कळीचे फूल होताना... 

कळीचे फूल होताना... 

स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवेहवेसे वाटते. अभिव्यक्तीसाठी त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या भूमीत मानवी जीवन अधिक फुलते, विकसित होते, बहरते आणि त्याला सर्जनशीलतेचे धुमारेही फुटतात. नवनिर्मितीची, अभिसरणाची प्रक्रियाही स्वातंत्र्याच्या वातावरणात अधिक जोमदार आणि सकस होते. तथापि, स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर होते तेव्हा त्याच स्वातंत्र्याची माती व्हायला वेळ लागत नाही. स्वातंत्र्याच्या वेलावर स्वैराचाराची विषवल्ली मूळ धरू लागली की, त्यानं सगळंच उद्‌ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

मग हीच विषवल्ली आपले जहरी डंख मारत अस्वस्थ करून सोडू लागते. स्वातंत्र्य आणि स्वैराचाराच्या सीमारेषांचे भान सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्हीही जीवनात वावरत असताना बाळगले नाही तर अनर्थ घडतो. त्याची किंमत त्या व्यक्‍तीला आणि समाजाला अशा दोघांनाही मोजावी लागते. म्हणूनच सामाजिक संकेत आणि त्याचे भान प्रत्येकाला असावे लागते. ज्या समाजात सामंजस्य, सुहृदयता, जबाबदारीचे भान, संवेगतेला पूर्णविराम असतो, त्याच समाजात शांतता आणि सुसंस्कृतपणा अधिक नांदतो, हे खरे. 

हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी अश्‍लील चित्रफिती पाहताना सत्तरवर अल्पवयीन मुलांना पोलिसांनी छापे टाकून ताब्यात घेतले. प्रामुख्याने काही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सायबर कॅफे आणि व्हिडिओ पार्लरना पोलिसांनी लक्ष्य केले होते. त्यानंतर या मुलांच्या पालकांना झालेल्या घटनेची माहिती दिली. पालकांच्या उपस्थितीतच या मुलांचे प्रबोधन करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. वरवर पाहता ही घटना साधी, सोपी आणि सरळ वाटत असली तरी गांभीर्याने घेऊन त्यावर प्रत्येकाने चिंतन करावे, एवढी निश्‍चितच महत्त्वाची आहे. याच हैदराबादमध्ये त्या आधी शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांत मारामारी होऊन एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. अगदी काल याच आंध्र प्रदेशातून हजारो किलो गांजा देशाच्या इतर भागात बेमालूमपणे पाठवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. गावाचे नाव बदलले तरी अशा स्वरूपाच्या घटना आता सार्वत्रिक ऐकू येऊ लागल्या आहेत. महिला, मुलींवरील अन्याय, अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांत अल्पवयीन आणि त्यातही किशोरावस्था संपून यौवनाच्या उंबरठ्यावर तोल सांभाळू पाहणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे, हे चिंताजनक आहे. 

साधारण वर्ष-दीड वर्षांपूर्वी सरकारने इंटरनेटवरील काही पोर्न (अश्‍लील) साइटस्‌ बंद करण्याचा निर्णय घेऊन, आठशेच्या आसपास साइट्‌सची यादी जाहीर केली तेव्हा हलकल्लोळ माजला. राज्यघटनेने बहाल केलेल्या मूलभूत स्वातंत्र्यातील व्यक्तीगत मूलभूत हक्कांवर त्यामुळे गदा येते, असे सांगण्यापासून ते अशा साइट्‌सवर बंदी आणणे सोपे नाही, त्यांचे सर्व्हर देशाबाहेर असतात, अशा तांत्रिक बाबी समोर करत त्यावर बोळा फिरवण्यापर्यंतच्या अनेक घटना घडल्या. तरीही पोर्न चित्रफिती पाहण्यावर निर्बंध कसे आणावेत, याचा प्रश्‍न सुटलेला नाही, हेच खरे. प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत गेले. त्यानंतर चार भिंतीच्या आत कोणी काय करावे, हा त्याचा व्यक्तीगत मामला आहे. मूलभूत हक्कावर गदा येणार नाही आणि समाजाच्या स्वास्थ्याला धक्का लागत नाही तोपर्यंत यावर काही करता येणार नाही, असे स्पष्ट झाले. आजमितीला अशा हजारो, लाखो पोर्न साइट्‌स इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यांच्या एकमेकांच्या लिंकस्‌ही मिळत असतात. त्यांच्या पाहण्यातून, डाउनलोडिंगमधून इंटरनेटचे अर्थकारण अधिक तेजीत राहाते आहे. महसूलही मिळत आहे. ऐंशी, नव्वदच्या दशकात आपल्या देशात व्हिडिओ हॉल आणि नंतरच्या काळात व्हिडिओ गेमचे पेव फुटले होते. चित्रपटगृहांना पर्याय म्हणून अनेक छोट्या गावांत त्यांचा खूप बोलबाला होता. त्या काळात याच व्हिडिओ पार्लरमधून मोठ्या प्रमाणात अश्‍लील चित्रफितींच्या (ब्ल्यू फिल्म) प्रदर्शनाचा धंदा बोकाळला होता. त्याने पिढी बिघडू लागली होती. पोलिसांच्या छाप्यांमध्ये अशा पार्लरमधून आंबटशौकिनांसह मुलांना पकडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर घरोघरी पसरलेल्या टीव्हीच्या केबल नेटवर्कवरून विशेषतः मध्यरात्रीनंतर आंबटशौकिनांसाठीचे चित्रपट स्थानिक केबलवाले दाखवायचे.

