आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धान्त किती खरा, किती खोटा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sindhu saraswati culture

सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या विलयाचा कालखंड मॅक्समुलरनं दिलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या इसवीसनपूर्व १५०० या काल्पनिक कालखंडाशी बरोबर जुळल्यामुळे, आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धान्ताचा अंतिम पुरावा सापडल्याचं जाहीर करून, तो अधिकृत इतिहास म्हणून लादण्यात आला.

आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धान्त किती खरा, किती खोटा?

सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या विलयाचा कालखंड मॅक्समुलरनं दिलेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या इसवीसनपूर्व १५०० या काल्पनिक कालखंडाशी बरोबर जुळल्यामुळे, आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धान्ताचा अंतिम पुरावा सापडल्याचं जाहीर करून, तो अधिकृत इतिहास म्हणून लादण्यात आला, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. मात्र, खरोखरच काय आढळलं सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात? आर्यांनी आक्रमण करून स्थानिक द्रविड संस्कृतीचा विनाश केल्याच्या काही खुणा आढळल्या का?

अशा हिंसक आक्रमणाचा वा संहाराचा मागमूसही या उत्खननात कुठंही आढळलेला नाही. या संस्कृतीचं वैशिष्ट्य असं की, शेकडो ठिकाणी झालेल्या उत्खननात कोणतीही शस्त्रास्त्रं आढळली नाहीत, तसंच या मुख्यतः शहरी संस्कृतीत राजेशाहीचं अस्तित्व कुठंही जाणवत नाही. इजिप्तच्या संस्कृतीची रचना फरोहा म्हणून संबोधल्या गेलेल्या तिथल्या राजघराण्याभोवती झालेली आढळते; पण सिंधू-सरस्वती संस्कृतीत मात्र राजघराणी आढळतच नाहीत. यातून असा निष्कर्ष निघू शकतो की, ही संस्कृती लढाया करून राज्यविस्तार करणारी राजेशाही नव्हती, तर व्यापार-उद्योगातून समृद्धीकडे वाटचाल करणारी नागर संस्कृती होती.

यावर असं म्हणता येईल की, आर्यांनी या निःशस्त्र लोकांच्या सहज कत्तली करून या संस्कृतीचा नाश केला असेल; पण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विनाशाच्या कुठल्याच खुणा उत्खननात आढळल्या नाहीत, असं होणं शक्य नाही. असे पुरावे मिळत नाहीत म्हटल्यावर आक्रमणसमर्थकांनी ओढून-ताणून पुरावे जमवायला सुरुवात केली. Mortimer Wheeler या पुरातत्त्वशास्त्रज्ञाला मोहेंजोदडो इथं असे काही सांगाडे आढळले, ज्यांना काही जखमा झाल्या असाव्यात असं आढळून आलं. या सुतावरून स्वर्ग गाठून असं सांगण्यात आलं की, आक्रमक आर्यांनी या संस्कृतीतील लोकांच्या कत्तली केल्या; पण हे सांगाडे उत्खननाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आढळले आहेत, हे अभ्यासकांनी दाखवून दिलं आहे. म्हणजेच, ते वेगवेगळ्या कालखंडातले आहेत, एकाच वेळी कत्तल झालेले नाहीत, तसंच त्यांना झालेली इजा ही त्यांच्या मृत्यूच्या वेळी नव्हे तर, आधीच झालेली होती व ती बरी झाल्यानंतरही ते अनेक वर्षं जीवित होते. अर्थातच हा आक्रमणाचा पुरावा होऊ शकत नाही.

उत्खननात काही ठिकाणी दोन स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात राख आढळली. त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, आक्रमक आर्यांनी द्रविड संस्कृतीतील शहरांची राखरांगोळी केली.

आर्यांचा प्रमुख इंद्र यानं शंभर शहरं जाळून टाकली अशी कथाही पसरवली गेली; पण नंतर असं सिद्ध झालं की, मोडकळीला आलेल्या वस्त्यांमध्ये दुरुस्ती करत न बसता त्या पूर्णपणे जाळून सपाट मैदानावर नवी घरं वसवण्याचा त्यांचा प्रघात होता. या वस्त्या जर आक्रमकांनी जाळल्या असत्या तर तिथं नंतर उभारलेली नवी घरं वेगळ्या शैलीतील असायला हवी होती; पण या नव्या वस्त्याही सिंधू-सरस्वती शैलीतच बांधल्या गेल्या होत्या.

