ग्रंथघराच्या पायऱ्यांवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

young generation has no interest in book reading Estonia is home to worlds largest number of librarians

पुस्तकांवर पाच-सहाशे रुपये खर्च करण्यापेक्षा तेवढ्या पैशात भरभक्कम ‘रिचार्ज’ भरुन घेतला तर मोबाइल फोन दुनियेतली कुठलीही हवी ती माहिती हाजिर करुन देतो, हा साधा आणि रोखठोक व्यवहार नव्या पिढीच्या अंगवळणी पडला आहे

ग्रंथघराच्या पायऱ्यांवर...

तरुण पिढीला पुस्तकांची, वाचनाची ओढ नाही. हातातल्या मोबाइलमध्ये किंवा गेला बाजार मांडीवरल्या संगणकीय पडद्यावर जितके काही पांढऱ्यावरले काळे नजरेला पडेल, तितके या तरुणांना पुरेसे होते. सबब, पुस्तकांचे प्रेमी नावाची प्रजाती आता दिवसेंदिवस नामशेष होऊ लागली आहे, अशी ओरड सतत होत असते. पुस्तकांवर पाच-सहाशे रुपये खर्च करण्यापेक्षा तेवढ्या पैशात भरभक्कम ‘रिचार्ज’ भरुन घेतला तर मोबाइल फोन दुनियेतली कुठलीही हवी ती माहिती हाजिर करुन देतो, हा साधा आणि रोखठोक व्यवहार नव्या पिढीच्या अंगवळणी पडला आहे. नव्वदीच्या दशकात जन्मलेली ‘मिलेनियल्स’ची पिढी असो वा, नव्या सहस्त्रकात पृथ्वीतलावर अवतरलेली नवथरांची ‘जेनझी’ पिढी असो, पुस्तकांचा किडा या पिढ्यांमध्ये फार क्वचित आढळतो. जाडजूड चष्मा लावून वाचनानंदात बुडालेली व्यक्ती फार तर टीव्ही मालिकेत किंवा चित्रपटात दिसली तर!...अर्थात नव्या पिढीचे हे जे चित्र उभे केले जाते, ते तितकेसे खरे मात्र नाही. नव्या पिढ्याही वाचणाऱ्या पिढ्या आहेत, हाताला चांगले पुस्तक गवसले तर त्यात डोके खुपसण्याची त्यांची तयारी असते, हे वारंवार दिसून आले आहे. त्यांच्या हातातील ‘आशय’ महत्त्वाचा असेल तर तो कागद आहे की संगणकाचा पडदा किंवा मोबाईलची स्क्रीन हा केवळ तांत्रिक तपशीलाचा भाग!

नवी पिढीदेखील उत्साहाने वाचायला तयार आहे, याचा एक ढळढळीत पुरावा गुरुवारी मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथविक्री प्रदर्शनाच्यावेळी मिळाला. तब्बल दोनशे वर्षाहून जुन्या एशियाटिक लायब्ररीकडे अक्षरश: हजारो-लाखोंची ग्रंथसंपदा आहे. निव्वळ ग्रंथसंपदाच नव्हे, तर प्राचीन हस्तलिखितांपासून दुर्मिळ शिल्पे वा नाणी यांचाही संग्रह तिथे बंदिस्त आहे. एशियाटिक सोसायटीचे तीन हजार सदस्य त्यांचा लाभ मन:पूत घेऊ शकतात. अनेक पुस्तके या संस्थेला दान केली जातात किंवा भेट म्हणून दिली जातात. साहजिकच अनेक पुस्तकांच्या दोनपेक्षा जास्त प्रती उपलब्ध होतात. या जास्तीच्या प्रतींची विल्हेवाट लावण्यापेक्षा ग्रंथप्रेमींना अल्पशा मोबदल्यात विकून टाकावीत, अशा हेतूने संस्थाचालकांनी ५ ते १८ मे या कालावधीत जुन्या ग्रंथांचे आणि नियतकालिकांचे विक्री-प्रदर्शन जाहीर केले. अवघ्या तीस रुपयात पुस्तक आणि वीस रुपयात जुने संग्राह्य नियतकालिक मिळण्याची ही सुवर्णसंधी ग्रंथप्रेमींनी वाया दवडली नाही. दहा-बारा दिवसांच्या या प्रदर्शनाचा अवघ्या दोन तासात ‘ग्रंथ आटोपला’! दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल येथील एशियाटिक सोसायटीची ऐतिहासिक इमारत गुरुवारी सकाळी ग्रंथप्रेमींनी फुलून गेली होती. तेथील उतरत्या पायऱ्यांचे दर्शन आपल्याला चित्रपटांमध्ये हमेशा होत असते, पण त्या पायऱ्यांवर ग्रंथप्रेमी रांगा धरुन उभे असल्याचे रमणीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारेच म्हणावे लागेल. पहिल्या अर्ध्या तासातच बहुतेकांना परत जावे लागेल, याचा अंदाज आला. अर्थात विक्रीसाठी फक्त चार हजार पुस्तकेच तूर्त ठेवण्यात आली होती, हे खरेच. परंतु, भविष्यात आणखी अशी प्रदर्शने आयोजित करण्याचा विचार संस्थाचालकांच्या मनात घोळू लागला आहे. त्यामुळे ग्रंथप्रेमींनी नाऊमेद होण्याचे कारण नाही. विशेष म्हणजे या प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी तरुणांचीच होती, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल.

