‘माझी आई’मुळं आईशी वाढेल अधिक सख्य!

‘माझी आई’मुळं आईशी वाढेल अधिक सख्य!

‘आ   ई’ हा  म्हटलं तर केवळ दोन अक्षरांचा शब्द आहे आणि म्हटलं तर अतिशय ताकदवान असा, प्रेरणेची ज्योत मनात सतत तेवत ठेवणाराही हा शब्द आहे. आईची व्याख्या करायची झाली, तर ती खूपच सोपी आहे. ती अशी करता येईल :‘ जी जन्म देते ती आई’ पण आईला जाणणं इतकं सोपं नाही, असंही लक्षात येतं. मग आईला नेमकं कोणत्या व्याख्येत बसवायचं? आईला नेमकं कसं जाणून घ्यायचं ? या प्रश्‍नांची उत्तरं ‘माझी आई’ हे पुस्तक देतं.

या पुस्तकात द. मा. मिरासदार, शि. द. फडणीस, सय्यदभाई, डॉ. जयंत नारळीकर, उत्तम कांबळे, वीणा पाटील, डॉ. रमेश पानसे, विष्णू मनोहर, सचिन तेंडुलकर, मिलिंद जोशी, यशवंत मनोहर, डॉ. प्रकाश आमटे, सुचेता भिडे-चापेकर, इंद्रजित भालेराव, सोनाली कुलकर्णी, ममता सपकाळ, डॉ. हमीद दाभोलकर, महेश काळे, कल्पना दुधाळ, यशोदा वाकणकर, सखी गोखले आणि आर्या आंबेकर यांचं आपल्या आईबद्दलचं मनोगत आहे.

आईला शब्दात बांधणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. खरंतर कुणीही माणूस कर्तृत्ववान होतो, त्याच्या अगदी मुळाशी..खोलवर आईच असते. कर्तृत्वानं मोठा झालेला माणूसच जगाला थेट दिसतो; पण तो जगाला दिसण्यासाठी पडद्यामागं अखंडपणे आई नावाचं एक अजब रसायन कधीही न थकता, कोणतीही कुरबूर न करता अखंडपणे राबलेलं असतं, राबत असतं.. हे मात्र जगाला दिसत नसतं. नेहमीच पडद्यामागं राहणारं ‘आई’ हे नेमकं काय रसायन आहे, याचा शोध घ्यायला हे पुस्तक मदत करतं. मुळात ‘आईपणा’ इतका अथांग आहे, की त्याला शब्दांतून कवेत घेणं हे फार अवघड असतं. प्रत्येकाला आईबद्दल माया असते, प्रेम असतं; पण तिच्याबद्दलच्या भावनेला प्रत्येकजण शब्दरूप देऊ शकतोच असं नाही. हे शब्दरूप या पुस्तकाच्या निमित्तानं लाभलं आहे. या पुस्तकातून मिरासदारांची आई - ‘मनूताई’ भेटते. सगळ्यांवर सारखी माया करण्याचा आईचा गुणही त्यातून दिसते..‘मातृभूमी ही आपली आई आहे; त्यामुळं पाय आपटत चालायचं नाही...’ ही शिकवण सय्यदभाईंची आई देते. एकाच वेळी लाड आणि शिस्त या दोन्हीचं मिश्रण असणारी ‘ताई’ म्हणजेच  नारळीकरांची आई ‘-माझी कल्पक आई’ या लेखातून भेटते.

वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत आईचा सहवास लाभलेले डॉ. रमेश पानसे हे तसे भाग्यवानच म्हणावे लागतील.‘जवळच्या माणसाचाही मृत्यू सहजतेनं, एक निसर्ग सत्य म्हणून स्वीकारायचा’ ही त्यांच्या आईनं दिलेली शिकवण. पतीच्या महान कार्यात सक्रिय सहभागी असलेली आणि आपल्या वैयक्तिक आवडी-निवडींची आहुती सामाजिक कार्याच्या यज्ञात सहजपणे टाकणारी डॉ. प्रकाश आमटे यांची माई आईपणाचा वेगळा आदर्श उभा करते. जन्मापासून नकोशा असलेल्या मुलावर नंतर प्रेमाची पखरण करणारी आई यशवंत मनोहरांनी नेमकी उलगडली आहे. काळाच्या पलीकडं जाऊन आधुनिक विचार स्वीकारणारी आणि त्याबरोबरच जुन्या विचारांतलं योग्य ते स्वीकारणारी आई सुचेता भिडे चापेकर यांच्या लेखातून भेटते. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या आईचा उत्तम कांबळे यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून धर्म, पंथ, प्रदेश आणि जाती संपवत लेकरासाठी ठामपणे उभी राहणाऱ्या ‘आई’ या स्वभावाचं वर्णन केलं आहे. एका घरात असणाऱ्या तीन पिढ्यांच्या परंपरांचं अंतर अगदी सहज दूर करणारी आई मिलिंद जोशी यांनी चित्रित केली आहे. वडिलांप्रमाणे प्रत्येक गोष्टीत खंबीर राहणारी आणि कायम‘ सपोर्ट कनेक्‍ट’ जपणारी आई वीणा पाटील यांच्या शब्दांतून व्यक्त झाली आहे. दिलदारपणे कौतुक करणारी सोनाली कुलकर्णी यांची आई...लहानपणी फारसा सहवास न मिळाल्यानं आता आपल्या आईचा म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांचा असोशीनं सहवास मिळवणाऱ्या ममता सपकाळ... ‘अन्न तुझ्यावर रागावलं तर काय होईल? त्यामुळं जेवणाशी मैत्री कर, तुझं डोकं दुखायचं थांबेल’ असं सांगणारी महेश काळे यांची आई...माणसाच्या चांगुलपणावर विश्वास असणारी डॉ. हमीद दाभोलकर यांची आई...आणि अखंड ऊर्जेचा झरा असणारे डॉ. अनिता अवचट म्हणजे डॉ. यशोदा वाकणकर यांची आई! नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सखी गोखले आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या आईविषयी, तिच्या खंबीर आधाराविषयी आणि मुलीच्या निर्णयात ढवळाढवळ न करणाऱ्या तिच्या स्वभावाविषयी केलेलं वर्णन मुळातूनच वाचण्यासारखं आहे.
या सगळ्या मान्यवरांच्या आईबद्दलच्या मनोगतातून आईपणाचे छोटे छोटे पदर गुंडाळले गेले आहेत. या सगळ्या पुस्तकातून ‘आई’ या रसायनाचं एक अखंड रूप आपल्यासमोर उभं राहतं. हे रूप उभं राहत असतानाच आपल्या ‘आई’ला भरभरून काय काय देता येईल, याची जाणीवही होत राहते. शि. द. फडणीस हे आपल्या आईचं म्हणजेच‘काकू’चं वर्णन करता ‘तिचं चित्रं काढायचा योग आला नाही’, अशी खंत जेव्हा व्यक्त करतात, तेव्हा आईबद्दल मनाशी योजलेल्या आणि करायच्या राहून गेलेल्या गोष्टींची यादी मनात तयार व्हायला लागते. ‘मान्यवरांनी आपल्या आईबद्दल व्यक्त केलेल्या  भावना,’ असं या पुस्तकाचं जरी स्वरूप असलं, तरीही वाचता वाचता आपण आपल्या आईचाही शोध घेऊ लागतो. आपल्यासाठी कायम धडपडणाऱ्या राबत राहणाऱ्या आईचा शोध हे पुस्तक नकळतपणे आतल्या आत सुरू करतं आणि आपल्या आईशी असलेलं प्रत्यक्षातलं आणि मनातलं
सख्य वाढवतं...

पुस्तकाचं नाव : माझी आई
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
दूरध्वनी : २४४०५६७८/
मोबाईल क्रमांक : ८८८८८४९०५०
पृष्ठं  : १६०
मूल्य : १५० रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com