आम्हा वनवास जन्माचा बाई गं...

file photo
file photo

लाखो शेतकरी महिला वनवासी जीवन जगतात, यामध्ये एकल महिलांचे जगणे कुपाच्या आधाराने वेलाने वाढावे असेच आहे. शेती ही शेतकऱ्याची भाकर आहे. शेतीवर त्याची उपजीविका चालते; पण शेती गेल्यावर आणि पती मेल्यावर विधवेचा संघर्ष प्रस्तुत कहाणी सांगते. अरुणा उमेश भाकरे हे त्यांचे नाव. त्यांचे कुटुंब हे धरणग्रस्त होऊन बेघर झाले आणि मजुरीवर आले. मोर्शी तालुक्‍यातील दापोरी गावात ते मजुरी करताना स्थायिक झाले.
अरुणाला दोन गोंडस मुली आहेत. मोठी मुलगी धनश्री पाचवीत शिकते. अक्षरा दुसऱ्या वर्गात आहे. घरी सत्तर वर्षांची म्हातारी (सुशीलाबाई) सासू आहे. घरात कमविणारे कोणी नाही. सासूलाही कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. अरुणा शाळेचा आहार शिजविण्याचे काम करते. त्या बदल्यात तिला हजार रुपये महिना मिळतो. तिचे निराधाराचे नऊशे रुपये, असे अरुणाचे मासिक उत्पन्न लक्षात घेऊन खर्चाचे अंदाजपत्रक मोठ्या तडजोडीने दोन-अडीच हजारांच्या आसपास असून महिन्याला पंधरा किलो अनाज मिळते. सुट्टीच्या दिवशीही तेलमिठाची सोय करण्यासाठी हात मशीनसारखे राबतात. त्यात, आजारपण सांगून येत नाही.
अरुणाचा अपमानाचे घाव झेलून जीवनाचा प्रवास चालू आहे. पहिले सुंदरता लपवण्यासाठी गळ्यातील मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या फुटत होत्या. पायातील जोडवे काढून पांढरी साडी नेसावी लागायची. आता वाईट नजरेतून वाचण्यासाठी बेगडी मंगळसूत्र घालावे लागते. ती म्हणते... आमचा वनवास जन्माचा आहे. माथ्यावर पडलेला पांढऱ्या कपाळाचा डाग आता पुसता येत नाही. आमचे जगणे किड्यामुंग्यांचे. काबाडकष्ट करायचे. आम्हाला भविष्यच नाही. संसार जागोजागी पोखरला आहे. आमच्या पंखात उडण्याची शक्तीच उरली नाही. सत्ता नाही, संपती नाही. रोजगाराची हमी नाही व राहायला सुरक्षित छप्पर नाही. दोन बाजा पडतील एवढेच माझे घर. माझ्या घरावरील जीर्ण झालेल्या टिनाही शेवटच्या घटका मोजत आहेत. पावसाने एका बाजूला घर गळते आणि दुसऱ्या बाजूला डोळ्यातील पापण्यांना पाझर फुटतो. पोरींना खाटेवर टाकून साचलेले पाणी कधी सासू काढते तर कधी मी. घरातील भिंती पाण्याने सदरल्या आहेत. लोक झोपतात आणि आम्ही जागतो रात्रभर. आमचे नशीबच आमच्या जगण्यावर हसते. असल्या जगण्याची चीड येते आणि वाटते, एका क्षणात हे सर्व संपवून टाकावे. पण मातृत्व आड येते. सरकारी दवाखान्यातील मिळणाऱ्या चार गोळ्यांपलीकडे उपचार घेण्याची आमची सोय नाही. पंधरा दिवस झालेत सासू आजारी आहे. अडीनडीला मोठ्या बहिणीचा आधार होता; पण तीही जिन्यावरून पडून मरण पावली.
