पहिल्या महायुद्धाची शंभर वर्षं (प्रा. श्रुती भातखंडे)

100 years of first world war by Shruti Bhatkhande
100 years of first world war by Shruti Bhatkhande

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा केल्याला आज (ता. ११ नोव्हेंबर) शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं, तरी सध्याच्या अनेक समीकरणांची बीजं त्या काळातल्या घटनांत सापडतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळची स्थिती, वेगवेगळ्या देशांमधले संबंध आणि एकूण घटना या सर्वांवर एक नजर.

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी अकरा वाजता घोषणा झाली. सतत चार वर्षं, तीन महिने, जमिनीवरून-खालून, समुद्रावरून-खालून, आकाशामधून होणारा शस्त्रास्त्रांचा कर्कश्‍श आवाज थांबला आणि सर्व जगानंच सुटकेचा निःश्वास टाकला. जगातल्या सर्वच देशांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या युद्धात सहभाग घेतला होता.                         

विसावं शतक संघर्षांचं आणि अनेक घडामोडींचं मानलं जातं. दोन महायुद्धं, रशियन राज्यक्रांती या ठळक घटना! औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक शोध यांमुळं मानवाचं भौतिक जीवन सुखी झालं; पण त्याचबरोबर संशोधन केलेली नवीन घातक अस्त्रं, शस्त्रं, त्यांचा मानवावरच झालेला वापर यामुळं मानवसंहारच झाला. युद्ध संपेपर्यंत चार साम्राज्यं लयाला गेली. युरोपचा नकाशा बदलला. पहिल्या महायुद्धात (इसवीसन १९१४-१९१८) अंदाजे एक कोटी पासष्ट लाख लोक मृत्यू पावले. दोन कोटी बारा लाख लोक जखमी झाले. अपंग, बेघर, बेपत्ता लोकांची संख्या तेवढीच मोठी होती. आर्थिक नुकसानाचा आकडा प्रचंड मोठा होता. इतकं विनाशकारी युद्ध का झालं असावं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्या शतकातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करावा लागतो. 

पहिल्या महायुद्धाचं मूळ कारण कोणतं हे ठरवणं अवघड आहे. या कालखंडात सर्वच प्रमुख राष्ट्रं युद्धाच्या दिशेनं प्रवास करत होती. युद्धाची खरी कारणं युरोपच्या राजकारणातच दडली होती. परस्परविरोधी वातावरण, आकांक्षा, स्पर्धा, द्वेष, सूड, साशंकता, गटबाजी, भीती, यांमुळं युरोपचं राजकारण स्फोटक बनलं. फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य असलेल्या नेपोलियन बोनापार्ट (१७६९-१८२१) या सम्राटानं युरोपवर वीस वर्षं सत्ता गाजवली. जग जिंकण्यासाठी इटली, ऑस्ट्रिया, इजिप्त, रशियावर स्वाऱ्या केल्या. पुढं इजिप्त वगळून याच इतर देशांनी संयुक्तपणे वॉटर्लूच्या लढाईत त्याचा पराभव केला आणि त्याची रवानगी सेंट हेलिना बेटावर केली. नेपोलियनच्या पाडावानंतर युरोपची पुनर्रचना ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर मेटरनिकच्या नेतृत्वाखाली व्हिएन्ना परिषदेत करण्यात आली. नेपोलियननं युरोपच्या नकाशात केलेले बदल मेटरनिकला दुरुस्त करावे लागले. ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, इंग्लंड यांनी संयुक्त युरोपमार्फत (Concert of Europe) पुनर्रचना, पुनर्स्थापना, मोबदला, शांतता, सहकार्य आणि फ्रान्सभोवती मजबूत देशांची साखळी केली गेली, जी पुढं बिस्मार्कच्या धोरणांमध्ये दिसून आली. जुन्या राजघराण्यांना सत्ता देऊन लोकशाही, उदारमतवाद, क्रांती अशा भावना दडपून टाकण्यात आल्या आणि प्रतिगामी धोरण राबवण्यात आलं. त्याला १८४८ मध्ये अपयश आलं आणि सर्वच युरोपियन देशांत राष्ट्रवाद वाढीस लागला. या राष्ट्रवादानं प्रेरित झालेले इटलीचे मॅझनी, काव्हूर, गॅरिबाल्डी आणि व्हिक्‍टर इमॅन्युअल यांनी एकीकरण घडवून जगाच्या नकाशावर इटली हा स्वतंत्र देश अस्तित्वात आणला.

