हिंदुश, इंडिया आणि भारत

इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास भारत देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून त्याही पलीकडे नांदणारी भारतीय संस्कृती दिसून येते.
Shivmandir
ShivmandirSakal
Summary

इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास भारत देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून त्याही पलीकडे नांदणारी भारतीय संस्कृती दिसून येते.

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

कालचा भारत, हिंदुस्थान, इंडिया कसा होता, तसंच प्राचीन आणि मध्ययुगीन काळात सध्याच्या भारताचे जगाशी आलेले सांस्कृतिक आणि व्यापारी-संबंध कसकसे होते हे या साप्ताहिक सदरातून उलगडलं जाईल.

इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास भारत देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून त्याही पलीकडे नांदणारी भारतीय संस्कृती दिसून येते. त्या दूरवरच्या प्रदेशात भारतीय धर्म, भाषा, लिपी, साहित्य, कला, स्थापत्य यांचा प्रभाव पडला होता. अनेकदा भारतीय संस्कृतीच तिथं नांदत होती हे अनेक पुराव्यांनी स्पष्ट झालं आहे. भारत आणि जग यांचा आलेला हा सांस्कृतिक संबंध बघताना भारताच्या नावांबद्दल थोडं जाणून घेऊ.

भारतीय राज्यघटनेतील पहिल्याच अनुच्छेदात ‘इंडिया अर्थात् भारत हा राज्यांचा संघ असेल,’ असं नमूद केलं आहे. त्याप्रमाणे ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन नावांनी आपला देश ओळखला जातो. भारताच्या ‘भारत’, ‘हिंदुस्थान’ आणि ‘इंडिया’ या नावांचा इतिहास थोडक्यात पाहू या.

भारत

भारत हे नाव कसं पडलं असेल याच्या पुढील तीन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. भारतातील प्राचीन वैदिक वाङ्मयात भरत नावाच्या लोकसमूहाचा उल्लेख आहे. या भरतकुलातील राजे गंगा, यमुना या नद्यांना अर्घ्य देतात, या उल्लेखावरून यांचं राज्य उत्तर भारतात असावं हे स्पष्ट होतं. या भरत लोकसमूहाच्या नावानं भारत हे नाव आलं असावं.

महाभारतातील आदिपर्वातील उल्लेखानुसार दुष्यंताचा पुत्र भरत याच्या नावावरून निर्माण झालेल्या भरतकुलातील कुरु घराण्यात कौरव-पांडवांचा जन्म झाला होता आणि या भरत राजाच्या नावावरून ‘भारत’ अथवा ‘भारतवर्ष’ हे नाव पडलं असं एक परंपरा आपल्याला सांगते.

जैन परंपरेनुसार पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांचा मोठा मुलगा चक्रवर्ती भरत यांचं राज्य सर्वदूर पसरलेलं होतं. या भरत चक्रवर्तीन् राजाच्या नावावरून भारत हे नाव प्रसिद्ध झालं. काही पुराणांनुसार, याच चक्रवर्ती भरत राजाच्या नावावरून ‘भारतवर्ष’ हे नाव पडलं.

भारतवर्ष या शब्दाचा प्राचीन शिलालेखातील पुरावा उडिशामधील भुवनेश्वरजवळील उदयगिरी इथं असलेल्या २१०० वर्षांपूर्वीच्या खारवेल नावाच्या राजाच्या प्रशस्तीमध्ये आढळतो, तसंच ‘अमरकोष’ या संस्कृत ग्रंथातदेखील भारतवर्ष या नावाचा उल्लेख आहे.

‘विष्णुपुराणा’तील उल्लेखानुसार, समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असणारी भूमी ही भारतवर्ष म्हणून ओळखली जात असे. म्हणजेच आजचा आपला संबंध भारतदेश होय.

हिंद/हिंदुस्थान

भारताला बाहेरील राज्ये; विशेषतः सिंधू नदीच्या पश्चिमेकडील राज्ये प्राचीन काळी कोणत्या नावानं ओळखली जात होती हे पाहणंही गरजेचं आहे.

२५०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या प्राचीन इराणी साम्राज्याचा विस्तार सध्याच्या तुर्कस्तानपासून ते पाकिस्तानपर्यंत होता. प्राचीन इराणी भाषेत ‘स’ या अक्षराचा उच्चार ‘ह’ असा केला जात असे. त्यामुळे इराणी लोक सिंधू नदीला ‘हिंदू’ अथवा ‘हिंद नदी’ म्हणून ओळखत असत. इसवीसनपूर्व पाचव्या शतकातील (२५०० वर्षांपूर्वी) प्राचीन इराणी साम्राज्याचा राजा दरायस याच्या इराणमधील प्राचीन शिलालेखात त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या २३ प्रदेशांची यादी दिलेली आहे. यातीलच एक प्रांत ‘हिंदुश’ म्हणून ओळखला जात होता. अर्थातच, या शिलालेखातील इराणी राजाच्या ताब्यात असणारा ‘हिंदुश’ प्रांत म्हणजे, ज्याला सध्या आपण भारत देश म्हणून ओळखतो तो सर्व भूभाग नव्हे तर, सिंधू नदीच्या काठावरील दक्षिण पाकिस्तानातील सिंध हा प्रांत होय.

