शरीराला आदर द्या (आदिनाथ कोठारे)

aadinath kothare
aadinath kothare

आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य पाळलं, तर सर्वच आजारांचा सामना आपण यशस्वीरीत्या करू शकू. आपण आपल्या शरीराला आदर दिला, तर आपलं शरीरही आपल्याला आदर देईल. आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहिलं, तरच मानसिक स्वाथ्यही चांगलं राहतं. त्यासाठी मी खाण्यापिण्याच्या वेळा नियमितपणे पाळतो. दररोज सकाळी व्यायाम केल्यानंतर भरपेट नाश्‍ता करतो. मी दररोज न चुकता एक तास तरी व्यायाम करतो. मनःशांती राखण्यासाठी मी मेडिटेशनही करतो.

प्रत्येकानं आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहिलं, तरच मानसिक स्वाथ्यही चांगलं राहतं. त्यासाठी मी खाण्यापिण्याच्या वेळा नियमितपणे पाळतो. दररोज सकाळी व्यायाम केल्यानंतर भरपेट नाश्‍ता करतो. त्यामध्ये ओट्‌स, अंडी, ज्यूस, पोहे, उपमा आदी पदार्थांचा समावेश असतो. दुपारचं जेवणही बऱ्यापैकी करतो. मात्र, रात्रीचं जेवण हलकंसच असतं आणि ते मी संध्याकाळी साडेसातच्या आतच घेतो. खरं तर आपण दररोजच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या, तर आयुष्याची अर्धी लढाई जिंकल्यात जमा असते. रात्री सात ते आठ तास झोप घेणं शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. झोपेत असताना आपल्या शरीरात सात-आठ तास कोणतेही पदार्थ जात नाहीत. मात्र, व्यवस्थित झोप घेऊन उठतो, तेव्हा आपलं मन प्रसन्न राहतं. झोपून उठल्यावर अर्थातच भूकही खूप लागलेली असते. त्यामुळं सकाळीच व्यायाम करून ब्रेकफास्ट करणं गरजेचं असतं. त्याचं कारणही "ब्रेकफास्ट' या शब्दात आहे. आपल्या शरीराला सात-आठ तास मिळणारा "ब्रेक' आणि त्यानंतर "फास्ट' म्हणजेच लवकर भरपेट नाश्‍ता करणं होय.

आपल्याकडं अनेक जण आपला दिनक्रम उलटाच करतात. सकाळी नाश्‍ताच करत नाहीत. दुपारचं जेवण काहीतरी करतात अन्‌ रात्रीच्या वेळी भरपूर खातात अन्‌ लगेचच झोपतात. हे सर्व चुकीचं गणित आहे. त्यामुळे शरीराचंच गणित बिघडतं. जेवणानंतर कमीत कमी दोन तासांनी झोप घेणं गरजेचं असतं. कारण, आपल्या शरीरातली पचनक्रिया त्या वेळी सुरू असते. त्याचप्रमाणं सकाळी उठल्यानंतर आपली पचनशक्ती वाढलेली असते. जसजसा दिवस पुढं सरकत जातो, तसतशी पचनशक्ती कमी होत जाते. त्यामुळं आहाराचं महत्त्व ओळखणं अन्‌ वेळ पाळणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी विज्ञानासह पुराणातही लिहिलेल्या आहेत. योगशास्त्रामध्येही आहाराची पथ्यं सांगितली आहेत. या सर्व गोष्टी पाळून आपण आपलं शरीर चांगलं ठेवावं. आपण शरीराची काळजी घेतल्यास शरीरही आपल्या मनाची काळजी घेतं. खरंतर एका हातानं टाळी वाजत नाही, त्याचप्रमाणं शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी पूरकच आहेत.

रोज किमान एक तास व्यायाम
सध्याचं युग धावपळीचं आहे. जिकडंतिकडं स्पर्धाच सुरू आहेत. त्यासाठी महत्त्वाचं आहे शारीरिक स्वास्थ. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचं आपण विसरून चालणार नाही. आपण शरीर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणं मनःशांतीही गरजेची आहे. मजा-मस्ती करा; पण वेळही पाळणं गरजेचं आहे. मी दररोज न चुकता एक तास तरी व्यायाम करतो. आताच आपण संयम बाळगला, तर आयुष्यभर आपण एन्जॉय करू शकतो. आता कमावलेलं शरीर वय वाढल्यानंतर आपल्या कामी येतं. आपल्या अवतीभवती अनेक आजार वाढत आहेत. त्यातून दुर्घटनाही घडत आहेत. आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य पाळलं, तर सर्वच आजारांचा सामना आपण यशस्वीरीत्या करू शकू. आपण आपल्या शरीराला आदर दिला, तर आपलं शरीरही आपल्याला आदर देईल.

