तूच आदिशक्ती (आश्‍लेषा महाजन)

aashlesha mahajan
aashlesha mahajan

नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (ता. दहा) सुरवात होत आहे. आदिशक्तीची उपासना करण्याचा हा उत्सव. खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच. सर्जनाचा, चैतन्याचा सोहळा विविध रूपांमध्ये साजरा होत असतोच. कोणत्या आहेत या शक्ती, या सुप्त शक्तींचं परंपरेशी नेमकं नातं काय, या शक्तींचा अर्थ काय, त्या शोधायच्या कशा, त्या कमी होत चालल्या आहेत की त्या वाढवायला हव्यात आदी सर्व गोष्टींचा वेध.

प्राचीन वाङ्‌मयामध्ये अनेक देवीस्तोत्रं आहेत. देव्यथर्वशीर्षम्‌, आनंदलहरी, शीतलाष्टकम्‌, चण्डीकवचम्‌, सौंदर्यलहरीस्तोत्रम्‌, दुर्गास्तोत्रम्‌, कालिकास्तोत्रम्‌, पुराणोक्त रात्रिसूत्रम्‌, वाग्वादिनीस्तोत्रम्‌, ललितापंचरत्नस्तोत्रम्‌, अन्नपूर्णास्तोत्रम्‌ अशी बरीच मोठी यादी देता येईल. स्तोत्रं म्हणजे स्तुतीपर रचना. त्यात त्या त्या देवींची वर्णनं आहेत, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं आहेत, त्यांच्या पराक्रमकथाही आहेतच. भक्ती, प्रीती, समर्पण, शरणता, पूजन-अर्चन, भय, आदर, दबदबा, अचंबा अशा विविध भावना त्यात ओतप्रोत आहेत. विविध छंदवृत्तांमधली ही संस्कृत स्तोत्रं गायनानुकूल, नादमधुर आहेत. पदलालित्य, अनुप्रास, उपमा, दृष्टांत यांनी अलंकृत आहेत. ती बव्हंशी पुरुषांनी रचलेली आहेत. पुरुषांना देवीची, पर्यायाने स्त्रीची इतक्‍या मोठ्या प्रमाणात मन:पूत स्तुती करावीशी वाटणं ही गोष्ट आश्‍चर्याची आणि महत्त्वाची आहे. स्त्रीच्या स्तुतीसाठी रचलेल्या "कलाकुसरीच्या कविता' असं जरी त्यांचं स्वरूप असलं, तरी "यत्र यत्र धूमो, तत्र तत्र अग्नि:' या न्यायाप्रमाणं एकेकाळी स्त्री खरंच समाजातील प्रभावशाली घटक असावा, असं वाटतं. या स्तोत्रांच्या रचनांचा काळ ठरवणं अवघड आहे. तरी त्या काळात मातृसत्ताक पद्धत काही कुळांमध्ये अस्तित्वात असावी, असं वाटतं. देवीच्या शक्तीचा मान राखावा, ही भावनाही खूप बोलकी आहे; पण तिला मखरात पुजून झाल्यावर नि उत्सव झाल्यावर मग मात्र तिच्यावर दुय्यमतेचे शिंतोडे टाकावे असं समाजाला का वाटलं असावं आणि स्त्रियांनी ते का सहन केले असावे, हा अभ्यासाचा विषय आहे.
अश्विनशुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासुनी घटस्थापना करुनी हो
मूळमंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवुनी हो
ब्रह्मा-विष्णु-रुद्र आईचे पूजन करिती हो...
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो...