सिंधू-सरस्वती संस्कृतीतील Drainage System हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. सांडपाण्याचा प्रवाह योग्य रीतीनं होण्यासाठी विशिष्ट उतार शहरभर राखला जावा म्हणून जुन्या भागात दुरुस्ती करत न बसता तो सपाट करून नव्यानं उभारणी करण्याची त्यांची पद्धत होती.

आक्रमणाच्या काहीच खुणा आढळत नाहीत म्हटल्यावर, आर्य पश्चिमेकडून भारतात आले, या आपल्या म्हणण्याला चिकटून राहण्यासाठी या मंडळींनी एक जबरदस्त कोलांट-उडी मारली. ते आता असं म्हणू लागले की, आर्यांनी भारतावर आक्रमण केलं नाही तर, ते पश्चिमेकडून भारतात टप्प्याटप्प्यानं स्थलांतरित झाले. त्या काळी सिंधू-सरस्वती संस्कृती ही जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली संस्कृती होती. रशियाच्या दक्षिणेकडील विरळ लोकवस्तीच्या डोंगराळ भागातील काही टोळ्यांमधले तुरळक लोक घनदाट लोकवस्ती असलेल्या शहरी संस्कृतीत स्थलांतर करून मूळ संस्कृतीची जागा व्यापतील आणि तिथं आपली भाषा आणि संस्कृती प्रस्थापित करतील हे असंभवनीय वाटतं.

आणि, असं घडलं असेल तर या बदलाचं प्रतिबिंब या भागातील लोकांच्या जीवनशैलीत दिसायला हवं. या संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालखंडापासून जसजसे आपण नंतरच्या कालखंडाकडे जातो तसतसा उत्खननाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये सापडणाऱ्या वास्तू, चित्रं, मूर्ती व बांधकामाच्या शैलीत क्रमाक्रमानं बदल दिसायला हवा. त्यांच्या जीवनशैलीचं, आचार-विचारांचं दर्शन घडवणाऱ्या चिन्हांमध्ये व प्रतीकांमध्ये, त्यांच्या उपसनापद्धतीमध्ये फरक आढळून यायला हवा, तरच ‘द्रविड संस्कृतीचा विलय होऊन आर्यांची नवी संस्कृती इथं रुजत गेली,’ असा निष्कर्ष काढता येईल.

इस्लामी आक्रमणं सुरू झाल्यानंतर इथं नवं स्थापत्यशास्त्र दिसू लागलं, ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारतीयांची भाषा, पेहराव, जीवनशैली यांत मोठ्या प्रमाणात फरक पडला. सिंधू-सरस्वती संस्कृतीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा कुठलाही बदल झालेला आढळत नाही. उलट, एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सातत्य आढळून येतं.

इतकंच काय, सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या पाऊलखुणा आजच्या भारतातही उमटलेल्या आढळून येतात. उत्खननात सापडलेल्या काही मूर्तींमध्ये स्त्रियांनी केसांच्या भांगात सिंदूर भरलेला, तर हातात बांगड्या घातलेल्या आढळतात. या प्रथा भारतात आजही पाळल्या जातात हे आपण जाणतोच. हिंदू धर्मात आजही पवित्र मानलं जाणारं स्वस्तिक हे चिन्ह, कालिबंगन इथं सापडलेल्या यज्ञवेदी, दोन हात जोडून केला जाणारा नमस्कार, योगासनं व योगमुद्रा यांसारख्या सिंधू-सरस्वती संस्कृतीत आढळलेल्या गोष्टी त्या संस्कृतीचं आजवर कायम असलेलं सातत्यच दर्शवतात. साडेचार हजार वर्षांपूर्वी सिंधू-सरस्वती संस्कृतीतील पितरांसाठी तयार केलेल्या पिंडांचे अवशेष राजस्थानमध्ये केलेल्या उत्खननात नुकतेच मिळाले. मृत पितरांसाठी पिंडदानाची पद्धत आपण आजही पाळतो. यासारख्या अनेक गोष्टींवरून सिंधू-सरस्वती संस्कृती व आजचा भारत यांच्या दरम्यान परकीय आक्रमकांनी येऊन उलथापालथ केल्याचा कुठलाही पुरावा नसून, उलट असा कुठलाही बदल न झाल्याचंच प्रकर्षानं आढळतं.