जर्मनीचं एकीकरण, बिस्मार्कचं राजकारण आणि कैसर विल्यमची महत्त्वाकांक्षा या तीन घटकांचा विचार जर्मनीच्या परराष्ट्र धोरणांशी जोडला गेला होता. हे धोरण पहिल्या महायुद्धाचं वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत होतं. १८७१ पूर्वी जर्मनी भौगोलिकदृष्ट्या एकसंध नव्हता, अनेक स्वतंत्र राज्यं होती;  पण त्यांना एकीकरणाची इच्छा होती. नेपोलियननं तेरा राज्यांना एकत्र करून ऱ्हाईनचा राज्यसंघ निर्माण केला; पण मेटरनिक एकीकरणाच्या विरोधात असल्यानं त्यानं ३९ राज्यांचा एक दुर्बल राज्यसंघ निर्माण केला; पण जर्मन एकीकरणाच्या दिशेनं काही पावलं पुढं पडली. १८१७ मध्ये जेना विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी लिपझिकच्या लढाईचा स्मृतीदिन साजरा केला. १८१८ मध्ये उत्तर जर्मनी राज्यसंघामध्ये एक जकातसंघ स्थापन झाला (झोल्वेरिन). फ्रान्समधली १८३० मधली जुलै क्रांती आणि १८४८ मधल्या क्रांतीचा प्रसार जर्मनीत झाला आणि एकीकरणानं वेग घेतला.

फ्रेडरिक विल्यम पहिला हा जर्मनीचा राजा होता. १८७१ मध्ये जर्मनीचा चॅन्सेलर (पंतप्रधान) बिस्मार्क यानं जर्मनीतली संस्थानं एकत्र करून जर्मन राष्ट्राची निर्मिती प्रशियाच्या नेतृत्वाखाली केली. यासाठी त्यानं डावपेच लढवले, कूटनीतीचा आणि मुत्सद्देगिरीचा वापर केला. जर्मन एकीकरणासाठी त्यानं तीन युद्धं केली. १८६४ मध्ये डेन्मार्कशी पहिलं युद्ध केलं. डेन्मार्कच्या ताब्यातल्या श्‍लेस्विग आणि हॉल्स्टिन या जर्मन बहुभाषक प्रदेशाचा ताबा मिळवण्यासाठी युद्ध केलं. श्‍लेस्विग जर्मनीकडं, हॉल्टिन ऑस्ट्रियाकडं ठेवलं. जर्मन राज्यसंघाचा अध्यक्ष या पदावरून ऑस्ट्रियाला दूर करण्यासाठी १८६६ मध्ये त्यानं ऑस्ट्रियाशी दुसरं युद्ध केलं. त्या आधी इटली, रशिया, फ्रान्स या राष्ट्रांशी राजनैतिक स्वरूपाची बोलणी करून ऑस्ट्रो-प्रशिया युद्धामध्ये हे देश तटस्थ राहतील, अशी योजना केली. ऑस्ट्रियाचा सेडोवाच्या युद्धात पराभव करून एक अडथळा दूर केला. १८७०-७१ मध्ये फ्रान्सशी युद्ध केलं. जर्मन सम्राट फ्रेडरिक आणि फ्रान्सचा सम्राट लुई नेपोलियन तिसरा यांच्यात स्पेन गादीच्या प्रश्नावरून समझोता झाला होता; पण ही बातमी बिस्मार्कनं शाब्दिक अदलाबदल करून प्रसिद्ध केली. याला इतिहासात ‘एम्स टेलिग्राम’ असं म्हणतात. फ्रान्सशी युद्ध करण्याआधी कोणतंही राष्ट्र त्याच्या मदतीला जाणार नाही याची त्यानं काळजी घेतली. सर्व देशांशी चतुरपणे यशस्वी बोलणी करून फ्रान्सचा सेडानच्या रणांगणावर पराभव केला. या राजनीतीला रक्त आणि शस्त्र नीती (blood and iron) म्हणतात. फ्रान्सकडून त्यानं आल्सेस, लोरेन हे प्रांत घेतले. वीस कोटी फ्रॅंक्‍स खंडणी लादली. व्हर्सायच्या आरसेमहालात प्रशियाच्या राजाला फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित केलं. जर्मन राष्ट्राची घोषणा करून लुई नेपोलियनला युद्धकैदी घोषित केलं. बिस्मार्क म्हणतो ः ‘Not by speeches and majority votes are the great questions of the day decided and that was the mistake of १८४८-१८४९and but by blood and iron.’’ यानंतर बिस्मार्कचं परराष्ट्रधोरण बदललं. १८७३ मध्ये त्यानं तीन सम्राट संघांची स्थापना केली. हा त्याच्या चाणाक्षपणाचा, धूर्तपणाचा आणि कूटनीतीचा कळस होता. जागतिक शांतता आणि सुरक्षितता कायम राहावी म्हणून ऑस्ट्रिया, प्रशिया आणि रशिया यांचा गट तयार केला. १८७९ मध्ये त्यानं द्विराष्ट्र करार केला. या करारानं ऑस्ट्रियाशी घनिष्ठ मैत्री केली. रशियाला दूर  सारलं. १८८२ मध्ये ऑस्ट्रिया-जर्मनी-इटली मैत्री करार केला. फ्रान्सविरोधी शांतता आणि सत्तासंतुलन राखण्यासाठी हा करार केला, असं त्यानं भासवलं. १८७८मध्ये बर्लिन इथं युरोपियन राष्ट्रांची बैठक भरवली.  १८८७मध्ये तीन सम्राट संघाचं पुनरुज्जीवन केलं. हा एक संरक्षणात्मक डावपेच होता. जर्मनीचा शत्रू फ्रान्सला युरोपात एकाकी पाडणं, बड्या राष्ट्रांना आपल्या बाजूला वळवणं आणि जर्मनीच्या स्वसंरक्षणार्थ फळी उभारणं, भूमध्य सागरावर कुणाचं वर्चस्व राहणार नाही याची दक्षता घेणं इत्यादी.

