घटना-घडामोडींचा संग्राह्य लेखाजोखा (अभिजित सोनावणे)

book review
book review

आपल्या आजूबाजूला जे घडतं ते वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, फेसबुक-ट्‌विटर-यूट्यूब असे विविध सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. ते बहुतेकवेळा पुरेसं असतंच असं नाही. त्याच्या पल्याड जाऊन वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये काय काय घटना-घडामोडी घडल्या, त्याचे पडसाद समाजमनावर काय झाले, हे एकत्रितपणे समजून घ्यायचं असेल तर सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेलं "सकाळ इयरबुक' हे पुस्तक वाचायला हवं.

या पुस्तकात विविध क्षेत्रांनुसार विभाग करण्यात आले आहेत. त्यामुळं आपल्याला हवा असलेला नेमका संदर्भ ताबडतोब सापडतो. राजकीय घडामोडी, केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय, न्यायालयीन निर्णय, भारताशी संबंधित आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, विविध पुरस्कार, महत्त्वाच्या व्यक्तींची निवड या सगळ्याची नोंद पुस्तकात घेण्यात आली आहे. काही महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे लेखही या पुस्तकात आहेत. एम. करुणानिधींच्या निधनानंतरची स्थिती, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबतचं विवेचन, मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक, भूसंपादन कायदा, प्लॅस्टिकबंदी, मराठा आरक्षण, मोदी आणि परराष्ट्रधोरण, इम्रान खान यांच्यासमोरची आव्हानं, पश्‍चिम आशियातला गुंता, जीएसटी, हमीभाव, जागतिक शेती, हरित राजकारण यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे लेख या पुस्तकात आहेत.

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा "विमुद्रीकरणाचे परिणाम', खासदार शशी थरूर यांचा "कलम 377 चा निकाल', पी. साईनाथ यांचा "वंचितांचा लॉंग मार्च', खासदार आणि पर्यावरणतज्ज्ञ जयराम रमेश यांचा "भूसंपादन कायदा', पर्यावरणवादी कार्यकर्त्या सुनीता नारायण यांचा "वन सद्यस्थिती अहवाल 2017' पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचा "केरळचे पूर आणि विध्वंसाची अर्थव्यवस्था', डॉ. सदानंद मोरे यांचा "वीसचे दशक आणि महात्मा गांधी', अर्थतज्ज्ञ बिबेक देबॉरॉय यांचा "नवीन राज्यनिर्मितीच्या मागण्या' हे लेख आवर्जून वाचलेच पाहिजेत असेच आहेत.
वर्षभरात घडलेल्या घटनांची विशेष सामान्यज्ञानासह दिलेली माहिती, या माहितीला पूरक नकाशे, फ्लो चार्ट, इन्फोग्राफिक्‍स, तक्ते, पूरक छायाचित्रं या गोष्टींमुळं या पुस्तकाला दस्तावेजाचं स्वरूप प्राप्त झालं आहेच; पण माहिती देण्याच्या या पद्धतीमुळं ती सहजपणे समजते. कोणतीही घटना घडते, तेव्हा त्यामागं काही ना काही पार्श्‍वभूमी असते किंवा घटनांच्या शृंखलेतली ती पुढची घटना असते, त्यामुळं पुढची घटना समजून घेण्याआधी त्या घटनेशी संबंधित भूतकाळातल्या घटनांचीही माहिती असणं आवश्‍यक असतं. त्या दृष्टीनं घटना-घडामोडींमागील इतिहास, पार्श्‍वभूमी, घटनाक्रम, त्या घटनेशी संबंधित संज्ञा-संकल्पना, घटना-घडामोडींशी संबंधित संस्थांची आणि व्यक्तींची माहिती देण्यात आल्यानं आशयात परिपूर्णता साधली आहे.
भविष्याचा वेध घेण्यासाठी वर्तमानकाळ समजून घेणं महत्त्वाचं असतं. घटना समजून घेणं इतकीच समाजमनाची अपेक्षा नसते, तर त्या सखोलतेनं आणि परिपूर्णतेनं समजून घेणं आणि त्यानंतर त्या घटनांचा नेमका अर्थ लावण्याचं काम समाजमन करत असतं. 2018 मध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना तटस्थतेनं आणि परिपूर्णतेनं समजून घेण्यासाठी हे इअबुक तुम्हाला मदत करू शकेल.

समाजभवतालात घडत असणाऱ्या घटना-घडामोडींचा अभ्यास स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी करत असतात, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं असंच आहे. त्याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक, कला-वाणिज्य-विज्ञान शाखेचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि संशोधक; तसंच पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, राजकीयविश्‍लेषक, लोकप्रतिनिधी यांच्यासाठीही हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे. समाज-भवताल, त्यातल्या घडामोडी, अचूक विश्‍लेषण समजावून घेतलं, की भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा नेमका अर्थ लावता येतो, त्या बाजूनं सकाळ प्रकाशनाचं "इअरबुक 2019' मदत करतं. सन 2018 या वर्षांतल्या महत्त्वाच्या गोष्टींचा संग्राह्य लेखाजोखा म्हणूनही या पुस्तकाकडं पाहता येईल.

पुस्तकाचं नाव : सकाळ इयरबुक 2019
प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे
पानं : 472, किंमत : 399 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com