मोहेंजोदडोचा शोध घेणाऱ्या टीमचे प्रमुख उत्खननशास्त्रज्ञ जॉन मार्शल या संस्कृतीबद्दल १९३१ मध्ये म्हणतात : Taken as a whole the Indus Valley Civilization is so characteristically Indian, as hardly to be distinguished from still living Hinduism.

भारतीय संस्कृतीचा ओघ हजारो वर्षांपासून निरंतर प्रवाही असून कुठल्याही परकीय आक्रमकांना अथवा स्थलांतरितांना तो खंडित करता आलेला नाही हे स्पष्ट आहे.

हे सिद्ध करणाऱ्या असंख्य पुराव्यांपैकी दोन पुरावे आपण आज बघू या. आक्रमण/स्थलांतरसमर्थकांच्या म्हणण्यानुसार, गोपालक असलेले आर्य आपल्या गोधनाबरोबर भारतात आले व त्यांनी इसवीसनपूर्व १५०० नंतर संपूर्ण उत्तर भारतात वास्तव्य केलं. हे जर खरं असेल तर जशी त्यांनी स्थानिक मानववंशाची जागा घेतली तशीच त्यांच्या गोधनानंही स्थानिक गाईंची जागा घ्यायला हवी होती; पण पश्चिम आशियात व मध्य आशियात आढळणाऱ्या Bos Taurus जातीच्या गाई आजही भारतात आढळत नाहीत, तर मूळ भारतीय वंशाच्या गाईच सर्वदूर आढळतात. युरोपातील व मध्य आशियातील गाई आणि भारतातील गाई या आनुवंशिकदृष्ट्या दोन लाख वर्षांपासून पूर्णतः वेगळ्या आहेत, त्यानंतर त्यांची कुठलीही सरमिसळ झालेली नाही, हे अनुवंशशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.

दुसरा पुरावा मिळतो तो सिंधू-सरस्वती संस्कृतीतील शिक्क्यांवरून. यांपैकी सुप्रसिद्ध ‘पशुपती सील’मध्ये भगवान पशुपती व त्यांच्यासह संपूर्ण जीवसृष्टीचं चित्रण आहे. या चित्राचं हुबेहूब शब्दरूप आपल्याला अथर्ववेदातील ‘पशुपती सूक्ता’त आढळतं. इतरही काही शिक्क्यांमध्ये अथर्ववेदातील सूक्तांचं चित्रमय रूप आढळतं. यावरून हेच दिसतं की, वैदिक संस्कृती व सिंधू-सरस्वती संस्कृती या एकच आहेत. ‘एक स्वदेशी व दुसरी परदेशी’ हा फक्त एक अपप्रचार आहे. या संशोधनामुळे ‘फ्रॉलीज् पॅराडॉक्स’चं उत्तर मिळालं आहे. डेव्हिड फ्रॉली म्हणतात : ‘सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या अक्षरशः हजारो पाऊलखुणा उत्खननात सापडल्या आहेत; पण या संस्कृतीशी निगडित एकही ग्रंथ आढळलेला नाही. याउलट, वैदिक संस्कृतीशी निगडित वेद-उपनिषदांसारखे महान ग्रंथ ज्ञात आहेत; पण या संस्कृतीच्या कुठल्याही खुणा उत्खननात आढळलेल्या नाहीत. हे घडणं अशक्य आहे. या विरोधाभासाचं एकमेव कारण म्हणजे, स्थानिक सिंधू - सरस्वती संस्कृतीचा विनाश करून आक्रमक आर्यांनी वैदिक संस्कृतीची स्थापना केली हा काल्पनिक सिद्धान्त.’

हा सिद्धान्त कसा खोटा आहे, ते इतर काही ठोस पुराव्यांच्या आधारे पुढच्या लेखात पाहू या. त्यानंतर नव्या विषयाकडे वळू या.

(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

टॅग्स :saptarang