तथापि, इंटरनेटचा पसारा शहरा-गावांपासून घरा-दारापर्यंत पसरला. गेल्या काही वर्षांत स्मार्ट फोन सामान्यांच्याही आवाक्‍यात आल्याने इंटरनेटची कळ प्रत्येकाच्या बोटाखाली आली आहे. जेव्हा हवे तेव्हा, जे पाहिजे ते प्रत्येकाला सहजरीत्या उपलब्ध होऊ लागले. भारत इंटरनेट साक्षर झाला, त्याचे उपभोक्ता वाढले, अमेरिका, चीन यांच्यासह युरोपातील अनेक प्रगत देशांशी आपण स्पर्धा करू लागलो. 'दुनिया मुठ्ठीमें' अशा गर्वाने म्हणत आम्हीही 'आयटी'वर (माहिती, तंत्रज्ञान) स्वार होत ऐटीत चालू लागलो आणि आमची छाती अभिमानाने फुगली. पण या इंटरनेटवरून भारतात काय पाहिले जाते, याची आकडेवारी आल्यानंतर आपला भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. कोणतेही तंत्रज्ञान हे कधीच विध्वंसक नसते, मारक नसते. मात्र, त्याचा वापर आपण कसा करतो, यावर त्याची फलनिष्पत्ती अवलंबून असते. आण्विक तंत्रज्ञानाने बॉंब बनवून तो टाकला तर विनाशकारी आणि त्यापासून शेती उत्पादने संवर्धीत केली, ऊर्जानिर्मिती केली, कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर उपचारासाठी वापरले तर वरदायी ठरते. म्हणूनच मूलभूत प्रश्‍न असतो तो तंत्रज्ञानाच्या वापरामागील विवेकबुद्धीचा. 
मुद्दा हा आहे की, कोणत्या वयात कोणाच्या हातात काय द्यायचे. ज्याची विवेकबुद्धी अद्याप आकाराला आलेली नाही, चांगले किंवा वाईट ठरवण्याची मानसिक आणि बौद्धिक क्षमता ज्याला आलेली नाही, अशा कोवळ्या मनावर आपण काय संस्कार करावेत, याचा आहे.

