2 एप्रिल : 'जागतिक आत्मकेंद्रीपणा (स्वमग्नता/ऑटिझम) जागृती दिन'

डॉ. प्रशांत मंजिरे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

'ऑटिझम' म्हणजे नेमके नक्की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आजही अगदी सहजपणे निर्माण होतो. अर्थात, 'जावे त्याच्या वंशी तेंव्हा कळे...' तोवर, याबाबतची एकूणच इतरांच्या ठायी याबाबत असलेली 'अनभिज्ञता' हे देखील, या मागचे एक मुख्य कारण असू शकते. 

'ऑटिझम' म्हणजे नेमके नक्की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आजही अगदी सहजपणे निर्माण होतो. अर्थात, 'जावे त्याच्या वंशी तेंव्हा कळे...' तोवर, याबाबतची एकूणच इतरांच्या ठायी याबाबत असलेली 'अनभिज्ञता' हे देखील, या मागचे एक मुख्य कारण असू शकते. असो...

तर, 'स्वमग्नता' (ऑटिझम) हा एक प्रकारचा 'मनोविकार' असून, याला 'सायकोन्यूरॉलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर'  किंवा इंग्रजी मध्ये याला 'ऑटिझम' असे देखील म्हटले जाते. 

ही एक प्रकारची 'गुंतागुंतीची असणारी मानसिक जन्मस्थ अवस्था' असून, तो 'रोग' नाही. याचा शोध 'लिओ केनेर' यांनी सन १९४३ मध्ये लावला. 'स्वमग्नावस्थेतील व्यक्ती आपल्याच विश्वात व विचारात रममाण असतात.   संवेदनांचे अर्थ लावू शकत नाही, म्हणून त्यावर ते प्रतिक्रिया देत नाहीत. स्वमग्नता हा एक विकार जरी म्हटला तरीदेखील, हे 'लक्षण' म्हणजेच, 'पूर्ण विकार' असे देखील म्हणता येत नाही. आणि म्हणूनच, ही एक 'मानसिक गुंतागुंतीची अवस्था' आहे, असे म्हटले जाते. 'मनोविकारतज्ञ',  'बालरोगतज्ञ' यांचा सल्ला यासाठी महत्वाचा ठरतो.

अशा 'स्वमगनावस्थेतील' मुलांच्या भाषेवर तसेच, इतर मूलभूत विकासावर देखील याचा परिणाम होतो. मुख्यतः त्यांची भाषेची वृद्धी खुंटते. बाह्य जगताशी देखील यांचा जणूकाही संबंध नसतो. त्यातही, सर्वसाधारणपणे, बालकांच्या  समस्येकडे पालकांकडून व इतरजणांकडूनही काही कारणास्तव, कदाचित अपुरे लक्ष, तसेच बालकांच्या बाबतीतले, त्यांच्या वागण्या - बोलण्याच्या सवयीं बद्दलचे पारंपारिक प्रचलित असणारे गोड गैरसमज, यामुळे देखील अशा मुलांचा नेमका शोध घेणे व त्यांची सुयोग्य वेळी, त्वरित सुयोग्य तपासणी  व उपचार सुरू करणे, ही देखील एक खूप गंभीर समस्या आढळून येत आहे.

ऑटिझमग्रस्त मुलांचा सर्वसाधारण विकास इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे होत नाही. जन्मतःच याची लक्षणे अशा मुलांमध्ये दिसून येतात. गुणसूत्रांचे एकत्रीकरणाचे वेळीचं, म्हणजेच, ते मूल जन्माला येण्याअगोदर त्यांच्या मेंदूवर एक प्रकारचा असह्य आघात झालेला असतो, त्यामुळे असे घडते, असे तज्ञांचे मत आहे. आणि यामुळेच, अश्या मुलांच्या मज्जासंस्था, श्वसनसंस्था,, पचनसंस्था, स्नायूसंस्था अशा एकूणच त्यांच्या शरीरातील सर्वच संस्थांवर मोठा दुष्परिणाम होऊन त्या अशक्त व कमजोर पडतात. परिणामी, त्यांच्या सर्वांगीण वाढीस जणू ग्रहण लागलेले असते, असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.

'स्वमग्नतेच्या' दोषामुळे ही मुले एकूणच 'आत्मकेंद्रित' होतात. याकारणाने इतरांमध्ये सहसा अशी मुले पटकन मिसळून जात नाहीत. थोडाफार भित्रेपणाही त्यांच्या अंगी दिसून येतो. म्हणून, अश्या मुलांना समजून घेऊन, त्यांच्यातील नेमक्या कला-गुणांची आवड ओळखून त्यांचा सुयोग्य पद्धतीने टप्प्या-टप्प्याने विकास करणे जिकिरीच असलेे तरीदेखील तितकेच महत्वाचे ठरते.

सर्वसाधारण पणे त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर याची लक्षणे दिसून येतात. उदा. अचानकपणे त्यांचे बोलणे बंद होणे, तंद्री लागल्यासारखे गप्प बसून राहणे इत्यादी. बहिरेपणाचा दोष शक्यतो आढळून येत नाही. त्यांची 'स्वमग्नता' त्यांना त्यांच्या दैनंदिन मूलभूत गरजांबाबतही जणू बधीर करते. त्यातून बाह्यजगाशी त्यांचा संबंध येत नसल्यामुळे, त्यांचे सर्वकाही जणू त्यांच्या स्वमर्जीने होत असते. त्यांच्यावर कुठल्याही गोष्टींचा परिणाम सहसा होत नाही. प्रसंगी त्यांच्यात क्रोध व हिंसकपणाही वाढतो.

'व्यक्ती तितक्या प्रकृती व व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' हे सूत्र यांना तंतोतंत लागू पडते, असे या  प्रत्येक मुलातील वैविध्यपूर्ण असलेल्या, त्यांच्या या 'स्वमग्न दोषांकडे' पाहताना वाटते. आणि म्हणूनच, यांचेकडे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक लक्ष देणे महत्वाचे ठरते. एखादे काम वा एखादी क्रिया वारंवार करणे त्यांना अवघड जाते. मात्र, 'संगीत', 'नृय' यामध्ये त्यांना बहुतांशी खूप आवड असते. आणि म्हणूनच, याद्वारे त्यांच्यात त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध प्रयोगात्मक अशी पाऊले उचलावी लागतात. 'सामुहिक उपचार पद्धतीचा' यामध्ये विशेष भर असतो. अर्थात, समस्या खूपच गंभीर असेल तर अशावेळी तज्ञांकडून सुयोग्य सल्ला व उपचार घेणे केव्हाही जास्त हिताचे ठरते. भारताप्रमाणेच, जागतिक पातळीवरही अनेक विविध तज्ञ, व  सामाजिक संस्था याकरिता सतत झटत आहेत.

पालक, शिक्षक, सामाजिक व शासकीय संस्थांच्या मदतीने, सुयोग्य व काळजीपूर्वक तज्ञांच्या सल्ल्याने व उपचारामुळे, या मुलांमध्ये निश्चितच सकारात्मक व परिणामकारक बदल घडून येऊ शकतो.
यासाठी, आपल्याला फक्त आपली, जिद्द, चिकाटी व संयम या त्रिसूत्रीची खरी गरज असते.

(लेखक मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक आहेत)
e-mail : prashantmanjire 8189@gmail.com

Web Title: 2 April world Autism awareness Day