सर्वांत तरुण अन्‌ ज्येष्ठ कारभारणी!

महेंद्र महाजन
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

80 वर्षे आणि 21 वर्षे

विकास प्रक्रियेतील सर्वांत तरुण अन्‌ ज्येष्ठ कारभारणी नाशिककरांनी निवडून दिल्या आहेत. त्यातील एक आहेत वयाची ऐंशी वर्षे गाठलेल्या भिकूबाई किसन बागूल आणि दुसऱ्या आहेत अवघ्या 21 वर्षे चार महिन्यांच्या प्रियंका किशोर घाटे. भिकूबाई बागूल यांनी साडेचार हजार, तर प्रियंका घाटे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर चार हजार दोनशेहून अधिक मताधिक्‍क्‍याने मात केली.

महापालिका स्थापनेनंतर पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या रूपाने राजकीय पक्षाला एकहाती सत्ता दिली. तसेही नाशिककर नेहमीच 'व्हायब्रंट' राहिले आहेत. कुणी काहीही म्हटले तरी, नाशिककरांना करायचे तेच ते करत आले आहेत. लाटेवर स्वार होण्याचा नाशिकचा इतिहास आहे. अगदी आताच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मागे टाकत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. 66 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने नाशिकच्या माध्यमातून आणखी एक वेगळा पैलू राज्यापुढे ठेवलाय.

भिकूबाई बागूल तिसऱ्यांदा सभागृहात पोचल्या आहेत. त्यांनी यापूर्वी एकदा तीन सदस्यांच्या प्रभागातून, तर एकदा वॉर्डमधून निवडणूक जिंकली होती. भाजपचे प्रदेश नेते सुनील बागूल यांच्या त्या मातोश्री होत. भिकूबाई यांचा उत्साह आजही वाखाणण्याजोगा आहे. आपल्या प्रभागातील कोणती कामे राहिली आहेत अन्‌ ती कशी मार्गी लावायची, याचे वेळापत्रक त्यांनी विजयानंतर दुसऱ्याच दिवशी तयार केले आहे. त्यांचा एक मुलगा संजय यांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. पंचवटीतले बागूल घराणे पूर्वी शिवसेनेमध्ये होते. नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि गेल्या दोन वर्षांत भारतीय जनता पक्ष असा सुनील बागूल यांचा राजकीय प्रवास झाला आहे.

रिपब्लिकन चळवळीतील किशोर घाटे यांची प्रियंका ही कन्या. त्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी बी. कॉम. ही पदवी गेल्यावर्षीच संपादली असून, आता एम. कॉम.चे शिक्षण घेताहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर प्रियंका मितभाषी म्हणून ओळखल्या जायच्या; पण निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आणि त्यांनी संवादाचे कौशल्य अवगत केले. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा हे आपल्या प्राधान्यक्रमाचे विषय असतील, असे सांगत प्रियंका यांनी शहर विकासाचे आपले व्हिजन निश्‍चित केले आहे.

Web Title: youngest and oldest corporator from nashik