जगात सर्वाधिक ग्रंथप्रेमी इस्टोनिया या देशात राहतात, असे ‘युनेस्को’ची आकडेवारी सांगते. अमेरिकेत सर्वाधिक पुस्तके छापली जातात. जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांमध्येही ग्रंथांबद्दल आस्था दिसते. परंतु, भारतही फार मागे नाही. ग्रंथव्यवहाराच्या रांगेत भारत नवव्या स्थानावर आहे. या रांगेत शेजारी पाकिस्तानचा नंबर पार चोपन्नावा लागतो, ही माहिती राष्ट्रप्रेमींना काहीशी सुखावणारी असली तरी थायलंड, सिंगापूर सारखे छोटे देश भारतापेक्षाही पुढे आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. पुस्तकांची दुकाने आणि वाचनालये रिकामे पडलेली असतानाच, आणि पुस्तकांना उठाव नसल्याची प्रकाशकवर्गाची कुरकूर सदोदित ऐकू येत असताना, एशियाटिक सोसायटीला मात्र हे यश कसे साधले असेल? हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे. एशियाटिक सोसायटीने विक्रीला उपलब्ध करुन दिलेली पुस्तके जुनी होती, आणि त्याची किंमत वीस-तीस रुपये इतकीच होती. कायदा, भौतिकशास्त्र, खगोलविज्ञान, भविष्य, विश्वकोश आदींवर ग्रंथप्रेमींच्या उड्या पडल्या. चिनी चित्रलिपीतील इंग्रजीत अनुवाद असलेली पुस्तकेही हातोहात खपली. जुन्या नियतकालिकांचे गठ्ठे रसिकांनी उचलले. हे सारे साहित्य बव्हंशी इंग्रजीतलेच होते. नवीकोरी पुस्तके विकत घेणे परवडत नसल्याचे हे लक्षण मानायचे का? परवडणाऱ्या किंमतीत पुस्तके उपलब्ध झाली तर ती मोठ्या प्रमाणावर खपतील, वाचली जातील का? या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आता गांभीर्याने पाहायला हवे आहे. जुन्या पुस्तकातील आशयावर लोकांच्या उड्या पडतात, कारण त्यातील माहिती उपयुक्त आणि विश्वासार्ह मानली जाते. लेखकांची नवी पिढी चांगला, विश्वासार्ह आशय देण्यात कुठे तरी कमी पडते आहे का, याचाही वस्तुनिष्ठ विचार व्हायला हवा आहे. एशियाटिक सोसायटीप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील वाचनालयांनी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेऊन ग्रंथ-चळवळ पुढे न्यायला हवी, असे वाटते. एशियाटिक सोसायटीने ग्रंथप्रेमींसाठी नवे दार किलकिले करुन दिले. कोर्टाच्या पायरीचे राहू द्या, एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्या चढण्यात मात्र नक्कीच शहाणपण आहे.

अभिजात साहित्यकृतींचे वाचन म्हणजे जणू प्राचीन काळातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांशी संवादच.

- रेने देकार्त, फ्रेंच तत्त्ववेत्ता

Web Title: Young Generation Has No Interest In Book Reading Estonia Is Home To Worlds Largest Number Of Librarians

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top