परराष्ट्रनीतीची ही गुंतागुंतीची रचना संघ, उपसंघ करून त्यानं आंतरराष्ट्रीय राजकारण जर्मनीकेंद्रित केलं. हे कूटनीतीचे यंत्र त्यानं कार्यक्षमरित्या चालवलं. कैसर विल्यम म्हणतो ः ‘बिस्मार्क ऑस्ट्रिया, इटली, फ्रान्स ,रशिया, इंग्लंड हे पाचही चेंडू दोन हातांनी उडवत असतो. त्यातला एकही चेंडू तो खाली पडू देत नाही. त्यातले दोन तरी हवेत असतात.’ या धोरणामुळं युरोपात अस्थिरता निर्माण झाली. जर्मनी हे राष्ट्र मूलतः लष्करवादी प्रवृत्तीचं होतं. लष्कराच्या जोरावर एकीकरण झाल्यानं जर्मनीची प्रतिष्ठा, स्थैर्य, प्रभुत्व लष्करी सामर्थ्यानं मिळतील अशी जर्मन मनोवृत्ती बनली. 

फ्रान्समध्ये लुई नेपोलियन तिसरा याची राजवट होती. फ्रॅंकफर्टचा अपमानास्पद तह स्वीकारल्यानं फ्रान्समध्ये जर्मनीविरुद्ध असंतोषाची लाट निर्माण झाली. भविष्यकाळात फ्रान्स जर्मनीचा सूड घेईल, अशी बिस्मार्कला खात्री असल्यानं बिस्मार्कनं फ्रान्सभोवती जर्मनीच्या मित्र राष्ट्रांचं कडं निर्माण केलं, संरक्षणात्मक तजवीज केली, राजकारणात फ्रान्सला एकाकी पाडलं. फ्रान्स मित्रराष्ट्रांच्या शोधात होता आणि ती संधी १८९४ मध्ये मिळाली. फ्रान्स आणि रशिया यांच्यात करार झाला. १९०४ मध्ये इंग्लंड-फ्रान्स यांचं शत्रूत्व संपलं आणि त्यांच्यात मैत्रीकरार झाला. पुढं फ्रान्स, रशिया आणि इंग्लंड यांची त्रिराष्ट्रीय एकजूट झाली. दुसरा गट जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली हा अस्तित्वात होता. युरोपची दोन गटांत विभागणी झाली. हे परस्परविरोधी गट असल्यानं दोन्ही गटांनी युद्धाची तयारी सुरू केली. युरोपिअन राजकारणाचा केंद्रबिंदू पॅरिसकडून बर्लिनकडं सरकला.

