लग्न पाहावे करून... 

अभय सुपेकर 
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

कर्नाटकातील खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणीचा एकीकडे शेकडो कोटी खर्चून झालेला विवाह समारंभ गाजत आहे, तर दुसरीकडे नोटाबंदीमुळे अनेकांना आपल्या मुलाबाळांचे लग्नसमारंभ लांबणीवर टाकावे लागत आहेत. खरं तर लग्न हा खासगी मामला, पण त्याला सध्या आलेले इव्हेंटचे रुप धक्कादायक जसे आहे, संपत्तीचे प्रदर्शन करणारे जसे आहे, तेवढेच ते सर्वसामान्यांना चकीत करणारे आहे... 

कर्नाटकातल्या राजकारणातले बलाढ्य प्रस्थ असलेले आणि 'बडवारा श्रमिक रायतारा कॉंग्रेस पक्षाचे नेते जी. जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणीचा राजेशाही विवाह समारंभ धुमधडाक्‍यात झाला. भारतीय जनता पक्षाचे एकेकाळी नेते असलेले रेड्डी बंधू यांनी कर्नाटकातल्या राजकारणावर अनेक वर्षे आपले वर्चस्व गाजवले. आमदारकी, खासदारकीसह मंत्रीपददेखील रेड्डींच्या घरात राहिले.

या विवाह समारंभासाठी विजयनगरच्या साम्राज्याच्या वैभवाची प्रचिती यावी, असे राजेशाही मंडप उभारण्यात आले. आख्खे खेडेच नव्याने वसवण्यात आले. ज्या विजयनगराच्या परिसराचे खऱ्या अर्थाने 'मातीचे सोने' केले, त्या रेड्डी बंधूंनी कॉन्स्टेबल राहिलेल्या आपल्या वडिलांच्या लक्षपटीने प्रगती साधत राजकारणात आपले नाव रोशन केले. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाच्या लढवय्या नेत्या सुषमा स्वराज यांच्यात 1999 मध्ये बळ्ळारीतील पोटनिवडणूक रंगली. त्यावेळी रेड्डी बंधू सामान्य होते. त्यांचे नावदेखील फारसे चर्चेत नव्हते. परिस्थितीशी झगडत ते खाणव्यवसायात (मायनिंग) स्थिरावू पाहात होते. 2004 मध्ये जनार्दन रेड्डींना मायनिंगचे लायसन्स मिळाले, तेथून त्यांनी आकाशात भरारी घेणे सुरू केले. खासगी विमान, हेलिकॉप्टरपासून मौल्यवान गाड्या, बंगले त्यांच्या मालकीचे झाले. त्यांचे बंधू करुणाकर आणि सोमशेखर यांचे राजकारणात बस्तान बसले. जेव्हा बेकायदा खाणींचा मुद्दा तापला तेव्हा कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासह रेड्डींनाही सत्तेपासून दूर व्हावे लागले. जनार्दन रेड्डींना साडेतीन वर्षे तुरुंगात काढावी लागली. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या या विवाह समारंभावर सुमारे 100 ते 500 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज विविध व्यक्तींनी व्यक्त केला आहे. प्राप्तीकर खात्यानेही त्याची दखल घेत रेड्डी यांच्या कार्यालयांवर निवासस्थानांवर छापे टाकत आपले कामकाज सुरू केले आहे. 

दुसरीकडे नोटबंदीचा निर्णय घेणाऱ्या सरकारने जनतेची होणारी कोंडी लक्षात घेऊन आणि तोंडावर आलेले विवाह समारंभ पार कसे पाडायचे, यासाठी चिंताक्रांत झालेल्यांना दिलासा देण्यासाठी अडीच लाख रुपये एकरकमी बॅंकेतून एकाच खात्यातून काढायला परवानगी दिली आहे. स्वतः कमावलेले हे पैसे काढण्यासाठीही त्या व्यक्तीला अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्याच्या घरातील कोणीही विवाह समारंभासाठी अशा प्रकारे पैसे काढलेले नाहीत, हे लिहून द्यावे लागत आहे. काही दिवसांपुर्वी तर एका उपवधूने थेट बॅंकेत लग्नपत्रिकेसह जावून आपल्या पित्याची व्यथा मांडली आणि होणारे हाल विशद केले, तेव्हा कुठे बॅंक आणि प्रशासन त्यासाठी सरसावले आणि तिचा प्रश्‍न सुटला. नोटाबंदीच्या निर्णयाने अनेक समस्या तात्पुरत्या स्वरुपात निर्माण झाल्या असल्या तरी त्याने अनेकांचे विवाहवेदीवर चढण्याचे मुहूर्त धोक्‍यात आले आहेत. अनेक लॉन्स, मंगल कार्यालये, वाजंत्रीवाले, केटरर्स, फुलवाले, सराफ, सौंदर्यप्रसाधने अशा सर्वांनाच त्याचा फटका बसला आहे. प्रश्‍न आहे तो त्यासाठीचे खर्चासाठी पैसे कसे आणि कुठून आणायचे. 

