मंगळ-वसाहतीचं स्वप्न जर पाहायचं... (आनंद घैसास)

आनंद घैसास anandghaisas@gmail.com
रविवार, 25 जून 2017

मंगळावर वसाहत करण्याची वगैरे स्वप्नं मानव बघत असला, तरी मुळात तिथपर्यंत जाण्याचा प्रवाससुद्धा अतिशय लांबलचक आणि कष्टप्रद आहे. मंगळ मोहिमेसाठी सध्या अंतराळवीर सराव करत आहेत. अवकाशात अनेक दिवस राहण्यासाठीचा हा सराव शारीरिक आणि मानसिकही असतो. अवकाशात असताना यानात माणसांना कशा प्रकारे वागावं लागतं, काय करावं लागतं, कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं, त्यांना काय सहन करावं लागतं, सतत अवकाशात राहण्यामुळं त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात आदी गोष्टींवर एक नजर.

मंगळावर वसाहत करण्याची वगैरे स्वप्नं मानव बघत असला, तरी मुळात तिथपर्यंत जाण्याचा प्रवाससुद्धा अतिशय लांबलचक आणि कष्टप्रद आहे. मंगळ मोहिमेसाठी सध्या अंतराळवीर सराव करत आहेत. अवकाशात अनेक दिवस राहण्यासाठीचा हा सराव शारीरिक आणि मानसिकही असतो. अवकाशात असताना यानात माणसांना कशा प्रकारे वागावं लागतं, काय करावं लागतं, कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं, त्यांना काय सहन करावं लागतं, सतत अवकाशात राहण्यामुळं त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात आदी गोष्टींवर एक नजर.

दो  न महिन्यांपूर्वी स्टिफन हॉकिंग्ज यांनी ‘या पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाही...जेमतेम शंभर वर्षं... त्यानंतर काय... याची तजवीज आताच करावी लागेल,’ असं एक विधान केलं होतं. ते बरंच गाजलंही. त्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या. त्यातला वायूप्रदूषणाचा, जागतिक तापमानवाढीचा आणि त्यामुळं होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय कडेलोटाचा भाग जरा जास्तच रंगवून सांगितला गेला, हे जरी खरं असलं, तरी काही प्रमाणात काही वर्षांत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला ते कारणीभूत होणार आहेच. बदलत्या हवामानातून तसं सूचित होत आहेच; पण तो मुद्दा मी आज मुद्दामच बाजूला ठेवत आहे आणि मानवजातीला ‘हे जग सोडून जाण्याची’ वेळ आली तर...या दुसऱ्या मुद्‌द्‌याबाबत शास्त्रज्ञांमध्ये जे काही संशोधन आणि संवाद चालू आहे, त्यासंबंधी चर्चा करतो.

पृथ्वीखेरीज इतर कुठं जाऊन आपल्याला वसाहत करावी लागली, तर त्यासाठी काय करावं लागेल, हा विचार आता गंभीरपणे चालू झाला आहे. आजपर्यंत चंद्रावर मानवानं पाय ठेवला, तसाच मंगळावरही ठेवता येईल काय, असा विचार चालू होता. त्यासाठी नासानं ‘मानवसहित मंगळयाना’ची आखणीही केलेली आहे. त्यातून या मोहिमेवर जाणारे काही अंतराळवीर सध्या प्रशिक्षणही घेत आहेत. पण त्यातच आता या ‘वसाहती’च्या विचारांची भर पडली आहे. खरं तर ही फार मोठी झेप होईल. ती झेपेल की नाही, हाच एक मुद्दा प्रत्येक वेळी पुढं येत आहे.

