
‘कसं काय पॉसिबल आहे हे?’ ‘काय आता... आहे ते आहे!’ रूपालीच्या प्रश्नावर नचिकेत उत्तरला.
दुनियादारी : खूप खूप खूप छान!
‘कसं काय पॉसिबल आहे हे?’
‘काय आता... आहे ते आहे!’
रूपालीच्या प्रश्नावर नचिकेत उत्तरला.
‘म्हणजे तुला तुझ्या दुःखावर काहीच रडू येत नाही?’
‘नाही.’
‘पण इतरांच्या दुःखावर उठसूट रडू येतं?’
‘हां... म्हणजे असंच आहे काहीसं...’
‘का पण असं?’
‘अम्म... ह्याला आपण सॅटिसफॅक्शन सिंड्रोम असं म्हणू शकतो. म्हणजे मला माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल इतकं समाधान आहे, की मला नेहमी दुसऱ्याची दुःखच जास्त मोठी वाटतात... महत्त्वाची वाटतात.’
‘असं कुठं कोणी असतं का? कसला अजब आहेस तू! तुझा ब्रेकअप झाल्यावर तू काय करतोस?’
‘मला कुचकट विनोद सुचतात त्या परिस्थितीवर!’
‘सिरियसली?? म्हणजे उशीत डोकं लपवून रडणं? उगाच काहीतरी आठवून डोळ्यांत पाणी येणं? काहीच नाही होत तुला?’
‘नाही गं बाई! असलं काहीही नाही होत.’
‘मग व्हेन्ट आउट कसं करतोस? रडल्याशिवाय हलकं नाही ना होत माणूस?’
‘मी ना... एखादा सिनेमा किंवा इमोशनल काहीतरी बघतो किंवा वाचतो. त्यातलं इतरांचं दुःख पाहून येतं रडायला. मग होऊन जातं व्हेन्ट आउट.’
रूपाली त्याच्याकडं बघतच राहते. ‘तुला कळतंय का? यू आर मेन्टली द सिक आहेस माय ब्वाय!!’ ती प्रचंड प्रश्नांनी साठलेल्या मनानी म्हणते, ‘तू अख्ख्या जगात असा वन पीस असशील!’
‘पायाचं नीट वॅक्सिंग केलं तर तोच वनपीस मी घालूसुद्धा शकीन,’ नचिकेत असं म्हणून जोरात स्वतःचाच विनोदावर हसला.
‘झालं? विषयावर याल का पुन्हा पांचटपणा झाला असेल तर?’
‘ह्यात काहीच विषय नाहीये. रडणं किंवा दुःखी होणं, इस्पेशली स्वतःसाठी हे काय माझ्या हातात नाही.’
‘असं कसं! मला तर साधा खूप खूप राग आला कोणाचा तरी रडू येतं. तू काय करतोस तुला खूप खूप खूप राग आला तर?’ तिनं फार निरागसपणे विचारलं.
नचिकेत हसायला लागला.
‘हसतोस काय रे नालायका?’
‘अगं... तुझ्या ‘खूप खूप खूप राग आला’ ह्या वाक्यावर हसतोय! परत करून दाखव एकदा...!’
‘जा रे!’
नचिकेत तसाच हसत हसत तिचा हात धरतो, आणि तिला त्या कॅफेतल्या खुर्चीतून उठवतो.
‘चल तुला एक गंमत दाखवतो,’ असं म्हणत तो तिला कॅफेच्या बाहेरच्या आवारात घेऊन येतो. संध्याकाळचं ७.३०चं ट्रॅफिक नजरेआड करत हे कॅफे एका लहानशा बोळात चमचमणाऱ्या डेकोरेटिव्ह दिव्यांमध्ये निवांत बसलं होतं. तिथल्या एका मोठ्या फळ्यावर भरपूर स्टिकी नोट्स त्या कॅफेमध्ये येणाऱ्यांनी लावल्या होत्या. काहींनी शुभेच्छा, काहींनी तिथल्या खाण्याची स्तुती असं काय काय त्यावर लिहिलं होतं. त्या मोठ्या बोर्डसमोर रूपालीला उभं करत नचिकेत म्हणतो, ‘‘बघ... ह्यावर काही सापडतंय का?’
रूपाली लक्षपूर्वक बघायला लागते आणि लगेचच तिला तिथं नचिकेतच्या हस्ताक्षरातल्या चिट्ठ्या सापडतात.
‘अरे! हे तर तू लिहिलं आहेस. आणि हे पण... आणि हे पण! कित्ती आहेत!’
‘तारखा पण बघ त्यावरच्या.’
‘२१ डिसेंबर २०१४! ३० मार्च २०१५! १४ सप्टेंबर २०१७! अरे काये हे? इतक्या जुन्या चिट्ठ्या?’
नचिकेत छान हसतो.
‘जेव्हा मला खूप खूप खूप खूप राग येतो ना, तेव्हा मी असंच कुठंतरी बसून काहीतरी गिरवून काहीतरी कवितेसारखं लिहितो आणि तिथंच सोडून देतो. इथंही असंच बसून मी बरंच लिहिलंय आणि इथल्या माणसानं ते आवर्जून जपून ठेवलंय,’ तो म्हणतो.
रूपाली छान स्मितहास्य देऊन कौतुकानं त्याच्याकडं बघते आणि मग त्या मोठ्या बोर्डकडं.
‘ह्यातलं कुठलं सगळ्यात जास्तं रागात लिहिलं होतंस? काही आठवतंय?’ ती विचारते.
तो एका चिट्ठीवर बोट ठेवतो आणि म्हणतो,
‘हे वालं -
चेहरा चाँद का पढ़ लेना,
मगर जरा ख़याल से...
कुछ ख़याल लिख दिए हैं मैंने
बड़े ही बेख़याल से!"
‘खूप खूप खूप छान!’ रूपाली म्हणते.
mahajanadi333@gmail.com
Web Title: Aaditya Mahajan Writes Pjp78
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..