवेश आणि मुलांचे भावविश्व उलगडतात. पहिल्याच वर्षी या पुरस्कारासाठी झालेली मराठी भाषेची निवडही आपल्याला मराठीत मुलांसाठी उत्तम लेखन केलेल्या साने गुरुजी, भा.रा. भागवत, शांता शेळके, विंदा करंदीकर, प्रकाश नारायण संत अशा साहित्यकारांच्या महत्त्वाच्या कामगिरीची आठवण करून देते. माधुरीताईंना मिळालेला पुरस्कार भारतीय भाषांमध्ये, होणाऱ्या दर्जेदार लेखनाला मिळालेली दाद आहे.

माधुरीताईंनी म्हटल्याप्रमाणे, "भारतीय बालसाहित्यात नवनवीन प्रयोग
होण्याची, वेगवेगळे विषय हाताळण्याची, "आजच्या' विश्वाशी जुळणाऱ्या लेखनाची गरज आहे. असे अधिकाधिक लेखन प्रकाशित व्हावे आणि उत्तम बालसाहित्य जास्तीतजास्त मुलांपर्यंत पोचावे, यासाठी पालक, शिक्षक, ग्रंथपाल, समुदाय, विक्रेते, लेखक चित्रकार, प्रकाशक यांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे. बिग लिटिल बुक अवार्ड त्यासाठी एक व्यासपीठ बनेल, ही आमची आकांक्षा आहे.
 

अथनू रॉय
गेल्या वर्षात बालसाहित्यात उत्कृष्ट चित्रकार म्हणून काम केलेल्या अथनू रॉय यांना यंदाचे पहिले, चित्रकारितेचे "बिग लिटिल बुक अवार्ड' मिळाले. रॉय यांनी चित्रकलेची शैली काळानुसार, प्रकाशनासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनानुसार बदलली. वर्षापूर्वी रंगीत छपाई, बालसाहित्यासाठी उपलब्ध कागदाचा दर्जा, या सीमांवर मात करत, रंग रेषांच्या माध्यमातून गोष्टीला चित्रमय रूप दिले आणि मुलांना गोष्टीच्या जवळ नेले. कथेच्या गरजेनुसार कधी खेळकर, कधी विनोदी, कधी गंभीर भाव जागृत करणारी, मुलांना व मोठ्याना मुग्ध करणारी चित्रे काढली. मुलांच्या पुस्तकाचे चित्रण करणाऱ्या अथनू लेखकाने रचलेल्या गोष्टीला, पात्रांना खुलवले.
पाण्यातील चित्रण अथवा "गिज्जीगडू' या मोठ्या आकाराच्या पुस्तकामधील सूक्ष्म बारकावे टिपणारी मंत्रमुग्ध करणारी चित्रे असोत वा "घुमान्तुको का डेरा' या काव्यसंग्रहामधील, कवितेचा भाव आपल्यापर्यंत पोचवणारी रेखाचित्रे असोत. अथनूच्या वैविध्यपूर्ण शैलीने, सर्जनशीलतेने कविता, गोष्टी आपल्या मनात घर करतात, त्याचे नवीन पदर आपल्यासमोर उलगडून दाखवतात.
भारतीय बालसाहित्यामधील दोन महत्त्वाच्या, कर्तबगार लेखक - चित्रकारांचा सन्मान करून बिग लिटिल बुक अवार्डची समर्पक सुरवात झाली. दीर्घकाळ बालसाहित्यात समर्पित भावनेने उच्च दर्जाचे काम करणाऱ्या बाल साहित्यकाराच्या कामाकडे सर्वांनीच अधिक लक्ष द्यायची वेळ आली आहे. मुलांसाठी लिहिणे हे महत्त्वाचे, जोखीमच काम आहे, ज्यात देशातील अव्वल प्रतिभेची गरज आहे, हे आपण कधी ओळखणार? स्वतंत्र विचार करणारी, प्रश्न विचारणारी, आपला विचार इतरांसामोर मांडू शकणारी पिढी घडवायची असेल तर उत्तम साहित्याला पर्याय नाही, याची आपल्या सर्वांनाच
जाणीव व्हायला हवी आहे.

Web Title: words and lines that fulfill children's life