भावंडांची 'रोड ट्रिप' (अभिजित पानसे)

अभिजित पानसे abhijeetpanse.1@gmail.com
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सख्ख्या भावंडांबरोबर ‘रोड ट्रिप’ ही कल्पनाच भन्नाट. ‘ट्रिपलिंग’ या वेब सिरिजमध्ये हा विषय घेऊन इतक्‍या सुंदर रितीनं फुलवण्यात आला आहे, की प्रत्येकाला आपल्या जवळचे लोक यातल्या व्यक्तिरेखांमध्ये दिसायला लागतात. छान अनुभव देणाऱ्या या वेब सीरिजविषयी.

सख्ख्या भावंडांबरोबर ‘रोड ट्रिप’ ही कल्पनाच भन्नाट. ‘ट्रिपलिंग’ या वेब सिरिजमध्ये हा विषय घेऊन इतक्‍या सुंदर रितीनं फुलवण्यात आला आहे, की प्रत्येकाला आपल्या जवळचे लोक यातल्या व्यक्तिरेखांमध्ये दिसायला लागतात. छान अनुभव देणाऱ्या या वेब सीरिजविषयी.

‘रोड ट्रिप’ म्हटलं, की डोळ्यासमोर येतो झोया अख्तरचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा!’ कोणाला फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ही आठवेल..
या दोन्ही चित्रपटांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे यात ‘रोड ट्रिप’ मित्रांसोबत केली जाते. मुळातच ट्रिप म्हणजे मित्र-मैत्रिणींसोबतच जाऊन धम्माल करण्याची गोष्ट अशी आपली मानसिकता असते; पण कधी फक्त आपल्या सख्ख्या भावंडांसोबतच रोड ट्रिप करण्याची कल्पना सुचलीये का?

बालपण ते किशोरवयापर्यंत आई-बाबांच्या छत्राखाली असल्यामुळं मुलं, भावंडं ही फक्त ‘रिसिविंग एंड’लाच असतात. त्यावेळची सोबत फिरण्याची, सहलीची मजा  वेगळी असते; पण मुलं मोठी होतात, तसे विचार वेगळे, मित्र-मैत्रिणी वेगळे होतात. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तयार होतं, अहंकार वाढतो आणि भावंडांसोबतचा संवाद, संवादाची खोली कमी होते. त्यामुळं सख्ख्या भावंडांसोबत म्हणजे ‘सिबलिंग’सोबत सहल ही कल्पनाच कुणाच्या मनात येत नाही. सुमित व्यासनं नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘ट्रिपलिंग’ या वेब सिरीजची स्क्रिप्ट लिहिली. परिस्थितीमुळं घडलेल्या तीन भावंडांच्या प्रवासाची गोष्ट म्हणजे ‘ट्रिपलिंग.’ ‘पर्मनंट रूममेट्‌स’नंतर प्रफुल्ल व्यासची ही दुसरी वेब सिरीज. ‘ट्रिपलिंग’ला नेटिझन्सनी जोरदार प्रतिसाद दिला.
चंदन, चंचल आणि चितवन या तिघा भावंडांच्या प्रवासाची ही गोष्ट. चंदन म्हणजे सुमित व्यास हा मोठा. वय आणि परिस्थितीमुळं शांत समजूतदार. परदेशात नोकरी करणारा. तिथल्याच एका मुलीसोबत त्यानं लग्न केलेलं असतं; पण त्याच्या तिनं त्याचा विश्वासघात केल्यानं त्यांचा घटस्फोट झालेला असतो. तिथल्या कायद्यानुसार त्याला तिच्याकडून ‘पोटगी’ मिळाल्यावर दुःख हलकं करण्यासाठी तो आपल्या धाकट्या भावाला- चितवनला भेटायला मुंबईत येतो. चितवन हा अत्यंत किचकट आयुष्य असलेला, अनेक फ्रॉड्‌स करणारा, ‘हू केअर्स’ वृत्ती असलेला, मजा मस्ती करणारा, आपल्याच विश्वात मग्न असलेला आणि अनेक कारणांमुळं त्रस्त असलेला ‘डीजे.’ चंदन प्रथम त्याला भेटायला त्याच्या स्टुडिओत जातो, तेव्हा तिथं खूप दारू पिऊन तिथंच पडतो. चितवन त्याला त्याच्या घरी न नेता रात्रभर गाडीत झोपवतो. दुसऱ्या दिवशी चंदनला जाग येते, तेव्हा ते थेट वडोदराजवळ थांबलेले दिसतात. चितवननं गाडीच्या इन्स्टॉलमेंटचे पैसे न भरल्यामुळं बॅंकेचा ससेमिरा टाळण्यासाठी तो पळून जात असतो.

