अग्रलेख : पराजयातील सौंदर्य!

england vs newzland
england vs newzland

सुपरसंडेची सुपर संध्याकाळ क्रीडारसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. या दोन्ही लढतींतून शिकण्याजोगे एवढेच की पराभव हा नेहमीच क्‍लेशदायी नसतो. दिलेरीने लढणारा पराभूत होता होतादेखील शेकडो सलामांचा धनी होतो.

दु सऱ्या महायुद्धात ब्रिटनला समर्थ नेतृत्व देणारे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल त्यांच्या अमोघ वक्‍तृत्वासाठी ख्यातनाम होते. किंबहुना शब्दसामर्थ्याच्या जोरावरच त्यांनी ब्रिटिश साम्राज्याची अस्मिता धगधगती ठेवली असे म्हटले तरी चालेल. एका भाषणात त्यांनी म्हटले होते : ‘युद्धात निग्रह, पराजयात प्रतिकार, विजयात उमदेपणा आणि शांतिपर्वात भलाई सुंदर दिसते.’ त्यांनी वर्णिलेल्या सुंदरतेचा साक्षात्कार त्यांच्याच आंग्लभूमीत रविवारी अनुभवता आला. तसा तो जगभरातल्या कोट्यवधी रसिकांनी डोळे भरून पाहिला. पण ही सायंकाळ लंडनवासीयांसाठी अभूतपूर्व ठरली. दोन सदाबहार खेळांच्या दोन विभिन्न मैदानांमध्ये तुल्यबळ प्रतिस्पर्धी कसे सर्वस्व पणाला लावून झुंजतात, ते त्यांना बघायला मिळाले. तसे पाहू गेल्यास क्रिकेट आणि टेनिस ही खेळांची दोन भिन्न विश्‍वे. परंतु, जणू या अभूतपूर्व सायंकाळी ही विश्‍वे एकमेकांमध्ये गुंतून गेली आणि त्यातून मानवी संस्कृतीतील काही शाश्‍वत मूल्यांचे इंद्रधनुष्य साकारत गेले. तो थरार, ती उत्कंठा, क्षणाक्षणाला इथे-तिथे झुकणारे पारडे या गारुडात अवघे विश्‍व लपेटले गेले. ही सायंकाळ सहजी विस्मरणात जाणे, केवळ अशक्‍य आहे. लॉर्डसच्या क्रिकेटच्या पंढरीत विश्‍वकरंडकाच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंड संघाने बाजी मारली ती शेवटच्या क्षणी, शेवटच्या चेंडूनंतर..! या इंग्लिश विजयात, न्यूझीलंडचा तिखट प्रकार आणि दुर्दम्य लढाऊ वृत्तीच अधिक झळाळून उठली. त्याच वेळी तेथून हाकेच्या अंतरावर-बारा मैलांवर-असलेल्या विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर अंतिम लढत रंगली होती ती गतविजेता नोवाक जोकोविच आणि जुन्या जाणता रॉजर फेडरर यांच्यात. तारुण्याचा जोश आणि जाणत्याचा अनुभव यांच्यातली ही लढत होती. ‘जणू जिंकाया गगनाचे स्वामित्व, आषाढघनांशी झुंजे वादळवात’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्‍ती आठवाव्यात, अशा या दोन लढती एकाच वेळी कळसाध्यायास गेल्या. जगभरातल्या कोट्यवधी टीव्ही संचांसमोर बसलेल्या रसिक चाहत्यांना काही काळ कळतच नव्हते की कुठली वाहिनी पाहत राहावे? दोन्हीकडे थरार काठोकाठ भरलेला. दोन्हीकडे तुंबळ लढाई सुरू होती. एक लढत पाहावी, तो दुसरीकडे काहीतरी नाट्यमय घडणार आणि ते पाहणे राहून जाणार, हे निश्‍चित... तब्बल पाच तास झुंजत तरण्याबांड जोकोविचने फेडररचे तिखट आव्हान सुपर टायब्रेकरवर संपवले आणि विंबल्डनचा झळाळता करंडक महत्प्रयासाने पटकावला. त्याच्यानंतर थोड्याच वेळाने लॉर्डसवर रंगलेली न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड ही अंतिम लढत चक्‍क बरोबरीत सुटली आणि सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. तिथेही जिगरबाज न्यूझीलंडने बरोबरी साधलीच. विश्‍वकरंडकाची ही अंतिम लढत इंग्लंडने चौकारांच्या जुजबी आधिक्‍याच्या जोरावर जिंकली; पण खऱ्या क्रीडारसिकांच्या दृष्टीने या लढतीत मने जिंकली ती न्यूझीलंडनेच. इंग्लंडच्या विजयाला दैवाची साथ होती. ती नसलेल्या न्यूझीलंडचा प्रतिकार मात्र सुंदर दिसला.
वास्तविक उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर खरे तर विश्‍वकरंडकातली आपल्यापुरती हवा निघून गेली होती. उत्साह मावळला होता. काही उत्साही भारतीय मंडळींनी अंतिम लढतीची महागडी तिकिटे आधीच राखून ठेवली होती, त्यांनी चक्‍क काळ्या बाजारात तिकिटे विकायला काढली. पण तरीही लॉर्डसच्या गर्दीत अनेक भारतीय चेहरे दिसत होते, हे खरेच. त्यांना डोळ्यांदेखत इतिहास घडताना पाहायला मिळाला. क्रिकेटच्या जन्मदात्या देशाकडील शोभेच्या कपाटात विश्‍वकरंडक नव्हता. या लढतीनंतर तो अखेर येऊन विसावला. इंग्लंड संघाचे हे यश नेत्रदीपक खरेच, पण न्यूझीलंडचा पराभव मने जिंकून गेला, हे अधिक महत्त्वाचे. त्याचबरोबर सर्बियाच्या तरण्याबांड नोवाक जोकोविचला फेडररवर मात करण्यासाठी जी काही झुंज द्यावी लागली, त्यालाही तोड नव्हती. वयाच्या अडतिसाव्या वर्षी फेडररने दाखवलेली जिगर आणि प्रतिभा, त्याला लवून कुर्निसात करावा, अशीच होती. ज्या वयात टेनिसपटू निवृत्तीच्या घोषणा करतात, त्या वयात फेडरर पाच-पाच तास जिगरीने झुंजतो आहे, हे खरोखर विलक्षण मानायला हवे. म्हणूनच जोकोविचच्या विजयापेक्षा फेडररचा पराभव अधिक नेत्रदीपक होता, हे कुठलाही टेनिसरसिक मान्य करेल. लढतीतील विजयानंतर जोकोविचने गुडघ्यावर बसून विंबल्डनच्या ग्रासकोर्टवरले थोडेसे गवत खाऊन पाहिले आणि ते रुचकर असल्यागत मान डोलावली. त्याच्या या कृतीतूनच या ऐतिहासिक लढतीचा महिमा अधोरेखित झाला. दोन्ही लढतींनी गाजलेली सुपरसंडेची सुपर संध्याकाळ क्रीडारसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. कारण या दोन्ही लढतींमध्ये क्षणाक्षणाला इतिहास कलाटणी घेत होता. योगायोगांचे नाट्य भरलेले होते. झुंजार खेळ्यांचे दाखले होते. खेळाच्या मैदानात जे जे अभिप्रेत असते, ते सारे काही मौजूद होते. यातून शिकण्याजोगे एवढेच की, पराभव हा नेहमीच क्‍लेशदायी नसतो. दिलेरीने लढणारा पराभूत होता होतादेखील शेकडो सलामांचा धनी होतो. लढणे महत्त्वाचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com