संत रामदासांनी रचलेल्या आरतीतला हा अंश. दशमीच्या दिवशी सिंहारुढ आंबेनं शुंभ-निशुंभ राक्षासाचा रणभूमीवर वध केला, असा उल्लेख त्यात आहे. नवरात्रोत्सवाचं मूळ आणखी एका कथेत आहे. कोणे एके काळी दुर्गम राक्षसानं घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. वर म्हणून त्यानं चारी वेद मागून घेतले. त्यामुळे यज्ञच बंद पडले. दुर्गमनं देवांवर आक्रमण केले. त्यावेळी विश्वव्यापक, त्रिगुणात्मक, शतनेत्रधारी आदिमाया प्रकटली आणि तिनं देवांच्या विनंतीवरून दुर्गमचा वध केला. दुर्गमला मारणारी ती दुर्गा. हा विजयादशमीचा उत्सव घटस्थापना, नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, सोने-वाटप, शत्रपूजन, भोंडला अशा विविध स्वरूपांत विस्तारत गेला. दुर्गादेवीच्या मूळ उत्सवात रावणवधाचा संदर्भ जोडला गेला. खंडेनवमीला पांडवांनी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रं काढली आणि विराटाच्या मदतीनं कौरवांवर विजय मिळवला. अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या नावानं आजही जोगवा (कोरडा शिधा) मागितला जातो. त्याचाही हा आनंदोत्सव. शस्त्रपूजनाचा, सीमोल्लंघनाचा संदर्भ घेत बंगालसह संपूर्ण देशातच स्त्रीशक्तीचा जागर करण्याची परंपरा निर्माण झाली. कुमारिकांनाही भेटावस्तू देऊन खाऊपिऊ घातलं जातं. हस्त नक्षत्रावर मुली भोंडला खेळतात.

उमा, गौरी, पार्वती, जगदंबा या देवीच्या सौम्य रूपांसह गुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूपंही सर्वश्रुत आहेत. ही सर्व रूपं स्त्रीच्या ठायी आहेत. ती रूपं वेळोवेळी प्रकट करणं आणि समाजपुरुषाला सुयोग्य दिशेनं वळवणं हे काम स्त्रियांचं आहे. स्त्रीनं स्वत:वर प्रेम करायला शिकले पाहिजे. आपलं आकाश नि अवकाश आखत जायला हवं. ते खरं देवीपूजन.

देवीच्या सामर्थ्याचा पुनर्जन्म हवा
रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा परंपरा आणि नवता यांची सांगड घालत देवीच्या या सामर्थ्याचाच आज पुनर्जन्म होण्याची आवश्‍यकता आहे. रणभूमीवर पराक्रम करणारी, शत्रूला "त्राहि मां' करून सोडणारी, आत्मनिर्भर तेजस्वी स्त्री, मुलं-घर-शेती यांची रक्षणकर्ती स्वयंसिद्ध स्त्री मधल्या काळाच्या ओघात कुठं, कशी, कुणी, का निष्प्रभ केली, हा प्रश्न आहे. एकीकडे देवी नि दुसरीकडे दासी अशा दोन टोकांवर तिला कुणी, कधी बसवलं? तिनंही परिस्थितीशरण होत स्वत:चा हा संकोच मान्य का केला? "माणूस' किंवा "व्यक्ती' म्हणून तिचा सर्वांगीण विकास का खुंटला? ही सुंदर स्तोत्रं वाचताना हे प्रश्न पडतात. माणूस हा उत्सवप्रिय आहे. उत्सवात ललितकलांचा आविष्कार करता येतो. त्यातून आनंद व उत्साहाचा वर्षाव होतो; पण उत्सव साजरे करताना त्याचा मूळ गाभा ध्यानात घ्यायला हवा; पण तसं फारसं होताना दिसत नाही. गाभ्यापेक्षा केवळ महिरपीच अधिक नक्षीदार नि किंमती झाल्या आहेत. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण नि कृतक अस्मितांचे तवंग चढत आहेत. हे सारं जाणून डोळस श्रद्धा जोपासायला हव्यात.
या देवी, सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता |
नम: तसै: नम: तसै: नम: तसै: नमोनम: ||