राजेशाही आणि अक्षरशः संपत्तीचे अतोनात प्रदर्शन करण्यापासून ते ऐपत नसल्याने एखाद्या मंदिरात जावून देवाब्राह्मणाच्या साक्षीने विवाह करण्यापर्यंतचे मार्ग अवलंबले जातात. आपल्या भारतासारख्या देशात तर दरवर्षी हजारो कोटींची उधळण या समारंभावर होते. त्यासाठी घरची मंडळी वर्षानुवर्षेच काय प्रसंगी मुलांच्या आणि विशेषतः मुलीच्या जन्मापासून पै-पै पैसा जमवते आणि एका दिवसांत तो पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो. पुरोहित, वाजंत्री, देणे-घेणे, हुंडा, जेवणावळी, मंडप आणि वराती, मानपान, वधू-वरांपासून आप्तांसाठी पोषाखांपासून ते नटण्यामुरडण्याच्या सामग्रीपर्यंत अशा एक ना अनेक कारणांसाठी पैशाची पेरणी करावी तेव्हा कुठे घरादाराला, ऐपतीला साजेसा विवाह समारंभ पार पडतो. निमंत्रणपत्रिका कशी असावी, वधू-वरासाठी कुठून, कसे पोषाख घ्यावेत, स्टाईल स्टेटमेंटसाठी खास डिझानर्स चॉईस खास पोषाख बनवून घ्यावेत, कोणत्या सराफाच्या दुकानातून दागदागिने आणावेत यापासून अनेक बाबींवर झडणारी चर्चा पैसाला नवी वाट करून देतात. मोठमोठ्या शाही समारंभांना तर इव्हेंट मॅनेजमेंटचे स्वरुप आले आहे. काही समाजामध्ये तर जो अशा समारंभावर किती खर्च करतो, आपल्या ऐश्‍वर्याचे किती प्रदर्शन करतो यावर त्याची समाजातील पत ठरते, असे मानले जाते. 

'मॅरेजेस्‌ आर अरेंज्ड इन द हेव्हन, परफॉर्मड्‌ ऑन द अर्थ' असे म्हणतात. अत्यंत व्यक्तीगत स्वरुपाचा हा समारंभ आहे. तो कसा करावा, त्यावर किती खर्च करावा, त्यात डामडौल, ऐश्‍वर्याचे प्रदर्शन करावे की साधेपणाने पार पाडावे हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्‍न आहे. तथापि, विवाहसमारंभातील खर्चाने कौटुंबिक आर्थिक गणित ढासळते आणि अगदी हातावर पोट असलेल्या सामान्य माणसाचे जीवन त्याने घडते पण बिघडते पण हेच खरे आहे. महात्मा जोतिबा फुल्यांनीदेखील आपल्या समाजातील या प्रथेकडे लक्ष वेधले आणि जमिनी विकून विवाह समारंभात संपत्तीचे प्रदर्शन करून कर्जबाजारी होवू नका, असा इशारा शेतकरी बांधवांना दिला होता. आजही ग्रामीण भागात दुष्काळाशी आणि आपत्तीशी सामना करणारा शेतकरी हात राखून विवाह समारंभावर खर्च करत नसल्याने त्याच्या समस्या कायम आहेत. शहरी भागांतही यापेक्षा वेगळे चित्र नाही. पाकिस्तानातही अशाच स्वरुपाची समस्या कायम आहे. म्हणून तिथे विवाह समारंभात जेवणावळीकरता एकच मेन्यू ठेवा, असे सरकारला सांगावे लागले. 

थोडक्‍यात, नोटाबंदीने विवाहाचे अनेक मुहूर्त हुकू लागले आहेत. अनेकांनी विवाह लांबणीवर टाकण्याचे पसंत केले आहे. ज्यांना हे समारंभ झोकात, डामडौलात करायचे आहेत, त्यांनी ते जरूर करावेत. त्यांना सर्वांनी शुभेच्छाही द्याव्यात. मात्र, खर्चाचा हा अपव्यय टाळण्याचा आपण विचार केला पाहिजे असे वाटते. श्रीमंतांना त्यांचे वैभव आणि त्यांचे समारंभ लखलाभ. पण भारतासारख्या देशांत आजतरी साठ-सत्तर टक्के लोक हे मध्यमवर्गीय किंवा त्याखालील आर्थिक स्थितीतील आहेत. हात चालतात तोपर्यंत पोट भरते, अशी या वर्गाची अवस्था आहे. शेतकरीवर्गही यात येतोच. अशावेळी किमान यानिमित्ताने का होईना, महात्मा फुलेंनी डोळ्यात झणझणीत घातलेले अंजन लक्षात घेऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्नाची नासाडी आणि विवाह समारंभावरील अनावश्‍यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे काहीजण यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, अर्थकारणाचे चक्र गतीमान होते, असा युक्तीवाद करू शकतात. पण सांगा तुम्ही, आयुष्यभर पै पै साठवायची आणि ती एका दिवसांत उधळायची? कोणासाठी? कशासाठी? या सर्व बाबींचा कधी विचार केलाय का? खरेतर आपली मुलं सुखी, आनंदी राहावीत, यासाठीच प्रत्येकजण धडपडत असतो. मग तोच पैसा मुलाच्या किंवा मुलीच्या नावे ठेवला, तो त्यांना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी वापरता आला, घर, वाहन, घरातील आवश्‍यक किंमती वस्तू घेण्यासाठी तो उपलब्ध केला तर याच वस्तूंसाठी आपल्याला खस्ता खाव्या लागल्या त्या त्यांच्या वाट्याला येणार नाहीत, असा विचार केला पाहिजे. विवाह हा अत्यंत कौटुंबिक, घरगुती मामला असल्याने त्याला तसेच राहू देण्यासाठी हे आवश्‍यक आहे, असे वाटते. 

Web Title: Abhay Supekar writes about the big-fat wedding by G Janarthan Reddy