मानवसहित अंतराळप्रवासाची आजपर्यंत अनेक उदाहरणं झाली असली, तरी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काही ठळक नावंच माहीत असतात. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग, पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, अंतराळ अपघाताला धैर्यानं सामोरी जात प्राणार्पण करणारी कल्पना चावला आणि सध्या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या प्रकल्पात कार्यरत असणारी सुनीता विल्यम्स यांच्यापुढं आपली यादी सहसा जात नाही. चांद्रयानांमधून चंद्रावर गेलेले किंवा त्यांच्यासमवेत मोहिमेत सामील असणारे आणखी काही आणि सर्वांत प्रथम अंतराळयानात सफर करणारा युरी गागारिन आपल्याला माहीत असतो; पण यांच्याबद्दलही आणखी काही सविस्तर माहिती, किंवा अंतराळप्रवासाबद्दल काही माहिती, त्याचं तंत्र, असं काही कोणी विचारलं, तर आपण गप्पच बसतो. भारतानं नुकतेच अनेक उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडले, त्यानंतर लगेचच सर्वांत वजनदार अग्निबाणाचा यशस्वी वापर उड्डाणासाठी केला गेला, हे आपण बातम्यांमध्ये वाचतो; पण हे ‘अवकाश’ जमिनीपासून नक्की किती अंतरावर सुरू होतं, तिथं अवकाशात असताना यानात माणसं तरंगत का असतात, तिथं ते एकूणच कसे दिवस काढतात, ते आपण विचारत नाही. त्याचे त्यांच्यावर परिणाम काय होतात, तेच तर आपल्याला आज विचारात घ्यायचे आहे.