इंग्लंड हे नाविक शक्तीत सर्वांत सामर्थ्यवान होतं. जगभर पसरलेल्या साम्राज्याच्या संरक्षणार्थ आरमार वाढवल्यानं जगातलं सर्वोत्कृष्ट व सक्षम नौदल इंग्लंडजवळ होतं. १९००पासून इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात नाविक स्पर्धा होती. इंग्लंडच्या नाविक सामर्थ्याशी टक्कर देणारं नाविक सामर्थ्य जर्मनीचं असावं ही कैसर विल्यमची महत्त्वाकांक्षा होती. हे ओळखून इंग्लंडनं १९०३ मध्ये रेझिथ इथं नाविक तळ उभारला. ड्रेड नॉट्‌स या शक्तिशाली युद्धनौका बांधल्या. म्हणून जर्मनीनं इंग्लडला शह देण्यासाठी उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा किल कालवा तयार केला.

रशियाच्या सम्राट झार ॲलेक्‍झांडर याला बिस्मार्कनं प्रथम मैत्री करारानं बांधून ठेवलं; पण द्विराष्ट्र करार झाल्यावर रशिया बिस्मार्क-गटातून बाहेर पडला. बिस्मार्कनं रशियाकडं दुर्लक्ष केले. मुक्त झालेला रशिया इंग्लंड-फ्रान्स गटात सामील झाला. इटली एकीकरणास ऑस्ट्रियाच्या विरोध होता. तो मोडून बिस्मार्कनं इटली एकीकरणास मदत केली आणि एकीकरण पूर्ण होताच इटली आणि ऑस्ट्रिया या परस्परविरोधी राष्ट्रांना एका गटात जोडून ठेवण्याचं कौशल्य त्यानं यशस्वीपणे सांभाळलं. त्याच जोरावर इटलीला साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं.

बिस्मार्कनं चॅन्सलरपदाचा राजीनामा दिल्यानंतर कैसर विल्यम हा अतिमहत्त्वाकांक्षी, हट्टी, गर्विष्ठ सम्राट जर्मनीला लाभला. तो वसाहतवाद आणि साम्राज्यवादाचा पुरस्कर्ता होता. राजीनामा देण्यापूर्वी बिस्मार्क एका मित्राला म्हणाला ः ‘I will not see the first World War, but you will.’’ ही गोष्ट खरी ठरली. विल्यम म्हणाला ः ‘ज्यानं जर्मनीचं जहाज वाऱ्यावादळातून आणि संकटमय खडक टाळून हाकारलं, त्या नावाड्याला मी काढून टाकलं आहे.’’ जर्मनीची सूत्रं हाती आल्यावर कैसरनं आंतरराष्ट्रीय सहकार्य कमी केलं आणि स्वमर्जीप्रमाणं जर्मनीचे हितसंबंध राखण्याचा प्रयत्न केला. या काळात युरोपमध्ये आक्रमक राष्ट्रवादाची निर्मिती झाली. आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम, दुसऱ्या राष्ट्राबद्दल द्वेष, आपला वंश श्रेष्ठ, जगावर आपल्या सर्वश्रेष्ठ वंशाचं राज्य स्थापन झालं पाहिजे ही महत्त्वाकांक्षा वाढीस लागल्यानं सर्वच राष्ट्रांनी साम्राज्यं वाढवण्यावर भर दिला. साम्राज्याच्या रक्षणार्थ शस्त्रास्त्रं, दारुगोळा, विषारी वायू, यांचं उत्पादन वाढलं. आर्मस्ट्राँग, इनेडट, स्कोडा, व्हिस्पर इत्यादी उद्योगपतींनी शास्त्रनिर्मितीचे कारखाने उभारले. फ्रान्सला अल्सेस-लोरेन, इटलीला ट्रिस्ट, त्रिनेंन्टो, व्हेनेशिया, फ्रान्सला मोरक्को हे प्रदेश हवे असल्यानं फ्रान्सनं तिथला अल्पवयीन सुलतान अझीझला मदत करण्यास सुरवात केली.

फ्रान्सचं मोरोक्कोमध्ये वर्चस्व वाढू नये म्हणून जर्मनीनं सुलतानास फ्रान्सविरोधी चिथावलं. बंड करण्यास प्रवृत्त केलं. अल्जेसिराज इथं एक बैठक घेण्यात घेण्यात आली. १९११ मध्ये मोरोक्कोमध्ये पुन्हा बंड झालं. फ्रान्स आणि जर्मनीच्या फौजा मोरोक्कोत दाखल झाल्या. इंग्लंड आणि रशियानं मध्यस्थी केल्यानं युद्ध टळलं. जर्मनीची पॅंथर ही युद्धनौका मोरोक्कोत दाखल झाली होती. बाल्कन प्रदेशातले बोस्निया आणि हॅर्जेगोव्हिना हे प्रदेश ऑस्ट्रियाकडं विश्वस्त होते. १९०८ मध्ये तुर्कस्तानात तरुणतुर्क क्रांती झाली, याचा फायदा घेऊन ऑस्ट्रियानं हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडून टाकले. त्यामुळं विशाल साम्राज्याचं सर्व्हियाचं स्वप्न भंग पावलं. सर्व्हियामध्ये ऑस्ट्रियाविरोधी वातावरण तयार झालं. अनेक गुप्त संघटना उदयास आल्या. वेगवेगळ्या गोष्टींचा बलिदान या अर्थानं वापर करून युद्धाचा प्रचार केला जाऊ लागला.