प्रत्येक समाजाला आपली स्वतःची अशी संस्कृती असते. त्याचे म्हणून आपले आचरणाचे, विचाराचे, अभिव्यक्तीचे असे काही अलिखित संकेत असतात. पाश्‍चात्य आणि पौर्वात्य संस्कृती यांच्या जडणघडणीत काही मूलभूत फरक आहेत. कुटूंब व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अनुकरणीय आहे. समाजात वावरताना कोणी काय बोलावे, वर्तन कसे करावे, हे ठरलेले आहे. अगदी, आता पार पडलेल्या अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबरेखालची विधाने केली, समाजसंकेताबाहेरचे वर्तन केले तेव्हा सर्वाधिक खुल्या समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांनीही नापसंती व्यक्त केली. हे सांगण्याचा उद्देश हा की, प्रत्येक बाबतीत पाश्‍चात्यांची री ओढायची, त्यांचे सर्वच चांगले असे आंधळेपणे स्वीकारणे चुकीचे आहे. कोणत्याही संस्कृती आणि समाजसंकेतांना डोळसपणे स्वीकारले पाहिजे. त्याच्या भूतकाळात डोकावताना त्यांची उपयुक्तता विद्यमान समाजजीवनातील उपयुक्तताही लक्षात घेतली पाहिजे. कोवळ्या वयातील ज्या मुलांना जीवनाकडे पाहण्याची दृष्टीदेखील आलेली नाही, ज्यांना आपण करतो ते चांगले की, वाईट हे अद्याप समजू शकत नाही, अशांना संस्काराची शिदोरी द्यायची की, बेबंद, बेताल वर्तन करू द्यायचे, हे पालकांनी ठरवले पाहिजे. आजकाल फॅशन आणि पॅशन यांच्या नावाखाली त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात नको त्या खटकणाऱ्या बाबी रुजू लागल्या आहेत. आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात. त्यांचं टिपकागदासारखं मन प्रत्येक बारीकसारीक हालचाली, प्रत्येक शब्द आणि त्यामागील भावभावना हे सर्व टिपत असतात, याची जाणीव पालकांनी ठेवली पाहिजे. जेव्हा वडीलच मुलाला सोबत घेऊन मद्यप्राशन करतात तेव्हा त्या मुलांनी संस्कारासाठी कोणाकडे पाहायचे, हा प्रश्‍न आहे. आई नाजूक गोष्टींवर लेकीशी चर्चा करत असताना कळत-नकळत चुकीच्या समजुती रुजवत असेल तेव्हा काय करायचे? 

मुलं चुकीच्या वळणावर का जातात, याच्या खोलात जाण्याची गरज आहे. आजकाल काही शाळांत लैंगिक शिक्षण शिकवले जाते. पण किशोरावस्था म्हणजे नाजूक वळणाने, अवघड घाटाने तारुण्यात प्रवेश करण्याची हळूवार प्रक्रिया असते. जगाच्या कोलाहलात अनेक प्रलोभने त्याला खुणावत असतात. मनात नावीन्याच्या ओढ रुंजी घालत असते. खूप काही जाणून घेण्याची जिज्ञासा थैमान घालत असताना, सर्जनशीलतेचे धुमारे मनात फुटत असतात. घसरण्याच्या जागा खूप वाट्याला येत असताना सावरण्याचा सल्ला देणारी मंडळी मन मोकळं करण्यासाठी असतील, तर समजुतीच्या अवकाशात वास्तवाचे भान रुजते आणि जबाबदारीच्या जाणीवेतून विवेकाची निर्माण होणारी जाणीव नको त्या रस्त्याला जाणे रोखू शकते. नेमक्‍या याच ठिकाणी घरातील पालक आणि जाणती मंडळी कमी पडते की काय, असे वाटायला लागते. त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात नाती केव्हाच हरवली आहेत. आजी, आजोबांची मायेची ऊब आणि मोलाचा सल्ला कमी पडायला लागला आहे. भावंडांसारख्या मन मोकळं करण्याच्या आणि उमलत्या वयात मानसिक आधार आणि दिलासा देणारे कोपरे हद्दपार होत आहेत. या सर्वांची उमग पालकांसह वडीलधाऱ्यांना यायला पाहिजे. मुलांना सोयी, सुविधा दिल्या. सौख्याची रेलचेल केली. पाहिजे तो हट्ट पुरवला, हॉटेलिंग, सिनेमा, पिकनिक असं सगळं केली तर सुसंवादाची, दृष्टिकोनाच्या आदान-प्रदानची कवाडे किती मोकळी होतात, हे कितजण मेहनतपूर्वक करतात. त्याची गरज त्यांना किती पटते हे पाहिले पाहिजे. पाल्य कोणाशी संगत करतो, तो कोणत्या वातावरणात दिवसभर असतो, हे किती जण तपासतात. खरं तर कळीचे केवळ भरणपोषण करून चालत नाही तर तिच्या उमलत्या हळूवार भावनेवर मायेची ऊब आणि सुसंवादाची, मित्रत्वाची सावली खूप गरजेची असते. याकडे लक्ष दिले तर बिघडण्याचा, चुकीच्या वाटेवर भरकटण्याच्या शक्‍यता कमी होतात. चला, उमलत्या कळीवर ममत्वाची पखरण करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com