स्त्रीला "शक्ती' म्हणतात. कारण ती पुरुषाला नेहमीच प्रेरक वाटलेली आहे; पण खुद्द स्त्रीला आपण प्रेरक आहोत, शक्तीचा समुच्चय आहोत, हे खूपदा सांगावं लागतं. तिला आत्मभान द्यावं लागतं. स्त्री ही युगायुगांची धारा आहे. कारण पिढी जन्माला घालणारी ती जन्मदा आहे. जन्म-जीवन-मृत्यू हा एक प्रवाह असून आपण सारेच त्या जन्मरूपी जान्हवीच्या प्रवाहातल्या छोट्यामोठया लाटा आहोत. काहीतरी निर्माण करतो- तो ब्रह्मा, ते धारण करतो- तो विष्णू, आणि कालांतराने त्याचा विलय करतो- तो महेश. ही आपली भारतीय त्रिनाट्य-धारा आहे. (यालाच G- Generator, O- Organizer, D- Destroyer = GOD असंही म्हणतात.) उत्पत्ती-स्थिती-विलय हे चराचरातलं व्यापक, विराट वर्तुळ. त्याचंच एक रूप म्हणजे लौकिक जगातल्या जन्म-जीवन-मृत्यूचं तीन आऱ्यांचं चक्र. या प्रवाहात महत्त्वाची असते सर्जनशील स्त्री. जी आहे प्रकृतीचं रूप. या जन्मजान्हवीचं एक रूप म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे मानुषी. अखंड ऊर्जास्रोत प्रवाहित ठेवणारी ही गंगोत्रीच. रोज नितनूतन जन्म घेत जगणारी आणि जगवणारी ही पुनर्नवा.
ही युगायुगांची धारा...
ही जन्मजन्मीची राधा...
हा पिढी-पिढीचा सेतू...
अन अस्तित्वाचा गाभा...
ही युगायुगांची धारा...

या उदरपोकळीमधुनी...
उगमाचा अक्षय ओघ...
हृदयातिल अमृतकुंभ...
संजीवक ऊर्जास्रोत....
ही युगायुगांची धारा...

ही नवजाता, बालिका, कलिका, कुमारिका, तुमती, पुनर्नवा, किशोरी, षोडशा, तरुणी, प्रौढा, ऋतुगर्भा, जन्मदा, माता, पोषिता, संजीवनी आणि युगंधरा आहे तरी कशी? ती आहे जीवन सामावून घेणारी. मात्र, जेव्हा शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि भटक्‍या टोळ्या भूमीच्या तुकड्यावर स्थायिक झाल्या, तेव्हा आत्मनिर्भर, मुक्त स्त्री लग्नसंस्थेत आणि पातिव्रत्याच्या कल्पनांमध्ये बंदिस्त झाली, असं अभ्यासक म्हणतात. याच दरम्यान मातृसत्ताक पद्धत विरळ होत पितृसत्ताक पद्धत आणि "प्रजापती संस्था' रूढ आणि मान्य झाली, असं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्यासह अनेक अभ्यासकांचं मत आहे. शेतीचा शोध, पितृसत्ताक आणि बाईचं जीवन बंदिस्त आणि दुय्यम होणं या तीन गोष्टी परस्परपूरक ठरल्या. घटस्थापना करण्याची प्रथा ही कृषीसंस्कृतीतून विकसित झाली आहे. घट हे पृथ्वीचं जसं प्रतीक, तसंच ते स्त्रीच्या गर्भाशयाचं द्योतक होय.

