चतुरस्र मल्ल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

तीन मार्च १९७३ रोजी मुंबईतील आखाड्यात ‘रुस्तम-ए-हिंद’ या मानाच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दादू चौगले यांनी दीनानाथसिंह यांना चीत करून मैदान मारले आणि नंतर महिनाभरात नेत्रपालसिंहला अस्मान दाखवून दादूंनी ‘महान भारत केसरी’ किताब पटकावला. देशाच्या कुस्तीच्या क्षितिजावर कोल्हापूरच्या दादू चौगले नावाचा तारा तेव्हापासून चमकू लागला.

तीन मार्च १९७३ रोजी मुंबईतील आखाड्यात ‘रुस्तम-ए-हिंद’ या मानाच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दादू चौगले यांनी दीनानाथसिंह यांना चीत करून मैदान मारले आणि नंतर महिनाभरात नेत्रपालसिंहला अस्मान दाखवून दादूंनी ‘महान भारत केसरी’ किताब पटकावला. देशाच्या कुस्तीच्या क्षितिजावर कोल्हापूरच्या दादू चौगले नावाचा तारा तेव्हापासून चमकू लागला.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शंभर किलो फ्रीस्टाईल गटात रौप्यपदक पटकावत त्यांनी कोल्हापूरचा झेंडा परदेशातही रोवला.त्यांचे नाव जगभर पोचले खरे; पण त्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत अहोरात्र घाम गाळला होता. वयाच्या दहाव्या वर्षी ते कोल्हापुरात आले आणि मोतीबाग तालमीचा घटक झाले. वस्ताद बाळू बिरे, बाळ गायकवाड, गणपतराव आंदळकर यांनी त्यांना कुस्तीचे डावपेच शिकवले.कष्टांना कमी न पडणाऱ्या दादूंनी आपल्या वस्तादांना तक्रारीची संधी दिली नाही. प्रत्येक डाव स्वतःमध्ये भिनवला. प्रतिस्पर्ध्याला ते केव्हा चितपट करत हे समजत नसे. त्यांचा ‘ढाक डाव’ म्हणजे प्रतिस्पर्धी मल्लाचा पराभव ठरलेला. ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होत त्यांनी दबदबा निर्माण केला. मैदानात आक्रमक असणारे दादू मैदानाबाहेर मृदू स्वभावाचे होते. पठ्ठे तयार करताना ते कमालीचे कठोर होत. मात्र, आखाड्यातून पैलवान बाहेर आला, की त्याला जवळ बसवून वडीलकीच्या नात्याने समजावून सांगत. ‘हार-जितसाठी नाही, तर कुस्तीसाठी खेळायचं’ हे सूत्र त्यांनी अखेरपर्यंत जपले आणि पठ्ठ्यांमध्येही भिनवले. नेत्रपालसिंह, जगदीश म्हेतर, कर्तारसिंह, दीनानाथसिंह या तोडीच्या मल्लांना त्यांनी पराभूत केले. मात्र, मैदानाबाहेर त्यांच्याशी मैत्रीचे नाते जपले. मुलांकडे कुस्तीचा वारसा सोपवला. कोल्हापूरच्या मल्लांना राष्ट्रीय स्तरावर चमकवण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले. त्यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘ध्यानचंद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तेव्हा अवघ्या कुस्ती क्षेत्राची मान अभिमानाने उंचावली.अशा या चतुरस्र मल्लाचे निधन झाले असले तरी त्यांचे कर्तृत्व यापुढेही प्रेरणा देत राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrestling legend Dadu Chougule