विमानं आपल्या वातावरणात, हवेवर तरंगत चालतात. वेगानं पुढं जाणाऱ्या विमानाच्या पंखांखाली त्याच्या कमनीय आकारामुळं, खाली जास्त, तर वरच्या बाजूला कमी हवेचा दाब तयार होतो, त्यामुळं विमान हवेत वर उचललं जातं, तरंगतं. मात्र, आपण जसजसं उंचावर जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते आणि एका उंचीवर अशी स्थिती येते, की आता हवेच्या दाबावर ते तरंगूच शकत नाही. या उंचीला ‘कारमन लाइन’ असं म्हणतात. ही समुद्रसपाटीपासून १०० किलोमीटर अंतरावर मानली गेली असली, तरी सुमारे ८० किलोमीटरच्या वर, नुसत्या पंखांवर विमानं उडू शकत नाहीत. त्यांना अग्निबाणाचं अतिरिक्त साह्य घ्यावंच लागतं. अशा अग्निबाणासहित असणाऱ्या विमानांना ‘एक्‍स’ प्रकारचा दर्जा दिलेला असतो. या विमानांच्या वैमानिकांनाही संपूर्ण अंतराळवीरांचा पोशाख परिधान करावा लागतो. अंतराळवीरांचं पहिलं प्रशिक्षण या विमानांच्या सरावातूनच पुढं जातं. गागारिनचं पृथ्वीप्रदक्षिणा करणारं पहिलं अवकाशयान ‘व्होस्टोक-१’ हे जमिनीपासून १६९ किलोमीटर उंचीवरून फेरी मारणारं यान होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. या तुलनेत सध्या पृथ्वीसमीप कक्षा असणारे आपले पृथ्वीनिरीक्षण करणारे सामान्य उपग्रह (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) सुमारे ९०० किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा करत असतात, तर इन्सॅटसारखे भूस्थिर कक्षा असणारे उपग्रह ३६ हजार किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत असतात. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन : आयएसएस) मात्र पृथ्वीपासून सरासरी ४०० (३३० ते ४३५) किलोमीटर अंतर राखत फिरत आहे. यापूर्वीची, आता बाद झालेली ‘मीर’ आणि ‘स्कायलॅब’ ही स्थानकं पृथ्वीपासून अनुक्रमे ३५८ आणि २३५ किलोमीटर अंतरावर होती. ही अंतरं तशी जवळची वाटतात; पण आपल्यापासून चंद्र सरासरी तीन लाख ८६ हजार किलोमीटर अंतरावर आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. हे अंतरही सरळ रेषेत कापायचं नसतं, तर पुरेसा वेग प्राप्त होण्यासाठी आधी पृथ्वीभोवती निदान तीन-चार फेऱ्या माराव्या लागतात, मग चंद्राकडं मार्गक्रमण होतं. चंद्राजवळ पोचल्यावर तिथंही वेग कमी करत चंद्राभोवती तीन-चार फेऱ्या मारत एक यान फिरत ठेवायचं, तर दुसऱ्या छोट्या यानानं खाली चंद्रावर जायचं आणि परत वर येत फिरत ठेवलेल्या यानाला जोडून घेत उलट पृथ्वीकडं येण्याची मार्गक्रमणा करायची, अशी ही सगळी प्रक्रिया असते. या सगळ्या प्रक्रियेत आत बसलेल्या मानवांना काय दिव्यातून जावं लागत असेल, ते यानात कसे वागत असतील ते पाहण्यासारखं आहे. कारण या प्रवासात सारं काही एका खुर्चीत बसूनच करावं लागतं. उठून फिरायला जागाच नसते. अवकाशस्थानकात (आयएसएस) यानात थोडी हालचाल करायला जागा असली, तरी एका माणसाला दोन्ही हात पसरून उभं राहता येईल एवढ्या परीघाच्या आणि सुमारे १३६ फूट लांबीच्या बोगद्यासारख्या जागेत सहा माणसांनी सहा महिने राहायचं असतं. यान पृथ्वीभोवती ९० मिनिटांत एक फेरी मारणार, अर्थात दिवस-रात्रीचा संदर्भच उरत नाही, कारण दर ४५ मिनिटांनी सूर्योदय-सूर्यास्त होत राहतो! पण मंगळयानासाठी तसं नाही होणार. ते एकदा पृथ्वीच्या कक्षेतून सुटलं, की स्वत:भोवती फिरत चक्क सूर्याच्या दिशेनं निघणार. सूर्याला जवळून वळसा घालून पुढं जाणार. या साऱ्या प्रवासाला किमान तीनशे दिवस लागणार. (आपल्या मंगळयानाला एक महिना पृथ्वीप्रदक्षिणा, २९८ दिवसांचा प्रत्यक्ष मंगळापर्यंतचा प्रवास आणि पुढं १५ दिवस यान मंगळाच्या कक्षेत स्थापन करण्यास लागले होते.) मात्र, मंगळाकडं मानवाला नेणारं यान काही उपग्रहाएवढं छोटं असणार नाही; तसंच ते आयएसएस या अवकाशस्थानकाएवढं मोठंही नक्कीच असणार नाही. किती माणसांना (सध्या तरी दोन अंतराळवीर असतील, अशी योजना आहे) त्यात राहण्याची व्यवस्था करायची, ते ठरवायला हवं. कारण जायला एक वर्ष, यायला एक वर्ष, पृथ्वीप्रदक्षिणेचे काही दिवस, मंगळप्रदक्षिणेचे काही दिवस...म्हणजे किमान सव्वादोन वर्षं तरी लागतील, असा अंदाज करावा लागणार आहे...