चित्रीकरणाच्या गणितामुळं मला व्यायाम करण्यात अडचणी येतात. त्यामुळं मी त्यावर तोडगा शोधला आहे. जिमचं साहित्य मी माझ्या गाडीतच ठेवतो. घाई असली, तरी कमीत कमी 15 मिनिटं व्यायाम करतो. कारण शरीराला चालना देण्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते. विशेष म्हणजे व्यायाम केल्यानंतर मी छानसं खातोही- कारण आपल्या शरीरामध्ये प्रोटिन्ससह कार्बोहायड्रेट्‌सचीही गरज असते. अन्‌ ती गरज वेळच्या वेळी पूर्ण करणं आपलंच काम असतं. मला जेवणामध्ये मांसाहार खूप आवडतो. माझी आई मासे फार छान पद्धतीनं बनवते. त्याचबरोबर मला चिकन अन्‌ मटणही खूप आवडतं. मी विविध देशांमध्ये फिरायला वा कामानिमित्त जातो, त्या वेळी तिथल्या मांसाहारी पदार्थांचा निश्‍चितच आस्वाद घेतो- कारण मला प्रत्येक ठिकाणची चव चाखायला खूप आवडते.

अभिनेता अन्‌ दिग्दर्शक असल्यानं मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो; पण मी प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतो. ज्या वेळी चित्रपटांमध्ये वेगळी भूमिका साकारायची असते, त्या वेळी त्यानुसारच मला माझं व्यक्तिमत्त्व बनवावं लागतं अन्‌ शरीरही. याचं सर्व श्रेय मी माझे फिटनेस गुरू शैलेश परुळेकर यांनाच देतो. मी त्यांच्याकडंच व्यायामाला जातो अन्‌ त्यांनीच मला तयार केलं आहे. ते माणूस म्हणूनही उत्तम असून त्यांचं माझ्या प्रत्येक कामात लक्ष असतं. कोणत्या भूमिकेसाठी कशा प्रकारची शरीरयष्टी हवी, याचा सल्ला ते मला देतात अन्‌ त्यानुसारच माझ्याकडून वर्कआऊट करून घेतात. वेळ पाळण्याची गोडी मला त्यांनीच लावली. त्यांनी अनेक कलाकारांना ट्रेन केलं आहे.

"झपाटलेला 2'साठी वजन कमी
अभिनय करताना मला वजन कमी-जास्त करण्याची वेळ अनेकदा आली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं "झपाटलेला 2' या चित्रपटात अभिनय करताना मला पाच वर्षं लहान दिसण्यासाठी वजन कमी करावं लागलं होतं. या सर्व गोष्टी कमी कालावधीत कराव्या लागतात. कारण, मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी दिवस खूपच कमी असतात अन्‌ त्यानुसारच शरीराचं गणितही जुळवावं लागतं. वजन कमी-जास्त केलं, तरी ते पुन्हा मेंन्टेन करावं लागतं. त्यासाठीही खूप कसरत होते; पण हे केलं नाही, तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. प्रियांका चोप्रा हिची निर्माती असलेल्या अन्‌ मी दिग्दर्शित केलेल्या "पाणी' या चित्रपटातही माझा लूक खूपच वेगळा आहे. त्याबद्दल आता बोलणं योग्य ठरणार नाही; पण तुम्ही हा चित्रपट पाहाल, तेव्हा तुम्हाला धमाल वाटल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटासाठी मला उत्कृष्ट दिग्दर्शक अन्‌ उत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं आहे; तसंच सहा नामांकनही मिळाली आहेत.

मला व्यायामाची गोडी असल्यामुळंच माझ्यात शिस्त निर्माण झाली आहे आणि ती माझ्या अंगवळणी पडली आहे. खरं तर व्यायाम हा माझ्या रुटिनचा भाग झाला आहे. त्यामुळं माझं शरीरही त्याचप्रमाणं रिस्पॉन्स देते. मनःशांती राखण्यासाठी मी मेडिटेशनही करतो. त्याचे धडेही शैलेशजी देतात. त्याचा फायदा मला आयुष्यभर होणार असून, "वेलनेस'साठी ते गरजेचंच आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com