
कचरावेचक महिलांसाठी लढणारी रणरागिणी
समाजात विविध संस्था, दानशूर व्यक्ती गोरगरिबांची आणि गरजूंची सेवा करीत असतात; मात्र स्वत: दोन घरची कामे करून उपजीविका करणाऱ्या ठाण्यातील वागळे इस्टेट येथील गंगाधरनगरात राहणाऱ्या शोभा वैराळ यांची सेवा करण्याची पद्धत निराळीच आहे. कचरावेचक महिलांसाठी लढणारी रणरागिणी अशी त्यांची ओळख करून द्यावी लागेल.
- राहुल क्षीरसागर, ठाणे
स्वतः झाडलोट करून पोट भरता भरता शोभा इतरांना मदत करतात. घरात जे किलो-दोन किलो धान्य असेल त्यातील निम्मे धान्य देऊन गरजूंची भूक भागवतात. कोरोना काळात शासनाकडून निर्बंध लादण्यात आले, तेव्हा घरकाम करणाऱ्या व कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या अनेक निराधार महिलांना आधार देण्याचे काम त्यांनी केले.
एवढ्यावरच न थांबता पालिका प्रशासनाने शहरातील कचराकुंड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कचरावेचक महिलांवर उपासमारीची वेळ ओढवली. अशा वेळी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या पेचात सापडलेल्या महिलांसाठी त्यांनी लढा सुरू केला असून त्यांना रोजगार मिळावा यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावादेखील करत आहेत.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपूर्वी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडून टाळेबंदी करण्यात आली. या टाळेबंदीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या बुडाल्या त्यात काच-पत्रा वेचून कुटुंबाचे पोट भरणाऱ्यांचा पोट भरण्याचा मार्ग बंद झाला.
अशा वेळी या महिलांना घर कसे चालवायचे, कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असे प्रश्न सतावत होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही समाजसेवक, संस्था आणि सरकारने मदत केली; मात्र नंतर एकीकडून घरकामासाठी त्यांना कोणी बोलवेना आणि काच-पत्रा वेचून ते विकून उदरनिर्वाह करावा तर भंगाराची दुकानेही कोरोनाच्या भीतीने बंद झाली.
अशा कठीण प्रसंगी शोभा वैराळ या भुकेलेल्या कुटुंबीयांच्या पोटात अन्नाचे दोन घास कसे जातील याचा प्रयत्न करू लागल्या. ऐन कोरोना काळात त्या जीवाची पर्वा न करता कामाला लागल्या.
स्वतःच्या घरातच अन्नधान्याची टंचाई असताना त्या या गरिबांसाठी सामाजिक संस्था, दानशूर, समाजसेवक, लोकप्रतिनिधी यांचे उंबरठे झिजवून त्यांच्यासाठी शिधा मागून कळवा येथील महात्मा फुलेनगर, साईनगर, पातलीपाडा, गंगाधरनगर, महाराष्ट्रनगर अशा विविध
ठिकाणी झोपटपट्टी भागात राहणाऱ्या गरीब महिलांच्या कुटुंबांना मदत करू लागल्या. मदतीसाठी त्या विशेषतः काचपत्रा वेचक महिला, घरकाम करणाऱ्या महिला यांची निवड करतात. स्वतः एका सोसायटीत झाडलोट करण्याचे काम करणाऱ्या शोभा यांना जेमतेम पगार मिळतो.
पतीचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले स्वतःच्या चुलीची पर्वा न करता शोभा या दुसऱ्यांची चूल कशी पेटेल, याकडे लक्ष देत आहेत. आजवर त्यांनी ५०० हून अधिक कुटुंबांच्या चुली पेटवून त्यांची भूक शमवली आहे. न्यू इंडिया संस्था, सिग्नल शाळा यांसारख्या ठिकाणाहून त्यांना चांगली मदत मिळाल्याचे त्या सांगतात. त्यासाठी समाजसेवक जगदीश खैरालिया, भटू सावंत यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. इतरांवरबद्दल असलेली तळमळ हीच त्यांच्या समाजसेवेसाठीची ऊर्जा आहे.
रोजगारांसाठी लढा
ठाणे महापालिकेने शहर कचरामुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. शहर कचराकुंडी मुक्त करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून १६५ ठिकाणे कचराकुंडीमुक्त केली आहेत. त्यामुळे कचरा वेचक महिलांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली असल्याचे शोभा वैराळ यांनी सांगितले. यासाठी समाजसेवक जगदीश खैरालिया यांच्या माध्यमातून कचरावेचक महिलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी लढा सुरू केला आहे.