पंतप्रधान आवास योजना : घरांसाठी 8.5 लाख अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

पात्रता तपासणी लवकरच

या योजनेतून घर मिळवण्यासाठी राज्यभरात 8 लाख 60 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांची पात्रता तपासणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या योजनेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील कामाचा आढावा...
 

केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेतील 1 लाख 11 हजार 627 घरे बांधण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेतून घर मिळवण्यासाठी राज्यभरात 8 लाख 60 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांची पात्रता तपासणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या योजनेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील कामाचा आढावा खालीलप्रमाणे. 

मुंबई : जमिनीची अडचण
पंतप्रधान आवास योजनेतून मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) 32 हजार 744 घरे बांधण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात जमिनीचा शोध घेऊन त्यावरील आरक्षणे हटवून त्या ठिकाणी योजना राबवण्यास सुरवात केली आहे. योजना राबवण्यासाठी जमीन नसल्याने ती मिळवणे म्हाडाला अडचणीचे ठरते आहे. इतर विभागांकडून सहकार्य मिळत नसल्याने ही योजना राबवण्यात अडचणी येत आहेत; तसेच शहरी भागात जमीन नसल्याने ग्रामीण भागात घरे उभारावी लागत आहेत. सरकारच्या अन्य विभागांनी सहकार्य केल्यास ही योजना राबवणे सोपे जाईल, असे म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या योजनेनुसार केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्य सरकारकडून एक लाख असे अडीच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थींमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा समावेश आहे. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आर्थिक दुर्बल घटकांसाठी तीन लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी 3-6 लाखांपर्यंत आहे.

पुणे : कृती आराखड्यावर काम
"प्रधानमंत्री आवास योजने'चे काम पुण्यात विविध पातळ्यांवर सुरू आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती घरांची आवश्‍यकता आहे, घर बांधण्यासाठी पैशांची कमतरता आणि अन्य तांत्रिक अडचणी किती जणांना आहेत, याविषयीचा सविस्तर "सर्वांसाठी घरे कृती आराखडा' तयार करण्याचे काम शहर तांत्रिक समिती करत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याचे काम सुरू आहे. त्याला 87 हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. अर्ज करण्यासाठी 7 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर दुसरीकडे "भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती' या चौथ्या प्रकारामधील घरांची बांधणी महापालिका करणार आहे. त्यानुसार हडपसर, बाणेर, खराडी येथील जागांवर छोटी घरे बांधण्याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत शहर तांत्रिक समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत.

नागपूर : पहिला टप्पा 1268 घरांचा
या योजनेला नागपुरातही वेग आला आहे. शहरात नागपूर सुधार प्रन्यास या योजनेला आकार देत आहेत. पहिल्या टप्प्यात 12 हजार 68 घरे बांधण्यात येणार असून त्यानंतर 15 हजार 196 घरांचे बांधकाम प्रस्तावित आहे. याशिवाय महापालिकेनेही स्वतंत्ररीत्या ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चार घटकांचा समावेश आहे. यात नोटिफाईड झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कर्जसंलग्न व्याज अनुदानातून घरबांधणी, खासगी भागीदारीद्वारे घरबांधणी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान आदींचा समावेश आहे. नागपूर शहरात 420 झोपडपट्ट्या आहेत. त्यातील 289 झोपडपट्ट्या अधिसूचित (नोटिफाईड) आहेत. यातील 111 झोपडपट्ट्या डिनोटिफाईड करण्यात येत आहेत. उर्वरित 187 झोपडपट्ट्यातील रहिवाशांना पुनर्विकास योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थींना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी एक लाख असे दोन लाखांचे अनुदान मिळणार आहे. नोटिफाईड झोपडपट्ट्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून लाभार्थींचे अर्ज निकाली काढण्यात येत आहेत.

सोलापूर : 52 हजार अर्ज
आवास योजनेंतर्गत सोलापूर शहरातील 52 हजार लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. एक लाख 20 हजार घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. यल्लेश्‍वर वाडी येथील 243 जणांना घरे बांधून देण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेच्या साडेसातशे कर्मचाऱ्यांसाठीही विशेष योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक लक्ष्मण बांके यांनी दिली. या योजनेबाबत नागरिकांमध्ये आजही साशंकता आहे. योजनेतून आपल्याला घर मिळेल की नाही, याबाबत लाभार्थी साशंक आहेत. त्यामुळे वारंवार निविदा काढूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सोलापुरात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीनदा मुदतवाढ देण्यात आली. या योजनेत महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करणे महापालिकेला भाग पडले आहे.

नगर : 17 हजार अर्ज
नगर जिल्ह्यात योजना राबविण्यास सुरवात झाली आहे. नगर शहरातील 17 हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. त्यांची छाननी उद्यापासून (ता. 8) होत आहे. श्रीरामपूरसह जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नागरिकांना "म्हाडा'चे अधिकारी, बॅंक प्रतिनिधी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. नगर महापालिकेने यापूर्वी शहरात 840 घरकुले बांधण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. त्याची फेररचना करण्याचे काम पालिकेत सुरू आहे. पालिकेने त्यासाठी संजयनगर झोपडपट्टीची निवड केली आहे. तेथे पावणेदोन एकर जागा असून, साधारण सव्वादोनशे घरे पहिल्या टप्प्यात तेथे बांधली जाणार आहेत. दुसऱ्या प्रकारात भागीदारी तत्त्वावर परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेकडे साधारणपणे दोन हजार चारशे अर्ज आले आहेत. तिसऱ्या प्रकारामध्ये स्वत:ची जागा असलेल्यांना (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) घरे बांधून दिली जाणार आहेत. यासाठी महापालिकेकडे नऊ हजार अर्ज आले आहेत. चौथ्या प्रकारात स्वत:ची जागा असलेले नागरिक थेट बॅंकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात.

Web Title: 8.5 lac applications for pradhan mantri awas yojana