सासूबाई सांगतात... एकवेळ होती. घरी सर्व बरोबर होते. नऊ एकर शेती होती. तिघे भाऊ. पण आमचे गाव शिभोरा धरणामुळे जबरदस्तीने पुनर्वसित झाले. त्यावेळी अल्पसा मोबदला मिळाला. बेघर झाल्याने काम शोधत धारड यांच्या शेतात सोकारीला दापोरी येथे आलो. त्यामुळे पुनर्वसनच्या लाभाला आम्ही मुकलो. माझे आयुष्य विधवा म्हणून गेले आणि तेच आयुष्य पुन्हा माझ्या सुनेच्या नशिबी आले. जमीन गेल्याने माझे कुटुंब भूमिहीन झाले. मुलगा कधी ट्रॅक्‍टर चालवायचा तर कधी मजुरी करायचा; पण त्याने घरी फाशी घेतली. त्याचे कारण उघड झाले नाही, पण त्याचा संसार उघडा पडला. तो मेला तेव्हा मोठी मुलगी दोन वर्षांची होती व लहान गर्भात होती. तिने बापाचा चेहरा पाहिलाच नाही. सात वर्षे सुनेला कोणते मूलबाळ झाले नाही म्हणून अपमानित झाली व आता विधवेच्या पांढऱ्या कपाळाने तिचे स्वप्न चोरले. मी विधवेच्या वेदना भोगल्या आहेत. त्यामुळे मी तिच्यासोबत उभी आहे; पण माझे आयुष्य किती राहील काय सांगू? हा रस्त्यावरील संसार राहिला तर तिच्या पदरात असणाऱ्या दोन मुलींचे भविष्य कसे घडेल याची चिंता आहे. तिच्या लेकरांना बापाचे प्रेम मिळाले नाही. पाठीवर प्रेमाचा हात फिरवणारे कोणी नाही. संसारात आयुष्याचा वणवा पेटलेला पाहून मन झुरते. ती कशीही लेकरं पोसेल; पण ऊन, वारा पावसापासून सुरक्षितता देणारे घर निदान तिच्या लेकरांना मिळावे ही अपेक्षा आहे.
ज्या दिवशी घरी बाजार येत नाही त्या दिवशी धनश्रीच्या डोळ्यात बापाची प्रतिमा उभी राहते आणि सर्वांचे वडील दिसतात, पण अक्षराला तिचा बाप दिसत नाही तेव्हा वडिलांच्या फोटोतून ती बाबांना मिस करते तेव्हा अरुणाच्याही भावनेचा हुंदका अनावर होतो. सासू आपली मातृत्वाची कूस उजाड झालेली पाहून नशिबावर रडते आणि अख्खे कुटुंब आठवणीत डुबते. अरुणा परिस्थितीला श्रमाने आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करते, हा तिचा मोठेपणा आहे; पण सामाजिक, आर्थिक विषमतेची असमानता तिला उंच झेप घेण्याची संधीच प्रदान करत नाही. अरुणासारख्या महिलांना प्राथमिकता देण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. तिला घराची आणि रोजगारातील योग्य मजुरीची हमी आवश्‍यक आहे. पण नवल वाटते. जनतेचे प्रश्न सोडविणारे व किमान वेतनाची हमी देणारे सरकार कर्मचाऱ्यांना समान वेतन देते आणि अरुणासारख्या महिलांना तीस रुपये रोज देऊन श्रम घेणारे धोरण आखत असेल तर धोरणकर्त्या लोकांना थोडे तरी सामाजिक भान आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. अपमानाचे जीवन जगणाऱ्या देशातील विधवांची संख्या चार कोटींवर आहे. एकूण महिलांच्या आठ टक्के प्रमाण विधवांचे आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये पुरुषाच्या तुलनेत एकल महिलांना आर्थिक आत्मनिर्भर करणाऱ्या योजनाच नाहीत. समान न्याय असणाऱ्या देशातील स्त्रियांची मजुरी पुरुषाच्या मजुरीच्या अर्धी आहे. ती ज्या घरात राबते त्या घरात तिच्या श्रमाचा मोबदलाच मिळत नाही आणि याच मानसिकतेचे प्रतिबिंब सरकारी धोरणातही असेल तर तिला न्याय मिळणे कठीणच आहे. पुरुषप्रधानतेचा वारसा महिलांनी पुढे न्यावा ही समाजाची अपेक्षा असेल तर अरुणासारख्या महिलांना प्रोत्साहन देण्याला सरकारचा व समाजाचा सामाजिक व आर्थिक हातभार खूप आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com