अशा स्फोटक वातावरणात राजकारणी लोकांनी युद्धाचाच प्रचार आणि समर्थन करणारं साहित्य निर्माण केलं. कोणत्याही घटनेचा विकृत अर्थ काढला जाऊ लागला. हेगेल या तत्त्ववेत्त्यानं ‘राष्ट्र म्हणजे परमेश्वर, राष्ट्राकरिता आत्मसमर्पण देण्यास तयार असावं,’ असा प्रचार केला. नित्शे यानं वाङ्‌मयातून युद्धासाठी लोकांना प्रवृत्त केलं. बिस्मार्कवर मॅकियाव्हॅलीचा प्रभाव असल्यानं राजकीय उद्देशप्राप्तीसाठी साधनशुचितेचा विचार करू नये, या मॅकियाव्हॅलीच्या तत्त्वाचं त्यानं तंतोतंत पालन केलं. फिल्डमार्शल मोल्टके यानं लष्करी संघर्ष हा मानवी वंशासाठी जालीम औषध आहे, असं मत व्यक्त केलं होतं. फ्रेंच तत्त्वज्ञ अर्नेस्ट रेनान यानं ‘युद्धाच्या नांगीनं देश निद्रिस्त होत नाही, युद्ध ही एक आवश्‍यक गोष्ट आहे, युद्धाशिवाय प्रगती नाही, युद्ध हा गुन्हा नसून अपयश येणं हा गुन्हा आहे,’ असं सांगितलं. लुडेन डार्फ यानं सुसंघटित, शिस्तबद्ध, प्रबळ लष्कर आणि नौदल जर्मनीला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवण्यासाठी योग्य असल्याचं मत मांडलं. 

अशा तप्त वातावरणात युद्धाची ठिणगी पडली ती एका घटनेनं. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफिया यांची बोस्नियाची राजधानी साराजेव्हो इथं हत्या करण्यात आली. या कारस्थानात सर्व्हियाचा हात असल्याचा संशय ऑस्ट्रियाला आल्यानं ऑस्ट्रियानं सर्व्हियाला २३ जुलै १९१४ रोजी निर्वाणीचा खलिता पाठवला आणि २८ जुलै रोजी युद्ध सुरू झालं. पाठोपाठ रशिया, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी ही राष्ट्रं युद्धात ओढली गेली आणि युद्धाचं जागतिक महायुद्धात पर्यवसान झालं. १९१४ ते १९१८ या काळात सुरू असलेल्या या युद्धात जग होरपळून निघालं. 

शंभर वर्षापूर्वी घडलेल्या या घटनांचा आढावा घेतल्यानंतर असं वाटतं, की बुद्धिवादी माणसानं इतिहासापासून काही बोध घेतला आहे की नाही? दोन महायुद्धांतला मनुष्यसंहार, त्यांचे दुष्परिणाम याचा अनुभव असूनही आणि शीतयुद्धाच्या काळातलं तणावाचं वातावरण निवळलं आहे, असं वाटत असताना जग पुन्हा एकदा युद्धाकडं वाटचाल करत आहे, असं वाटतं. चीन, अमेरिका, रशिया आणि इतर काही देश आक्रमकतेकडं वाटचाल करत आहेत. अण्वस्त्र स्पर्धा, कुरघोडी, अराजकता, दहशतवादाच्या कारवाया, नैसर्गिक पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, विकसित आणि विकसनशील देशांतली वाढती आर्थिक दरी यांमुळं त्याचे परिणाम मानवाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं नेत आहेत, असं वाटतं. यातून होणारा विध्वंस सर्वनाशाकडं नेणारा असेल. अशा परिस्थितीत भारतासारख्या शांतताप्रेमी, अलिप्ततावादी राष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरेल, असं वाटतं. विश्वशांतीचा संदेश, मानवतावाद, मूल्यं, संस्कृती, सभ्यता याची जाणीव सर्वच देशांना होणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com