कुलाचाराप्रमाणं घट बसवणं आणि मालाबंधन, तसंच नऊ दिवस तेलाचा दिवा लावणं इत्यादी प्रथा आहेत. या प्रथा म्हणजे कृतज्ञतेची प्रतीकं आहेत. कर्मकांडं आहेत. कर्मकांडं न करताही स्त्रीविषयी कृतज्ञता दाखवता येते; पण माणसाला सगुणभक्ती प्रिय. म्हणून हे उत्सव. घट म्हणजे शेतातली माती आणून तिचा चौकोनी थर करून त्यात सप्तधान्यं ः जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे- लावली जातात. नऊ दिवसांत ही सप्तधान्यं वीत, दीड-वीत उंच वाढतात. हा खरं तर सर्जनाचा उत्सव, नवनिर्मितीची पूजा. अन्नधान्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा. बीजक्षेत्राचा सण. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रीच्या कल्पक निर्मितीक्षमतेचा जागर. तिच्या चिवट आसोशीचा, जगण्याचाच उत्सव करणाऱ्या मनोभूमिकेचा गौरव. माता आणि मातीचा उत्सव! माता आणि माती! फक्त एका वेलांटीचा भेद. या दोघींत किती साम्य आहे...
माता गाते जीवन-गाणे, माती- हिरवे गाणे
दोघींच्याही सुरांमधले टिपून घ्यावेत दाणे..
माती फुलवी मोती, नि मन घडवी माता
अगाध प्रेमापुढे त्यांच्या झुकतो माझा माथा...
माता-माती दोघींमध्ये वेलांटीचा भेद
भेदापार झळाळतो वात्सल्याचा वेद

पुनर्नवा, जीवनसरिता...
स्त्रीला जाणायचं असेल, तर तिला अनेक दृष्टिकोनांमधून पाहायला हवं. स्त्री स्वत:कडे कशी बघते? एक स्त्री अन्य स्त्रियांकडे कशी बघते? पुरुषाच्या नजरेतून ती कशी आहे, कुटुंबाच्या दृष्टीतून आणि समाजाच्या, संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यातून तिचं स्वरूप काय? नुसते नवरात्रोत्सवांचे इव्हेंट्‌स, व्रतवैकल्यं नि पारायणं करण्यापेक्षा अशा विविध कोनांतून स्त्रीजीवन जाणून घेता येईल. ज्यासाठी तिला "स्त्री' म्हटलं जातं, त्या तिच्या शरीराविषयीच आधी बोलायला हवं. स्त्री जे शरीर घेऊन जन्माला येते, ते शरीर, ती सजीव मूर्ती म्हणजे निर्मात्या ब्रह्मदेवाची अनुपम सुंदर निर्मिती. स्त्रीदेह पुरुषदेहापेक्षा वेगळा ठरतो तो स्तनं, योनी आणि गर्भाशय या तीन अवयवांनी. हे तिन्ही अवयव तिची व्यवच्छेदक लक्षणं आहेत. हे तिन्ही अवयव नवसर्जनासाठीची तीर्थोदकं आहेत. बीज स्वीकारणारा योनीमार्ग, बीजाला पोसणारं गर्भाशय आणि अपत्याला पोसणारं स्तन ही तिच्या स्त्रीत्वाची अविभाज्य अंगं आहेत. विश्व-उत्पत्तीच्या स्थानाप्रमाणं मानवी जन्मांच्या संक्रमणाची ती केंद्रं आहेत, वाहक आहेत. एखाद्या पवित्र यज्ञाप्रमाणं आहे तिचं शरीर. ते सर्जनशील आहे. वेदांमध्ये स्त्रीच्या शरीराला "पुनर्नवा' म्हटले आहे. पुनर्नवा म्हणजे दर महिन्याला- मासिक रजस्राव झाल्यानंतर- पुनःपुन्हा नवी होणारी. हीच पुनर्नवा आपल्या उदरपोकळीत गर्भ धारण करते, नऊ महिने त्याला पोसते आणि नव्या जिवाची निर्मिती करते. वयात येणाऱ्या मुलींनी आपल्या उभरत्या शरीराकडं अशा स्वच्छ आणि सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवे. अन्य स्त्रियांनी, मुलग्यांनी, पुरुषांनी आणि समाजाचीही दृष्टी निरंजन व्हायला हवी.

एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे नवनिर्मितीचा प्रवाह अखंडपणे वाहणारी स्त्री ही जीवनसरिता आहे, तिच्यामधून स्रवत असतं रक्त आणि स्तनांमधून दूधसुद्धा. रक्त आणि दूध ही सर्जनाची आणि पोषणाची मूलद्रव्यं आहेत. बाईच्या शरीराशी या लाल रक्ताचा आणि पांढरट दुधाचा इतका घनिष्ट संबंध आहे, की दूध आणि रक्ताशिवाय स्त्रीची आपण कल्पनाच करू शकत नाही. जन्मलेलं मूल आईच्या स्तनातलं दूध- ते अमृत पितं आणि त्याला कोमट तापमानाचा निर्धोक, सकस द्रव-आहार मिळतो. हा आहार शुद्ध, नैसर्गिक आणि सहजप्राप्त होणारी संजीवनी असते. आईच्या कुशीत निश्‍चिंतपणे दूध पिणाऱ्या बाळाला तृप्त वाटतं, सुरक्षित वाटतं. आपल्या शरीरातला स्रोत बाळाच्या मुखावाटे त्याच्या शरीरात जात असताना मातेच्याही जीवनाचं सार्थक होत असतं. अंगावर निशंकपणे दूध पिणारं अर्भक आणि वात्सल्यसमाधीत बाळाचं जावळ कुरवाळणारी आई हे जगातलं अतिशय सुंदर दृश्‍य आहे. स्तनांतून बाळमुखात जाणारा जन्मजान्हवीचा हा प्रवाहच नव्हे काय?

रक्त आणि स्त्री यांचा संबंधही अगदी मूलभूत. माणसाचं आदिमूळच ते! स्त्रीच्या गर्भाशयातून वाहणाऱ्या रक्ताच्या थबकण्यातून पुढं मानवी बाळाचा जन्म होतो. रक्त हा प्राणीमात्रांच्या पुनरुत्पादनातला मूलभूत स्राव आहे. सस्तन प्राण्यांच्या माद्यांच्या मासिक रक्तस्रावाच्या चुकण्या, वाहण्यातून जन्मजान्हवीचा स्रोत पुढं प्रवाहित होतो. इतकं जर हे सारं सुंदर आहे, सर्जक आहे, तर त्याला अपवित्र विटाळाचं किटाळ लावणं किती क्षुद्रपणाचं आहे! स्त्रीला, मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीला विशिष्ट मंदिरांत वा समारंभांत प्रवेश नाकारणारी परंपरा अडाणी वेडगळपणाचं आणि स्त्री-पुरुष विषमतेचं दर्शन घडवते. जे स्त्रीच्या मासिक धर्माला अपवित्र, अशुद्ध मानतात, त्यांनी आपला स्वत:चा जन्मच अश्‍लाघ्य आणि ओंगळवाणा समजावा नि स्वत:चाच खुशाल निरंतर तिरस्कार करावा. घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्त्रियांनी आपल्या मासिक धर्माकडं सकारात्मक दृष्टीनं पाहावे. जणू निर्मितीचा एक निसर्गदत्त मोहोर!
स्त्री ही पृथ्वीसारखी आहे. बीज धारण करणारी, पोसणारी, जन्म देणारी. सहनशील, क्षमाशील, उदार विपुला. मूल जन्माला घालतानाचा तिचा देहस्वी अनुभव स्त्रीच्या तनामनात आमूलाग्र परिवर्तन करतो. ती जन्मदा व्यापक जाणिवांनी प्रगल्भ होते. हा सर्जनाचा अनुभव पुरुषांना नसतो. त्यामुळं स्त्रियांचं महत्त्व पुरुषांपेक्षा अधिक आहे, असं म्हटलं आहे- बृहद्धर्मपुराणात. तो श्‍लोक असा आहे ः
पितुरप्याधिका माता गर्भधारणपोषणात्‌ |
अतो हि त्रिषु लोकेषु नास्ति मातृसमो गुरु ||