वेगळ्या वातावरणासाठीचा सराव
‘द अटलांटिक’ या एका नियतकालिकानं ‘ऑन द लाँचपॅड - रिटर्न टू डीप स्पेस’ या विषयावर एक मुलाखत-परिसंवादासमान कार्यक्रम मे महिन्यात अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीला घडवून आणला होता. सध्या मंगळावर जाण्यासाठी निवडलेल्या प्रत्यक्ष प्रशिक्षण घेणाऱ्या अंतराळवीरांना, स्वत: आधी अंतराळयात्रा करून आलेल्या काही जणांचा यात सहभाग होता. त्यातून असं कळलं, की या अंतराळप्रवासादरम्यानची तयारी नुसती शारीरिक नाही, तर मानसिकही करावी लागणार आहे, कारण प्रवासाचा कालावधी फार मोठा आहे. यात एकमेकांशी कसं वागायचं, समजुतीनं कसं राहायचं, जगाशी संपर्कच तुटला तर काय करायचं, याचंही त्यात प्रशिक्षण होतं. ही प्रशिक्षणं (हाय सीज प्रकल्प) हवाई बेटांवरच्या मौना लोआ या ज्वालामुखी असलेल्या एका पर्वतावर समुद्रसपाटीपासून ८,२०० फूट उंच ठिकाणी सुरू आहेत. या परिसराचं वातावरण मंगळाशी जुळणारं आहे. फक्त मंगळासारखा गुरुत्वीय परिणाम नाही; पण या उजाड वाळवंटासारख्या पर्यावरणीय स्थितीशी कसा मुकाबला करायचा, याचं इथं प्रशिक्षण चालतं. दुसरी जागा आहे फ्लोरिडाच्या जवळ अटलांटिक महासागराच्या तळाशी, सुमारे ६२ फूट खोलवर. इथं अंतराळवीरांचा पोशाख चढवून पाणबुड्यासारखं खाली गेल्यानं अवकाशातल्या सूक्ष्मगुरुत्वासारखी परिस्थिती निर्माण होते. या स्थितीत पोशाख अंगावर असताना कामं कशी करायची, याचा सराव इथं केला जातो. मग ते एखाद्या दगडाचा नमुना गोळा करून त्याचं विश्‍लेषण करणं असो, किंवा एखादा तांत्रिक बिघाड झालेली वस्तू दुरुस्त करणं असो. शिवाय इथं असताना कुटुंबाशी संपर्क राहत नाही. यातल्या एका प्रशिक्षणात सलग १४१ दिवस अंतराळवीरांना पाण्याखाली ठेवण्यात आलं होतं! त्यात लक्षात आलं, की अगदी थोडी तहान लागणं, भूक लागणं इथपासून, या परिस्थितीत झोप नीट न लागणं या बाबींचाही मानसिकता बिघडण्यात फार मोठा वाटा आहे. या गोष्टी लहानसहान वाटतात; पण एका प्रशिक्षणार्थीची या कार्यक्रमादरम्यान आजी वारली, ते कळल्यावर त्याला रडू आवरलं नाही आणि अंतराळात राहताना तर रडणं ही गोष्ट अजिबात चालत नाही. त्यामुळं अशा बातम्या अंतराळवीरांपर्यंत पोचू द्यायच्या की नाहीत, असा मोठाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. कधीही तळपता सूर्य दिसणार नाही. कधीही तोंडावर सामान्य वाऱ्याची झुळूक येणार नाही...यानात अनेक यंत्रं, संगणक सतत सुरू राहणार, त्याचा कायम आवाज येत राहणार. शिवाय त्या आवाजांकडं, लुकलूकणाऱ्या दर्शक दिव्यांकडं सतत लक्ष देणंही आवश्‍यक आहे. नेहमीचं खाणं नाही, तर कोरडं केलेलं, थंड अन्नच गरम पाणी घालून, नळीनं चोखत खावं लागणार...शिवाय आंघोळ नाही. ओल्या टॉवेलनं अंग पुसण्यावरच समाधान मानावं लागणार. सोबत नेलेलं पाणी मर्यादित असल्यानं वापरलेल्या पाण्याला (मलमूत्रातल्या पाण्यालाही) शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करणं अपरिहार्य. यातल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरचं म्हणणं पडलं, की अशा मोहिमेत सामील होण्याअगोदर अपेंडिक्‍सही शस्त्रक्रिया करून काढून टाकणं योग्य होईल. दात निरोगी असलेच पाहिजेत, दाढदुखी होणं ही मोठी पंचाईत असेल...तसंच रोजच्या रोज दाढी-मिशा, नखं वाढणं हा पण अवकाशजीवनात एक त्रासदायकच भाग असेल!