प्राचीन इराणी साम्राज्यातील राजांप्रमाणे इसवीसनाच्या तिसऱ्या शतकातील इराणी राजा शापूर (पहिला) याच्या इराणमधील नक्ष-ए-रुस्तम येथील शिलालेखात त्यानं स्वतःच्या साम्राज्यातील विविध प्रदेशांची यादी दिलेली आहे. त्यात त्यानं इतर प्रदेशांच्या नावांसह ‘हिंदस्तान’ हा प्रदेश नोंदवला आहे. वर उल्लेखिलेल्या प्राचीन इराणी राजांच्या लेखातील हिंदुश हा प्रांत, इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात (१७०० वर्षांपूर्वी) हिंदस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला होता. यामुळे अरबदेखील भारताला ‘हिंद’ या नावानं संबोधत असत.

इंडिया

२५०० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या आसपासच्या प्रांताला प्राचीन इराणी लोकांनी ‘हिंदुश’ म्हणून संबोधलं. २४०० वर्षांपूर्वी या इराणी साम्राज्याचा भाग असलेल्या सध्याच्या तुर्कस्तानातील आयोनिया प्रांतातील ग्रीकांनी इराणी इतिहासाबद्दल लिहिताना हिंदुश प्रांताबद्दलदेखील लिहिलं आहे.

ग्रीक भाषेच्या या आयोनियन बोलीभाषेत शब्दाच्या सुरुवातीला असलेल्या ‘एच’ या अक्षराचा उच्चार केला जात नसल्यानं त्यापुढील ‘आय’ हे अक्षर वापरलं गेलं. त्यामुळे हिंदुशला ग्रीकांनी ‘इंडिका’ किंवा ‘इंडिया’ म्हणून संबोधलं. या प्रभावामुळे साधारणपणे २१०० वर्षांपूर्वी युरोपमधील रोमन लोकांनीदेखील या प्रदेशाचा उल्लेख ‘इंडिया’ म्हणून केला.

सिंधू नदीवरून आलेल्या ‘हिंद’ आणि ‘इंडिया’ या नावांनी भारताला ओळखणाऱ्या इराणी आणि ग्रीक लोकांसाठी भारताची सीमा वायव्येला सिंधू नदी, उत्तरेला हिमालय, पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेला समुद्र अशी होती. अर्थात्, नंतर इतिहासात ही सिंधू नदीची सीमा थोडीफार बदलत राहिली.

सलग असलेल्या भूभागामुळे भारतीय संस्कृती आणि धर्म हा सिंधू नदीच्या पलीकडे जाऊन अफगाणिस्तानमार्गे, मध्य आशिया, चीन, जपान, कोरियापर्यंत पोचला. त्याचप्रमाणे भारतीय बंदरांद्वारे समुद्र मार्गानं चालणाऱ्या व्यापारामुळे भारतीय संस्कृती आग्नेय आशियात मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम या देशांपर्यंत जाऊन पोहोचली. आग्नेय आशियातील प्राचीन हिंदुमंदिरं, बौद्ध स्तूप, विहार, तसंच तेथील गावांची, राजांची नावं, चाली-रीती, परंपरा यातून तेथील भारतीय संस्कृतीचं दर्शन जागोजागी होतं.

वास्को-द-गामानं इसवीसन १४९८ मध्ये भारताला येण्याचा सागरी मार्ग शोधण्यापूर्वीच, प्राचीन काळापासून विविध राजे, व्यापारी, भिक्षू यांच्याद्वारे भारतीय संस्कृती आशिया खंडात दूरपर्यंत पोहोचवली गेली होती. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात सध्याच्या भारताचा जगाशी आलेला हा सांस्कृतिक आणि व्यापारी-संबंध उलगडून दाखवणारी ही लेखमाला आहे. यापुढील लेखांतून आपण चार हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीपासून ते चारशे वर्षांपूर्वी युरोपीय देशांच्या ईस्ट इंडिया कंपन्या भारतात येण्यापर्यंतच्या काळापर्यंत भारताचा जगाशी आलेला सांस्कृतिक आणि व्यापारी-संबंध जाणून घेणार आहोत.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com