म ाता आणि मातीचं मंगल गाणारी आपली संस्कृती. एकेकाळी मातृसत्ताक कुटुंबसंस्था होती. कालौघात पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्राबल्यानं चित्र पालटत गेलं. स्त्रीभ्रूणाची हत्या करणारीही विकृतीही याच समाजपुरुषानं जन्माला घातली. विज्ञानातल्या शोधांचं वरदान अव्हेरून त्याचा अभिशाप भोगण्यात धन्यता मानणारी पुरुषजन्म-धार्जिणी अमानुष व्यवस्था आता स्त्रियांनीच झुगारून द्यायला हवी. स्त्रीनंच स्वयंसिद्ध, निर्णयक्षम नि कणखर व्हायला हवं. पुरुषप्रधान संस्कृतीत ज्यांचा "अहं' सातत्याने कुरवाळला जातो, त्या "टिपिकल' पुरुषांना समानतेचं प्रशिक्षण देण्याचं कामही स्त्रियांनाच करावं लागतं आहे. काही अटळ अपवाद वगळता भ्रूणाची हत्या म्हणजे गर्भाशयाचा अवमान. घटाचा अवमान. स्वनिर्मितीचा अपमान. स्वत:चाच विनाश. स्त्रीभ्रूणहत्या रोखणं, मुलींच्या जन्माचं स्वागत करणं, तिचं पालनपोषण आणि शिक्षण याविषयी सजग राहणं आणि तिला एक स्वयंपूर्ण व्यक्ती म्हणून विकसित करणं हे आता स्त्रियांनीच करायचं आहे. सुदैवानं आज स्त्रियांमध्ये बरीच जागरुकता आली आहे. हे काम अवघड आहे; अशक्‍य मात्र नाही. कारण आधुनिक समताधिष्टित विचारांनी स्त्रिया सर्वांगीण प्रगती करत आहेत.

पुरुषांनीही आत्मपरीक्षण करावं
काही मोजके अपवाद वगळता पुरुष मात्र "माणूस' होण्याच्या विकासप्रक्रियेत अजून कासवगतीनं चालत आहेत. कारण पुरुषप्रधान संस्कृतीनं त्यालाही जखडले आहे. त्याचा पुरुषी अहंकार कुरवाळण्यात स्त्री-पुरुष दोघंही हिरीरीनं सहभागी आहेत. पुरुषांना समानतेसाठी समुपदेशन करणं, त्यांना श्रमविभाजन आणि श्रमप्रतिष्ठा शिकवणं, नकार पचवायला शिकवणं, त्यांच्यात त्याग-सेवा-करुणा-सहनशीलता इत्यादी गुण बाणवणं ही कामंही आता स्त्रियांनी करणं क्रमप्राप्त आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पुरुषांनीही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. त्यांनी पुरुषी सिंहासनावर बसून अहंकाराचे मुकुट घालून निष्क्रिय होणं योग्य नाही. असं करून तेच स्वत:ला सर्वांगानं विकसित करण्यापासून रोखतात. संकुचित होतात. स्त्री मात्र स्वत:ला कालसुसंगत करत बदलत आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पुरुष असा विचार करतील का?

सखे,
ही संस्कृती, या रूढी
रोखून धरतात
माझा "माणूस' होण्याचा विकास...

माझा चौकोनी आरसा
तुझा मात्र बहुरंगी कॅलिडोस्कोप ...
अचंबित करणारा..!

माझ्या एकेरी फोकसमध्ये
मी होतोय तळे- संकोचलेले!
विस्तारत्या कक्षा ओलांडताना
तू मात्र भासतेस-
अनेक प्रवाहांना लीलया झेलणारी
कणखर अमेझॉन ....!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com