शरीरावरचे परिणाम
‘आयएसएस’ अवकाशस्थानकात राहून आलेल्या अंतराळवीरांवर कोणते परिणाम होतात हे पाहिलं, तर त्यात सहा मुख्य गोष्टी दिसून आल्या.
१. उंची वाढते : गुरुत्वाकर्षणाचं त्वरण नसल्यानं पाठीचा कणा सैल होतो. शरीराला सतत टेकू देण्याची गरज अवकाशयानातल्या सूक्ष्मगुरुत्वात उरत नाही. त्यामुळं मणक्‍यांवरचा दाब नाहीसा होतो. त्यांच्यातलं अंतर वाढतं. त्यामुळं सहा महिन्यांच्या अवकाशवास्तव्याच्या कालावधीत एकूण उंचीत तीन टक्‍क्‍यांनी वाढ होते.
२. चेहऱ्याला सूज आणि हडकलेले पाय : अवकाशात पोचल्यावर काही दिवसांतच शरीराचा वरचा भाग, छाती, दंड, हात, मान आणि विशेषत: चेहरा सुजल्यासारखा व्हायला लागतो. याला ‘चंद्रमुखी होणं’ असं म्हणतात- कारण चेहरा चेंडूसारखा गोल होतो. हे असं व्हायचं कारण म्हणजे, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळं शरीरातला द्रव, मुख्यत: रक्त सतत पायाकडं खाली जात असतं. ते सतत वर मेंदूकडं, शरीराच्या वरच्या भागात, चेहऱ्याकडं पाठवण्याचं काम हृदयाला करावं लागतं. मात्र, अंतराळात सूक्ष्मगुरुत्वामध्ये रक्ताचं वितरण शरीरात आपोआपच समान होत असल्यानं आता हृदयाकडून शरीराच्या वरच्या भागात रक्त अधिक पाठवलं जातं, तर पायाकडं आपोआपच कमी जातं. शिवाय आता शरीराला आधार देण्याचंही काम पायाला नसते. त्यामुळं पाय हडकुळे होतात, तर चेहरा अधिक रक्तप्रवाह मिळाल्यानं सुजल्यासारखा होतो.
३. सुसूत्रता जाते : नेहमीचं बसणं, उठणं, चालणं ही कामं करताना नेहमी आपल्याला गुरुत्वाकर्षणाचं भान असतं, तसंच सतत बऱ्याच प्रमाणात बल वापरावं लागतं. बघा, चालतानाही आपण जमीन जोरानं ढकलतो, तेव्हाच आपण पुढं जातो; पण सूक्ष्मगुरुत्वात जराशी हालचाल संपूर्ण शरीरालाच त्या दिशेला वाहवत नेते. तसंच हातातून वस्तू सोडून दिली, की ती खाली पडते, पाणी, पदार्थ सांडतात, हे आपल्याला माहीत असतं; पण अंतराळात असं होत नाही. वस्तूंना तिथं वजन नसतं. त्या हातातून सोडल्या तरी तरंगतच राहतात. याचीच सवय होते आणि नंतर खाली पृथ्वीवर आल्यावर हातातून वस्तू सोडून दिल्यावर खाली पडते, हे लगेच अंगवळणी पडणं अवघड जातं. चालणं, उठणं, बसणं हेही कठीण होतं. एवढंच नव्हे, तर पटकन्‌ मागं वळून पाहणं हेही! अवकाशातून परत आल्यावर अचानक जिभेला आलेल्या जडपणामुळं बोलणंही बोबडं होतं! चांगले दोन महिने व्यायाम केल्यावर परत आपला आपल्यावर ताबा मिळवता येतो...
४. स्नायूंना शिथिलता येते : शरीर नेहमी परिसराच्या आवश्‍यकतेनुसार आपल्यात बदल घडवून आणत असतं. या ‘अनुकूलनाच्या’ परिणामांतून अवकाशात, सूक्ष्मगुरुत्वात नको असलेले स्नायू विरून जाण्याची क्रिया फार पटकन्‌ होते. ज्या स्नायूंना गुरुत्वीय त्वरणाविरुद्ध सतत वागण्याची सवय असते, त्यांना कामच राहत नाही. ताण सहन करण्याची गरजच संपते, त्यातून स्नायूंचा असलेला कणखरपणा जातो. ते शिथिल होत जातात. परत आलेल्या अवकाशयात्रींना उठून उभंही राहता येत नसतं! चालणं तर सोडाच...हात वर करून हलवायलाच सुमारे तीन तास लागतात.
५. हाडांची घनता कमी होते : संपूर्ण शरीराला टेकू देण्याचं, तोलण्याचं कामच सूक्ष्मगुरुत्वात राहत नाही. तसंच हाडांना स्वत:लाही वजन तिथं उरत नाही. अर्थात याचा परिणाम हाडांच्या टणकपणावर होतो. ती ठिसूळ होतात, तशीच त्यांची घनता दर महिन्याला एक टक्‍क्‍यानं कमी होताना आढळलं आहे. यामुळं अंतराळवीरांच्या जातानाच्या आणि अवकाशातून परत आल्यानंतरच्या वजनात फरक जाणवतो.
६. झोपता येत नाही : अवकाशयानात वजनरहित अवस्था असल्यानं, वर-खाली असं काहीच नसतं. त्यामुळं गादीवर पडून झोपणं हे तर होतच नाही- कारण शरीरालाही वजन नसतं. त्यामुळं स्वत:ला झोपण्याच्या गादीच्या पिशवीत (ही यानाच्या कोणत्याही भिंतीशी असू शकते) पट्ट्यांनी बांधून घेऊन झोपावं लागतं; पण तरीही डोळे मिटल्यावर झोप येतेच असं नाही- कारण डोळ्यांसमोर अचानक प्रकाशाचे चकाकते झोत दिसतात. शोभेच्या दारूच्या फटाक्‍यांची आतषबाजीच होते, असं वर्णन अंतराळवीरांनी केलं आहे. मिटलेल्या डोळ्यांत या फोटोच्या फ्लॅशप्रमाणे अचानक चमकणाऱ्या प्रकाशझोतांमुळं दीपून जाऊन झोप येणं कठीण होतं. हे घडतं अवकाशात यानावर होणाऱ्या सततच्या वैश्विक किरणांच्या माऱ्यामुळं. या किरणांचा मारा सततच शरीरावर होत असतो. त्याचे इतर परिणाम काय आणि किती ते अजून समजून आलेले नाहीत.