यामुळं चंदन चिडतो, त्याला समजावतो; पण शेवटी ते चंचल या बहिणीला भेटायला तिच्या सासरी जोधपूरला जायचं ठरवतात. चंचल जोधपूरच्या ‘रॉयल’ कुटुंबाची एकमेव सून. ती गर्भवती असल्यामुळं त्यानिमित्त असलेल्या समारंभासाठी त्यांची किल्लास्वरूप हवेली सजलेली असते. मात्र, नंतर ती भावांना सांगते, की ती गर्भवती असल्याचं फक्त नाटक करते आहे.

चंचलचा पती प्रणव त्यांच्या संस्थानचा राजा असतो. चंचलही तिच्या आयुष्यात असमाधानी, दुःखी असते. नकारात्मक घटनांमुळं ते तिघंही जोधपूरहून रात्री उशिरा निघतात आणि मग सुरू होतो त्यांचा प्रवास. प्रवासात अनेक विनोदाचे प्रसंग घडतात, अडचणी येतात, भांडणंही होतात. या सगळ्यातून भावनिकरित्या जवळ येत ही भावंडं शेवटी त्यांच्या आई-वडिलांकडं मनालीला जाऊन पोचतात.

या भावंडाच्या वडिलांची भूमिका कुमुद मिश्रा यांनी आणि आईची भूमिका शेरनाझ पटेल या परिपक्व कलाकारांनी केली आहे. तिन्ही मुलांपेक्षा त्यांचे आई-वडील अगदी वेगळ्या स्वभाव, विचारांचे, व्यक्तिमत्त्वाचे. तिन्ही मुलं आपल्याला आयुष्यात असमाधानी, अडचणीत, ताणामध्ये असतात, तर आई-वडील अगदी आनंदी, ‘कूल’, सकारात्मक विचारांचे, आयुष्य खऱ्या अर्थानं जगणारे. ‘रोड ट्रिप’ ही संकल्पना त्यांच्या वडिलांनी पूर्वीपासून घरात रुजवली असते. अगदी कुठलीही तयारी, आखणी न करता वर्षातून एकदा कुटुंबासोबत (चंदन, चंचल, चितवन लहान असताना) सहलीला जात असत. आई-वडिलांना भेटल्यावर, संवाद झाल्यावर, विचारसरणीत अगदी छोटा बदल झाल्यावर मात्र तिघंही शांत होतात. तिघांनाही आपापले मार्ग मिळतात.

मानवी गागरू या वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या गुणी अभिनेत्रीनं चंचलची भूमिका अगदी सुरेख साकारली आहे. अभिषेक पराशर नवोदित अभिनेता. त्याचा चितवन छानच. जोधपूरहून अपरात्री निघाल्यावर वाळवंटात रस्ता चुकल्यामुळं एका ठिकाणी थांबून तिथं ‘बॉनफायर’ करत तिघंही १५ वर्षांनंतर पाहिल्यांदा नीट संवाद साधतात. तो भाग या वेब सिरीजचा सर्वोत्तम भाग आहे.

मनालीला पोचल्यावर चंदन त्याच्या वडिलांशी रात्री बाल्कनीमध्ये गप्पा मारत असतो. तेव्हा तो म्हणतो, की त्याला थंडी वाजते आहे, तेव्हा आता बोलणं थांबवूयात. तेव्हा त्याचे वडील त्याला इतकंच म्हणतात ः ‘तो शॉल ओढ लो ना!’ शाल अंगावर घेऊन चंदन वडिलांना म्हणतो ः ‘किती सोपा उपाय होता ना यावर?’
असे मनाला स्पर्श करणारे, विचार करायला लावणारे काही प्रसंग, क्षण ‘ट्रिपलिंग’मध्ये आहेत. यातल्या व्यक्तिरेखा इतक्‍या प्रभावीपणे लिहिल्या आहेत, की आपल्याला आपल्या लहान भावात कुठंतरी चितवन दिसू लागतो, बहिणीत चंचल सापडते. सुमित व्यास या गुणी अभिनेत्यानं या वेब सिरीजमध्येही कमाल केली आहे. ‘रूममेट्‌स’मधला बावळट प्रेमी आणि ‘ट्रिपलिंग’मधला समंजस, परिपक्व माणूस अप्रतिम. या वेब सिरीजचं लिखाणही त्यानं केलंय. एक सकारात्मक विषय, वेगळी संकल्पना घेऊन त्याला पूर्णतः आजच्या भाषेत मांडणारी, मनाला स्पर्श करणारे संवाद, दृश्‍यं असलेली, विनोदाचं आवरण असलेली ही ‘ट्रिपलिंग’ नक्कीच बघण्यासारखी.

Web Title: abhijeet panse write article in saptarang