प्रजनन कसं?
या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या, तरी एक मोठा मुद्दा बाजूलाच राहतो. आपल्याला अवकाशात किंवा दुसऱ्या ग्रहावर वंश वाढवायचा असेल तर? प्रजनन कसं होईल? वजनरहित अवस्थेत, बाळाची आईच्या पोटात कशी वाढ होईल, किंवा अवकाशात जन्माला आलेलं बाळ पुढं कसं वाढेल, त्याच्या शरीररचनेतच काही बदल असेल काय, सूक्ष्मगुरुत्वात बाळाच्या मेंदूची, हाडांची, स्नायूंची वाढ कशी होईल? आज तरी याचं उत्तर ‘माहीत नाही’ असंच आहे. पण त्या दृष्टीनं संशोधन करायलाच हवं. नुकताच एक प्रयोग जपानी संशोधकांनी केला, ज्यात उंदरांचे शुक्रजंतू गोठवून आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाकडं पाठवले होते. ते तिथं सहा महिने ठेवून परत आणले गेले. त्या शुक्रजंतूंना वापरून त्यातून जी उंदरांची पिल्लं जन्माला आली आहेत, ती नेहमीप्रमाणं प्रगती करत आहेत; पण अवकाशातच गरोदरपण आलं, तर काय परिस्थिती होईल, याचा मागोवा घेणं आवश्‍यक आहे. शिवाय अवकाशात समागम शक्‍य आहे का आणि त्यातून प्रजननसंभव होऊ शकेल का, हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे...

मंगळावर आपल्या वसाहतीचं स्वप्न पाहणं ही जेवढी सोपी कल्पनारम्य बाब आहे, तेवढीच त्याची प्रत्यक्षात पूर्तता होण्यासाठी चाललेले प्रयत्न ही मोठी मेहनत आणि कष्टप्रद बाब आहे, हे जाणून घ्यावंच लागेल....

Web Title: aanand ghaisas write article in saptarang